Sunday, December 23, 2007

marathi gazals

आई जेंव्हा जाता जाता रडली होती
काही पाने वार्‍यावर थरथरली होती

पुढ्यात होता आयुष्याचा उजाड वाडा
माझी छाया खिन्न मनाने बसली होती

वर्षांमागुन वर्षे विचार करतो आहे
चूक कुणाची , कशी कुठे ती घडली होती

अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती

कुणीच नव्हते आले निरोप देण्यासाठी
माझ्यामागे धूळ जराशी उडली होती....
अनंत ढवळे..

7.
निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली

तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...
अनंत ढवळे..

8.एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली

कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली

जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली

कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली

फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........

अनंत ढवळे..

(all gazals are protected by cpopyright
cpyright hold by anant s. dhavale
any re print wthout prior permission would be subject to leagal action...)


या गझला
http://www.sureshbhat/. in याठिकाणी देखीलप्रकाशित झाल्या आहेत ..
मराठी गझलेसंबधी विविध चर्चा , लेख आणि नवीन गझला वाचण्यासाठी अवश्य भेट द्या
http://www.sureshbhat.in/ !!
.

0 comments: