Saturday, December 26, 2015

हायकू

हायकूचा पाच सात पाच सिलाबल्सचा फॉर्म मला मराठीसाठी तितका उपयुक्त वाटत नाही. मी मुक्त हायकू लिहिले आहेत, खालील स्थळावर ते वाचता येतीलः


http://marathihaiku.blogspot.in/

काही निहोंगो( जापानी) हायकूंचे अनुवाददेखील केलेले आहेत, ते ही इथे बघता येतील.

गझल

समजांची खोळ गळुन पडणारी
ओळख एकेक खरी पटणारी

एखाद्या वेडाची जात अशी
रक्तातुन शीळ जशी घुमणारी

जन्माचा डोंब उठत जाणारा
इच्छांची भूक सतत जळणारी

कोणाच्या येण्याची आस तिला
एकाकी वाट कुणी बघणारी

रणरणते आज आपले जीवन
माध्यान्ही धूळ जशी उठणारी..

अनंत ढवळे

Tuesday, December 15, 2015

रेखेची वाहाणी

रेखेची वाहाणी
॰॰॰॰

हे म्हणणं
की आपण चाललोच नाही
अफाट समुद्राच्या लाटांवरून

किंवा हे
की लगडू आलेत डहाळ्यांवर
नवे हंगाम

सुटलेच नाहीत खोलवर रुतून
बसलेले प्रश्न
की
पडल्याच नाहीत विवंचना
रस्तोरस्ती पसरलेल्या


अजब द्वंद्वात अडकून पडलेली
आजची रात्र
वाहात जाते आहे
रेषेरेषेतून
अमर्याद

--

 अनंत ढवळे


Sunday, November 29, 2015

गझल

एक गझल, सध्याचे अनियंत्रित जीवन, माध्यमांद्वारे होणार ब्रेनवॉशिंग इ. इ. :

-

हे इथेतिथेचे चिंतन माझे नाही
माझे जगणेही माझे जगणे नाही

मी उसने ऐकत बोलत वागत असतो
बोलतोय मी जे माझे म्हणणे नाही

गेलीत पुढुन दृष्ये मोहक अलबेली
पण वेग असा की बघणे जमले नाही

इच्छेचा आलम पसरत जातो येथे
हा मार्ग असा की येथे थकणे नाही

बव्हंशी गोष्टी पडद्यामागे दडल्या
मी उगाच म्हणतो आहे, होते, नाही..


अनंत ढवळे


गझल

वाट बघत बसलेत जगाचे मंच हजार
मी किमया हरवत जाणारा किमयागार

दृष्य असे जे बदलत जाते सतत पुढ्यात
मी उगाच जोडू बघतो तारेला तार

दु:ख जसे अव्यक्त तसे आयुष्य महान
हे आदिम निर्वंश तसे ते अपरंपार

बिंदूचा समुद्र होण्याचे काय बखान
आरपार पसरून राहिलेला विस्तार

जन्म कुणाचा जगतो आपण क्षणाक्षणात
मनामधे कुठल्या दु:खाची संततधार..


अनंत ढवळे

(चौथ्या शेरात काहीसा बदल केला आहे )

Saturday, October 31, 2015

द टॅंकमेन

द टॅंकमेन

तसा हा काळ
साम्यवादासाठी अनुकूल नाही
पण चालूच असतात
डोक्यातले मोर्चे आणि हरताळी

नापिकी, आत्महत्या
असहिष्णुता
अजूनही आहेतचकी उरलेली
चळवळींसाठी पूरक कारणे;
रस्त्यावर येवून
नुसत्या हातांनी
रणगाडे थोपवून धरण्याइतपत धैर्य दाखवण्याची

पण आपणही अजब साम्यवादी आहोत
दिवसरात्र घरात बसून
चमकदार फोनवर
निषेधाची भडक बावटी फडकावणारे ....

अनंत ढवळे

Tuesday, October 20, 2015

आभार

ह्या ब्लॉगला जगभरातून आवर्जून भेट देणाऱ्या  सर्व वाचकांचे मनापासून आभार. मूळात गंभीर कविता, गझलेचा एखादा ब्लॉग इतकी वर्ष चालावा ( आठ वर्षं होऊन गेलीत ) ह्याचे श्रेय इथे नियमितपणे येणाऱ्या वाचकानाच जाते.

माझ्या विनंतीला मान देवून इथे येणाऱ्या लेखक, समीक्षक आणि वाचकांचेही आभार 

Monday, October 19, 2015

गझल

खोळ बनते आपले कळणे असे
जे जसे असते उरत नाही तसे

ह्या जमीनींवर कुणाची मालकी ?
वारसे नसतात तुमचे वारसे

जे समजले आणि जाणवले तुला
त्यापुढे नसतेच काही फारसे

ह्या भ्रमातच लावले आख्यान मी
ऐकण्यासाठीच जग बनले जसे !

अनंत ढवळे

98230 89674
anantdhavale@gmail.com

उत्सव

उत्सव

दूरवर आग आहे
चन्द्र आहे - सृजनाचं मेहूण
जडले तुटण्यासाठी
तुटलेलं जोडण्यासाठी
मनात हजारो गोष्टी आहेत ताडून बघण्यासाठी
येथून पुढे सुरू होईल जग
किंवा संपेलही;
हे अजब मैथून
संघर्ष, उत्पात आणि विनाशानंतर
उमलून येतील जीव
एखाद्या विशिष्ट इच्छेनुसार
किंवा तिच्या अभावानुसार

हा मधला टप्पा
इथे संपतील किमान काही रस्ते
काही लहानसहान गोष्टी
हे वीतभर अंतर
ढीगभर अनुभव;
ही एव्हढी माणसं - माझ्या इतकीच
तात्कालिक अस्तित्वावर प्रसन्न, उल्लसित
हा कसला उत्सव आहे ?
हे कसले उन्माद आहेत ?
काळाच्या विस्तीर्ण काठांवर
हे होवून गेलं असेल हजारदा
पुन्हा एकदा होण्यासाठी
जितकी भव्य सुरूवात
तितकाच भव्य शेवट;
अनभिज्ञ मी
माझे लोक
माझ्या लोकांचं अर्जित अनर्जित ज्ञान
हजारो पाश
आणि ह्या पाशांमध्ये गुंतून पडलेली जाण;
जे दिसतंय त्याहून अधिक अनुमेय आहे
आज रात्रीच्या ह्या विलक्षण अंधारात
मला दिसून जातं आहे
न दिसलेलं
मी आश्रित आहे,
आश्रय आहे
आश्रय देणाराही मीच
ह्या दोन टोकांदरम्यान
मी वर्षानुवर्षं धावत आलो आहे
माझ्या पायांमध्ये
साकळलं आहे
परंपरेचं रक्त
आणि जीवनाचे शेकडॊ हंगाम;

अंधारात
बहुतेक गोष्टी बुडून पडल्या आहेत
पण मी भीतीचा त्याग केला आहे;
सदैव सोबत चालणारं
श्वासांमधून वाहणारं भय
मी खूप मागे सोडून आलो आहे
ह्या रात्रीचं निळेपण
अधूनमधून वाहणार्‍या वार्‍याचं
निरीच्छ सळसळणं
एकसंध होवून माझ्या गतीत मिसळून गेलं आहे
मी मोजून पाहतो आहे
(आणि मीदेखील सांख्य बनलो आहे)
मोजणं शक्य नाही, तरीही
अव्यहार्य, अनावश्यक आहे
तरीही.

अनंत ढवळे

Sunday, September 27, 2015

एक कविता

एक कविता
****
तर ही तीच विवंचना आहे
जी तू आणि मी वेगवेगळ्या जगांमध्ये राहून अनुभवतो आहोत
आपल्या सभोवती व्यापून असलेलं जग
जितकं आभासी तितकंच खरं
शारिरिक वेदनेइतकं ठसठशीत
आपापल्या जगात होरपळून निघतात माणसं
प्रत्येकाची एक कथा, एक चरित्र आहे
आपण भेटलो नसूत बर्याच वऱ्षांमध्ये
आणि ह्या दरम्यान साधी खबरबात देखील मिळालेली नाही
काय काय घडून गेलंय ह्याची
पण मी समजू शकतो
गोष्टी घडत जातात
आणि शंभरातले नव्व्याणव
वाहत जातात गोष्टींसोबत
कुठल्याही संघर्षाशिवाय 

अनंत ढवळ

Tuesday, September 22, 2015

1

दृष्य असे जे बदलत जाते सतत पुढ्यात
मी उगाच जोडू बघतो तारेला तार

जन्म कुणाचा जगतो आपण क्षणाक्षणात..
रातनदिन कुठल्या दु:खाची संततधार

अनंत ढवळे 

Tuesday, September 1, 2015

दोन शेर

जगामधे राहून बळावत जाणारी
जगापुढे धुडगूस घालण्याची इच्छा

तुझ्या निरोपातले आर्त जपण्यासाठी
पुन्हा एकदा गाव सोडण्याची इच्छा


अनंत ढवळे

Friday, August 28, 2015

संवाद

आर्काईव्ज मधून:

हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये बोलू नये

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये...

अनंत ढवळे  

Wednesday, July 22, 2015

बोल

बोल
....
अंधारा दिवस
आभाळ झाकळे
मनावर चढे
जशी ओल

येथून तिथे हा
चालला कारवां
आपल्या सोबत
थंड वारा

दिसू म्हणे वाट
धूके दिसू नेदी
अजब झगडा
चाललेला

म्हणू म्हणे बोल
म्हणू दे न कोणी
बोल बसलेला
गोंधळून

इथे तिथे घुमे
आपला आवाज
ऐकू ये न काही
दूर दूर

बाहेर पडले
आतले संदेह
आकाशाला गेले
लगबग


चल वाहू शब्दे
आपले कथन
भरो येई जन्म
भरू दे बा...

अनंत ढवळे

Tuesday, July 14, 2015

गझल

ठाव घेतो कोण जन्माचा असा
रंग नाही एकही ज्याचा असा

एक आत्मियताच असते शेवटी
काढला मी अर्थ प्रेमाचा असा

ठाव घेतो कोण दु:खाचा असा
रंग नाही एकही ज्याचा असा

आणते वाहून जे भेटेल ते
वाहण्याचा धर्म पाण्याचा असा

आपल्या सोबत वळावी वाटही
हट्ट आहे चालणाऱ्याचा असा

एकदा जे सोडले ते सोडले
खेद करणे व्यर्थ मोहाचा असा

एक आत्मियताच असते शेवटी
काढला मी अर्थ प्रेमाचा असा

---

अनंत ढवळे















Friday, June 26, 2015

काफले

काफले  दूरवर निघाले जी
जीव धुकधूक होइ हाले जी

गूज दुनियेसमोर आले जी
काय वाऱ्यासवे उडाले जी

आप जर राहिलास तू मागे
काय म्हणतोस काय झाले जी

काय दुरगत तुझ्या इराद्यांची
उन येताच वाफ झाले जी

बोलिजे काय आपली गाथा
मोठमोठे कवी बुडाले जी

अनंत ढवळे 

Saturday, June 20, 2015

शर्यत

फेसबुकवरचा गझल गदारोळ उबग आणणारा आहे . गटबाजी, बोगस प्रतिक्रिया, इलमबाजी  इ.ना तिथे प्रचंडच उधान आलेलं आहे . त्यात गंमत ही, की आपली इच्छा असो अथवा नसो , आपण ह्या सगळ्याचा भाग बनत जातो. ह्या सगळ्यावर तिथे राहून टीका करण्यापेक्षा तिथे काही दिवस न जाणंच सेंसीबल आहे असं वाटून मी माझं फेस्बुक खातं सध्या बंद केलं आहे. . गंभीर लेखनासाठी लागणारी शांतता आणि स्थिरता ह्या सोशल माध्यमांमुळे हरवते असा माझा समज होत चालला आहे .

नेहमीच म्हणतो मी नाही तुमच्यामधला पण
तुमची शर्यत पाहत असतो खूपच गमतीने

अनंत ढवळे

Monday, June 8, 2015

काही शेर

काही शेर :

मी लिहेन , वाहतील वारे*
ह्या उप्पर अभिलाषा नाही

जमलेही असते लोकांशी
मी प्रयत्न पण केला नाही

जमीन माझी , माझी भाषा
काळ अरे पण माझा नाही

इथवर आलो, हे ही ठीकच
हा प्रवासही सोपा नाही...


अनंत ढवळे

* मी लिहिल्याने वारे वाहतील अशी दर्पोक्ती नसून , वाहणे हा जसा वाऱ्याचा स्वभाव  , तसा लिहिणे हा माझा स्वभाव, तितक्याच सहजतेने मी लिहीत जाईल; ह्या गोष्टीमागे इतर कुठलाही हेतू नाही असा अऱ्थ अपेक्षित  

Sunday, May 17, 2015

समजले

जे समजले आणि जाणवले तुला
त्यापुढे नसतेच काही फारसे ...

अनंत ढवळे 

श्रेय

श्रेय मिळाले नाही ह्याची खंत कशाला ?
वाट बनवली आपण हे ही नसे थोडके

अनंत ढवळे 

Saturday, May 9, 2015

अवस्थांतर

एक अवस्थांतर जे आहे नित्य सुरू
एक दुवा भंगून पुन्हा जुळतो आहे

अनंत ढवळॆ

ठिबकतो

तुझी चिंता तशी डोक्यात घुमते
ठिबकतो नळ जसाकी सतत कोठे...

अनंत ढवळे

महानगर

महानगर तुडवीत चालते वर्षांना 
रस्त्यांसोबत जीवनही गुंतत जाते ..

अनंत ढवळे

महानगर

जस-जशा मनातिल वस्त्या वाढत गेल्या
हे महानगर तसतसे बकालत गेले..


अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...