Sunday, November 28, 2010

दुर्दिन

दुर्दिन

एव्हाना
विरघळून गेलेले असते
आत्मकथेतील अक्षर न अक्षर
दाराशी कुणी उभा असतो
वैकल्याची बखर घेऊन
ती वाचायची

कुणीतरी मागत असतो हिशेब
प्रलयाचा दिवस उजाडल्यासारखा
त्याला काहीबाही सांगून टाळायचं

गवाक्षापलीकडच्या पोकळीत
उगाच चमचमत असते खूप आधी निसटून गेलेल्या मोत्यांची माळ
तिच्या समोर आडवी धरायची आपली सावली

काही लोक धावून येतात पेटते पलिते घेऊन
किंचाळत
त्यातला एकेक चेहरा निरखून पाहायचा

डोंगर दऱ्या झाडे पुस्तके
फडफडू लागतील अंतिमाच्या वाऱ्यावर
पुनः पुनः घोंगावू लागतील
आपणच लिहिलेल्या ओळी

दोन हजार वर्षांमध्ये
क्वचितच येतो असा दुर्दिन
कुणी महर्षी बोलला होता

अनंत ढवळे
2006

निमग्नाच्या खिडकीशी..

क्षुब्धाळल्या पाण्यात उठलाय एक पोरका स्वर
विजनातली पावले कधीच परतून आलेली इथवर

कुण्या जन्माचा संबंध, वाजत गाजत जातोय पश्चिमेस
अनाथ घोगर घंटांचा धुराळला कबंध

सोडवत नाही म्हणतोस गाव मिटवत नाही म्हणतोस खूण
रक्ताळल्या शतकाच्या वेशीवरील माळवदाचा खण

नाही नाही नाही हा भास गेला नाही दूरवर
स्वरमंडळाची ही थरथर हलक्याशा स्पर्शाने

लिहिशील लिहिशील लिहितं जाशील हिरण्याच्या अपवर्तनांवर
तुझ्या डोळ्यांचे अनावर पाझर, निमग्नाच्या खिडकीत बसून एकट्याने

विरघळली वितळली ही घटिका घड्याळाच्या काट्यांतून
आर्तावलेली रामधून, चिरत गेली हिमार्णवाचा ऊर

किती आत धुमसली होती या औदासीन्याची तान
कुणी रडत गेला सुनसान शून्याच्या व्यासावर

मी ऐकत गेलो ऐकत गेलो खूप दूरवर
पायाशी एव्हाना वादळी गरगर पाचोळ्याची

निमग्नाच्या खिडकीशी घुमतोय किरमिजी डोळ्यांचा थवा
लाऊन येशील एक दिवा मंदिरात

अनंत ढवळे..
2006

रात्रीच्या या संदिग्ध प्रहरात...

रात्रीच्या या संदिग्ध प्रहरात
कुणाला बोलावताहेत
झाडांच्या निश्चल सावल्या..?

अनंत ढवळे

सापडता सापडत नाही...

सापडता सापडत नाही
या वेदनेचे दुसरे टोक
या जन्माचे अन्य नाव


अनंत ढवळे..

प्रतीक्षा...

प्रतीक्षा...


बाहेर
एव्हाना थांबली असेल
क्षणांची रहदारी
रुतला असेल काळ
कोपऱ्यावरच्या चिखलात
बाहेर
एव्हाना सुटली असेल
हवेची पंचवीस घोड्यांची वरात
शून्याकडे, थांबली असती जर याचवेळी ही धडधड
तर तिने वाचलेही असते मृत्यूचे सूत्र
आणि घरंगळत गेलो असतो मी ही
शून्याच्या कुक्ष्यारण्यात
बाहेर
एव्हाना साचले असेल चंद्र तारकांचे तळे
तरळत असतील प्रकाशाचे दूत
लहानशा तळ्यांत
किती खोलवर चिरत जातेय
नीरवतेच्या किड्यांची ही किरकिर
आणि मी
तुझ्या एका शब्दावर
वाट बघत बसलोय उजाडण्याची
ही रात्र संपता संपत नाही
किती खोटा आहे तुझा दिलासा...
अनंत ढवळे
(पूर्व प्रसिध्दी - कविता रती / मूळ कविता आज पोस्ट करताना काहिशी संपादित केली आहे )

Saturday, November 27, 2010

उनाड पोरे भटकावीत रानोमाळ...

1.

उनाड पोरे भटकावीत रानोमाळ
तशा भटकत असतात
तिच्या आठवणी
उन्हातान्हात फिरून
मळकट होऊन
पोरे परतावीत घरी
तशा परतून येतात
काही धुरकट प्रतिमा
मग हात पाय धुऊन
पाटावर बसणाऱ्या निमूट पोरांसारख्या
शेजारी येऊन बसतात
तिच्या शब्दांच्या घुंगर मालिका
मेल्यागत झोपावीत
थकून भागून अवखळ पोरे
तशा डोळे मिटून घेतात
तिच्या इथे नसण्याच्या
तीन खिन्न जाणिवा...

२.

आई डबा देत बोलली होती काळजी घे
तिला झोप लागली नसेल रात्रभर
तिला जेवण गेलं नसेल अनेक दिवस
तिने बळेच ढकललं असेल काहीबाही पोटात
तू नाव कमावावंस किंवा पैसा मिळवावास
असं काहीच अपेक्षित नव्हतं तिला कधीही, तिला फक्त
पाह्यचा होता तुझा आनंदी चेहरा, तिला अजिबातच नको होतं
ट्रेनखाली चिरडलेला तुझा देह बघणं
आई डबा देत बोलली होती
काळजी घे.

3.


या झाडांच्या सावलीत अंग टाकावंस वाटतं
इथेच सोडून द्यावेसे वाटतात या रथाचे जखमी घोडे
बाहेर कुणीतरी सांडून ठेवलंय
उन्हाचं तेजाब
जाळून टाकलीए गवताची काडी न काडी
उसवून उचकून ठेवलीए
नांगरलेली जमीन
या झाडांच्या सावलीत अंग टाकावंस वाटतं
पानांपानांवरील रंध्रारंध्रातून विरून जावंस वाटतं
असण्यानसण्यापलीकडच्या प्रदेशात
जिथे शिजवावं लागत नाही रटरट रक्तमांस
किंवा मागावं लागत नाही घोटभर पाणी गावोगाव
जिथे होत नाही
आपली उभी हयात पंथानुगामी
या झाडांच्या सावलीत अंग टाकावंस वाटतं
संपवून टाकावीशी वाटते
ही अंतहीन परिक्रमा...

अनंत ढवळे

मराठी गझलेच्या नावाखाली..

मराठी गझलेच्या नावाखाली आजवर अनेक चळवळी सुरू झाल्या आणि संपल्याही. या चळवळींमधून फारसं चांगल असं काही बाहेर पडलं नाही तरी मराठी गझलेचा प्रवाह मात्र वाहता राहिला. मला वाटतं एवढ श्रेय या चळवळींना दिलंच पाहिजे. मी औरंगाबदेत असताना मराठवाडा गझल प्रतिष्ठान नावाची एक हौशी संस्था मी आणि माझे काही कवी मित्र चालवत असू. ही चळवळ अर्थातच बिनपैशांची चळवळ होती. औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरातील मराठी- उर्दू कवींना एकत्र आणण्याचे काम या चळवळीने चोख पार पडले. पुढे मुंबईच्या एका संस्थेने औरंगाबादेत एक गझल संमेलन घेतलं. मगप्र चा या संमेलनासाठी आर्थिक नसला तरी नैतिक आणि सांस्कृतिक आधार होताच. मी या सर्व कार्यक्रमांमधून हिरिरिने सहभागी होत होतो.. नंतर कधीतरी असं जाणवलं की या चळवळींमधून फार काही साधणार नाहीए..शिवाय रा.ग. जाधवांचा'चळवळींचे साहित्य ' हा लेख वाचनात आला...साहित्यविषयक गंभीर भूमिका बाळगणार्‍यांनी हा लेख अवश्य वाचावा..

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...