Sunday, February 26, 2017

तपशील

चाळिशीजवळ जाण्यातला भाग म्हणजे
तुम्ही तिशीपासून फार लांब नसता
आणि मागे पडून गेलेले असतात
विशीतले उनाड दिवस

मागे वळून बघण्यासाठी
बर्‍याच गोष्टींची
बेगमी झालेली असते
आणि बहुतेकांना
सुचू  लागतात कविता

रटाळ नोंदी
जुने  सिनेमे, अवघड पुस्तके
आणि  इतर बेरंग तपशीलांमध्ये
अडकून पडण्याचे वय

अधून मधून
जमा खर्च
कमाईचे हिशेब
दुरावलेले लोक
शहरे
आणि हरवलेल्या श्रेयाचे
पुसट उद्वेग

मरण
तसे कुठल्याच वयाहून दूर
किंवा जवळ नसते
पण हे वय
तसे मध्यम आहे
की जगून झालेले असते बर्‍यापैकी
आणि उरलेले देखील

__

अनंत  ढवळे


Saturday, February 18, 2017

भाषेची चौकट

गेले काही दिवस विरचनेबद्दल  ( Deconstruction )विचार करतो आहे. शब्दांचे रूढ अर्थ , त्या शब्दांमधून वहन होणारे संदेश आणि एकूण भाषेच्या चौकटीचे अर्थवाहित्व किंवा  निरर्थकता असे  काहीसे मुद्दे आहेत. Deconstruction ला  मराठीत विरचना अथवा विखंड असे म्हणणे योग्य ठरेल. डिकंस्ट्र्क्शनिजम असा शब्द वापरात नाही- त्यामुळे ह्या संज्ञेत ‘वाद' जोडणे योग्य ठरणार नाही

Thursday, February 16, 2017

Deconstruction / विरचना

भाषेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन गोष्टी  बघणे शक्यनसते, आणि शब्दांना कुठलेही निर्विवाद किंवा निखळ अर्थ नसतात. त्यामुळे बोलली गेलेली प्र त्येकच गोष्ट दुर्बोध आहे - किंवा वृथा बोधक आहे असे म्हणता येते.

Wednesday, February 15, 2017

मनोगत

कपडे खुंटीवर काढून ठेवलेले कधीचे
दारात बूट
घर संयमी म्हाताऱ्यासारखे
एकटक बघत बसलेले
वारा पडलेला
बाहेरची झाडे कमालीची निश्चल
वर अथाह निळेपण
आतल्या केशरी गडद अंधाराशी
वैर घेवून बसलेले

एवढा उशीर झालेला असताना
कुणाला फोन करावा
की निद्रीस्त असतील बहुतेक लोक
सुखासीन
निश्चींततेच्या भोवऱ्यात

ह्या अशा सुनसान रात्रींमध्ये
जिथे सापडत नाही
कुठलाही दुवा
ताडून बघण्यासाठी

आणि दुरावून
मनोज्ञ होऊन बसलेली असतात
आपलीच संथ मनोगते
दुरात हरवलेली एखादी लय शोधीत फिरणाऱ्या फकीरासाखी


अनंत ढवळे

  

Saturday, February 4, 2017

आभार

गेल्या महिन्याभरात ब्लॉगवर चार हजारांहून  पेज बघितल्याच्या नोंदी झाल्यात   भेट देणार्‍या सर्व वाचकांचे आभार..

There have been more than four thousand hits on this blog through the last month. A big thank you to all readers !

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...