Saturday, December 29, 2018

2

दीर्घ कवितेतला खंड, लयीत वाचा :

---

दिवस गोष्टीतल्या
किमयेप्रमाणे
निघुन गेलेत मित्रा

कदाचित थांबणेही शक्य नव्हते
कदाचित काळही अनुकूल नव्हता

निबीडते आपले निर्भर सहेतुक
जसे निर्वस्त्र उन्मादी बहकणे
भटकणे हे इथे तेथे निर्रथक
जसे बेकार सूर्याचे उगवणे

किती स्वस्तावले आहेत रस्ते
असे नव्हतेच कोसळणे, न उरणे
कडेलोटातली निव्वळ खुमारी
जसे अस्तास बेफिक्रे बिलगणे

अथाहत चालले आहे उणेपण
समर्पक केवढे
पोकळ तरीही
कशाची पूर्णता उरते निरंतर
सततच्या शून्यतेच्या आड येते
कुणाचे रक्त साकळते उन्हावर
निथळते आणि ओथंबून उरते


निथळते आणि ओथंबून उरते..

--

अनंत ढवळे


1

कदाचित थांबणेही शक्य नव्हते
कदाचित काळही अनुकूल नव्हता..

अनंत ढवळे

Monday, December 17, 2018

काही शेर

ह्या न त्या संभ्रमात जाणारी
रेघटी आखण्यात जाणारी


सार समजून घ्यायचे दुष्कर
पाहण्या पाहण्यात जाणारी

--

ह्या न त्या संभ्रमात गेलेली असाही पाठ आहे..

-
अनंत ढवळे

Friday, November 30, 2018

शोध

एक काहीतरीआहे जे शोधण्याचा प्रयत्न कवितेतून, कलेतून सतत सुरू असतो. त्याला गोष्टींचा अर्थ म्हणा अथवा उजेड. किंवा ह्या सगळ्यांचा अभाव.

Wednesday, October 31, 2018

अळुमाळू

हे दु:ख तुझे अळुमाळू
बघ दुनियेचा विस्तारू

सामोरी बघ चाकोरी
म्हण रीत-भात सांभाळू

भेलकांडतो जो दिसतो    
जगण्याची कडवट दारू

थांबलेत आडोशाला 
निघतील पुन्हा माघारू

तू घेजो माझी बोली
मग आप होय अनुवादू..... 

अनंत ढवळे



Monday, October 29, 2018

Tuesday, October 23, 2018

1

जोत्यावरचे ऊन पायऱ्या दगडांच्या
गतकाळाची चिन्हे निव्वळ रुतलेली..


अनंत ढवळे

Thursday, September 20, 2018

तर्‍हा


निघून जाण्यातली
तर्‍हा
जपून  ठेवलेली

निघून जाणे एरवी निर्बंध
असीम असलेले
त्याला
माहिती नसलेल्या मर्यादा 

मागे राहिलेले पडसाद
घरे - दारे  - डोंगरांवरून
कच्च्या रस्त्यांवरून
टाकून दिलेल्या
रेल्वे रुळांवरून

तुझी सुविख्यात असलेली गोष्ट
दूरवर उभी आहे
ती देखील
मागे पडत गेलेली

--

अनंत  ढवळे

Saturday, August 18, 2018

अल्गोरिदम

हा एक अल्गोरिदम माझ्याकडे
पाहून हसत असलेला

जगण्याचे गुणसूत्र वेडेवाकडे आकाशास भिडलेले
चल सोडवून बघूत,  सुटले तर

बाहू फैलावून  उभे विश्वाचे अफाट दार
दाराच्या दोन टोकांवर उभे आपण
अधेमध्ये  पसरून असलेले
गोष्टींचे असंख्य अपरिमेय  जाल


--
अनंत ढवळे

Saturday, August 4, 2018

गझल

एकही तडा वा रेघ उमटली नाही
माझ्यात जगाची नाहक पडझड झाली

संपते कधी ही ओंगळवाणी स्पर्धा
येतात नवे उन्माद जुन्यांच्या जागी

इतक्यात जमा  झालेत एवढे  धागे
वाटते नव्याने जडण-घडण होणारी

चल बेट बनू या महासागरामधले
एरवी अर्थ सापडणे शक्यच नाही

धादांत नवे वैयर्थ्य उमजणे आले
इतक्यात संपली गतकाळाची पांधी


--

अनंत ढवळे

Tuesday, June 5, 2018

स्वरांत यमक

स्वरकाफिया, स्वरयमक असे न म्हणता स्वरांत यमक म्हणणे अधिक योग्य ठरेल...



Sunday, May 20, 2018

1

चल बेट बनू या महासागरामधले
एरवी अर्थ सापडणे शक्यच नाही

अनंत ढवळे

Wednesday, April 25, 2018

2

लोक होते हुशार, म्हणणारे
स्वर्ण नाहीच हे चमकणारे

घोष चालू तुझा समष्टीचा
द्वैत माझ्या समोर झुलणारे

अनंत ढवळे

Monday, April 2, 2018

बरेच

बरेच काही आहे - जमलेले, जमवलेले
निरर्थक रूपके देऊन मी वेळ मारून नेऊ शकेन एवढी बेगमी

तुम्ही काय आणणार पुढे ते सांगा
पिढ्यांचा निरर्थक इतिहास  नको
काळाचे मिथकही ;
तुमच्या  व्यासंगांच्या सराईत पोतड्या
गुंडाळूनच ठेवा की गा; हे डोळ्यांपूढून आर-पार पसरलेले वाळवंट माझेच आहे
आणि त्या पलीकडचे समुद्रही

सगळे काही उठून उघडे पडण्याच्या काळात
कुठवर खेळणार आहोत आपण
हा लपछपीचा डाव ?

--- की पुरेसे पडणार नाही आहेत
हे प्रच्छन्नाच्या दारात उभे राहून
दारे उघडून देण्याचे सोस


--

अनंत ढवळे

Wednesday, February 28, 2018

1

आवर्तन बनलेले आहे शून्य जसे दुनियेच्या संघातावर वा बुद्ध उभे दिसणार्‍याची महता आहे खूपच पण पूर्ण बनत जाते आहे न दिसलेले बोल असंबद्धाची मिळकत खूब ठरो यंदा करून पाहू म्हणतो जे जमते स्वप्नामधले स्वप्न खरे नव्हते बहुधा वाटेवर उरलेले केवळ दोन ठसे जाग पुरेशी आलेली आहे आता धरून पाहू सावधतेची अपरूपे... - अनंत ढवळे

Sunday, February 11, 2018

1

वेडेपणात रंग गवसले किती-तरी
थोडे उजाडताच हरवले किती-तरी

संदर्भहीन होत चाललेत चेहरे
येतो विचार लोळ निववले किती-तरी

रेंगाळलो जराच खिन्नतेमधे तुझ्या
इतक्यात आरपार बदलले किती-तरी

चल विस्कटून टाक खेळ एकदा पुन्हा
मग लाव हे पुराण, बिनसले किती-तरी

माझ्यात थांबलेत सूर्य शेकडो जसे
माझ्यासमोर काळ धुमसले किती-तरी
-
अनंत ढवळे

Thursday, February 1, 2018

माती

माती

--

माती
अंगाखांद्यावर
हातापायांवर
मेंदूच्या खाचखळग्यांत

माती
हवेत, आभाळात, पानांपानांवर
वर्षे झाकोळून
इतिहासाचे ओझे,
हिंसा, करुणा
बांधावरची वैरे
वितुष्टे होऊन

काही एक ओळख देणारी
आणि काढून घेणारी
गोष्ट; जीवितावर पसरलेल्या 
अनुत्खनीत सत्याची 
चादर बनून

माती माती
आदिमाये
वाहत - वादळत ये
मला गिळून घे

--
 
अनंत ढवळे

2007

Sunday, January 28, 2018

गझल


वेडेपणात रंग गवसले किती-तरी
थोडे उजाडताच हरवले किती-तरी

संदर्भहीन होत  चाललेत चेहरे
येतो विचार लोळ निववले किती-तरी

रेंगाळलो जराच खिन्नतेमधे तुझ्या
इतक्यात आर पार बदलले किती-तरी

चल विस्कटून टाक  खेळ एकदा पुन्हा
मग लाव  हे पुराण,  बिनसले किती-तरी

माझ्यात थांबलेत सूर्य शेकडो जसे
माझ्यासमोर काळ धुमसले किती-तरी

--

अनंत ढवळे

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...