Monday, February 24, 2020

1

एक लाईट गझल

--

उगा रेंगाळण्याची मौज होती
अहेतुक बोलण्याची मौज होती

जुने संदर्भ, दरवाजे, कमानी
शहर धुंडाळण्याची मौज होती

कधी सरसावुनी बाह्या जराशा
धमक अजमावण्याची मौज होती

उन्हातान्हात मिरवत स्वस्त गॉगल
दिवस थंडावण्याची मौज होती

तसे कारण खरे काहीच नव्हते
जुने धुडकावण्याची मौज होती

कसे लक्षात इतके राहिलेले ?
खुणा सांभाळण्याची मौज होती



--
अनंत ढवळे

Sunday, February 2, 2020

1

काही तुमच्या झाल्या काही माझ्या झाल्या
काळासोबत भल्या-बुर्‍या आवृत्त्या झाल्या

बदलत गेलो आपण दुनिया बदलत गेली
नाव - गाव जन्माच्या बाबी उपर्‍या झाल्या 

न्याय द्यायला उतावीळ झालेला जो तो
प्रत्येकाच्या  आपआपल्या व्याख्या झाल्या

काय तुझ्या ह्या रसाळ गोष्टींची नवलाई
हातोहात पसरल्या ह्याच्या-त्याच्या झाल्या

बोलत बसलो, किती तरी दिवसांचे साचण
कलू लागले  ऊन सावल्या मोठ्या झाल्या

--

अनंत ढवळे

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...