Saturday, June 26, 2021

विष

 कसलं जहाल विष 

मारत चाललं आहे हळूहळू आपल्याला

आपल्या रक्तातून 


कुठली भाषा 

मरत चालली आहे 

रात्रंदिन

आपल्या कंठातून 


चरित्रे फडफडू देत 

ह्या भयंकर वाऱ्यात

उन्मळून पडू देत 

ही झाडे 

चहूदिस


उद्या उठतील पुन्हा 

दिशा 

घेवून तेच ते संदेह

की

मी उभा आहे 

संदेह 

आणि उजेडाच्या मधोमध


आणि पडत जातील दिवसांचे रतीब

मी उभा आहे 

संदेह 

आणि उजेडाच्या मधोमध

तोवर.



अनंत ढवळे


(स्पिल्ड इंकच्या कवितावाचनात आज ऐकवलेल्या माझ्या इंग्रजी कवितेवर आधारित)

Sunday, June 20, 2021

1

आपल्यासाठीच बनले जग उभे डोळ्यांपुढे 

आपल्यापुरता प्रलय डोळे पुन्हा मिटण्यातला


-

अंनत ढवळे 


 

गझल

एक जुनी गझल :


दु:ख विसरून गायचे होते 

आज मजला हसायचे होते 


स्वप्न का भंगले अवेळी ते 

रंग अजुनी भरायचे होते 


नाव ओठांवरी तुझे आले 

प्राण जेंव्हा निघायचे होते 


येथ छाया तिथे उन्हे उरली 

हेच मागे उरायचे होते 


आज तेथे कुणीच का नाही 

जेथ घरटे फुलायचे होते 


-


अंनत ढवळे 


अवांतर : या गझलेच्या  जमिनीत अनेक नवे कवी गझल लिहिताना दिसत आहेत.  हरकत नाही, पण  तसा उल्लेख करणे अपेक्षित  आहे. 



Friday, June 11, 2021

सावधतेची अपरूपे

 


बऱ्याच उशीराने का होईना, २००६ ते २०२१ अशा प्रदीर्घ कालखंडात लिहिलेल्या गझल संकलित करतो आहे. पन्नास-पंचावन्न गझलांचा हा संग्रह येत्या वर्षभरात कधीतरी येईल, प्रकाशक अद्याप ठरवलेला नाही. सोबत 'मूक अरण्यातली पानगळ' आणि 'मीर' या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्त्या करण्याचा देखील प्रयत्न राहील. पैकी 'मीर'च्या पहिल्या आवृत्तीत प्रुफांच्या खूपच चुका राहून गेल्या होत्या. घाईघाईत लिहून स्वतःच प्रकाशित केल्याने जे सगळे प्रकार होऊ शकतात ते सगळेच या पुस्तकाच्या बाबतीत होऊन गेले होते. आधीच्या कामात काही आणखी भर घालून, मीरच्या काही अधिक गझल समाविष्ट करून पुस्तकाचा पट वाढवण्याचा विचार आहे. बाकी पानगळीची पहिली आवृत्ती येऊन आता सोळा वर्षं उलटली आहेत. या दरम्यान फार काही लिटररी काम होऊ शकलेले नाही ह्याची खंत निश्चीतच आहे . ही कामे पूर्ण होण्यासाठी स्वतःवर थोडा दबाव राहावा म्हणून ही नोंद 🙂.

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...