Saturday, December 30, 2017

POST

सेल्फी

तुटून पडलेल्या काचांसारख्या 
इथे तिथे,
गावभर
किंवा भ्रांततेच्या

विमनस्क गुंतावळीच्या

सेल्फी
स्वत:ला शोधण्याच्या नादात
भरकटल्यासारख्या

भिंतीवर पडलेल्या

हरवल्यासारख्या

सेल्फी पसरलेल्या,
फोनभरून
अनावश्यक

-
अनंत ढवळे

Thursday, December 28, 2017

1

एक जुनी गझल अष्टाक्षरीतली, माझ्या संग्रहातून :

--

सांज रुतली नभात
कुठे थबकली रात 


लख्ख  विजेपरी भासे
पोर उभी पावसात


किती गोंधळ उडाला
पान पडले पाण्यात


फुटो प्रतिभेला पुन्हा
सुटो माझे अश्व सात



--

अनंत ढवळे

Wednesday, December 20, 2017

1


एकमेकात गुंतले थोडे
शेवटी भेद राहिले थोडे

आपले काम एवढे बहुधा
भार रस्त्यात वाहिले थोडे

खेद नाहीच फारसा याचा
जोडले व्यर्थ जोडले थोडे

खूप होते निघायच्या वेळी
शेवटी संग राहिले थोडे

भेटल्याने प्रकार हा झाला
आणखी प्रश्न वाढले थोडे

व्यर्थ ही सारखी तुझी चिंता
थोर  म्हणतात साधले थोडे

-
अनंत ढवळे

ह्या लयीत अनेक वर्षांनी   लिहिले आहे..   येथ छाया तिथे उन्हे उरली / हेच मागे उरायचे होते अशी एक जुनी गझल आहे

Saturday, December 9, 2017

जुने शेर रिपोस्ट #१

खूप दूरवर आलो आपण असे वाटते
वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता

आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी
तुला समजलो, कुठे समजली तुझी सहजता..


अनंत ढवळे  

जुने शेर रिपोस्ट # २


अवती भवती जंगल होते नात्यांचे पण
जगण्यासाठी एक डहाळी पुरली होती
+
काय या गावात होते आपले
पाय का मागे वळावे सारखे
+
सांगते निर्व्याज हे हसणे तुझे
आपले अस्तित्व नाही बेगडी
-
अनंत ढवळे

Tuesday, November 28, 2017

बहुतेक दिसांची धुळवड पडते मागे
मग कोण पाहतो काय राहते मागे

ही परंपरेची धूळ उडत जाणारी
चुपचाप जशी की छाया फिरते मागे

आश्चर्य, संपते बाब समजण्याआधी
बस धडपडण्याची महती उरते मागे

लिहिणारा लिहितो चालत जाणे , पण ही
जगण्याची उतरण नाहक बनते मागे

हे मूल्य चुकवणे योग्यच झाले बहुधा
निष्णात आपली वृत्ती हसते मागे 

अनंत  ढवळे




Saturday, November 4, 2017

तर्‍हा

आपण तेंव्हा नादान होतो आणि तो काळही अवघड होता

बरेचदा मूर्खपणातून आलेली
बेफिकिरी हावी होत असायची
आणि
शिकारी जसे नेम धरून टिपत असतात शिकार
तशी आपली शिकार झालेली असायची
बहुतेक पातळ्यांवरून  


पण
ही बेतल्लख नादानी
शोभून दिसत असावी त्या दिवसांमध्ये    
आणि प्रसिद्ध ठरून गेलेली असावी
ठोकर मारून बेदरकार निघून जाण्याची;
परत मागे न बघण्याची तर्‍हा


--


अनंत ढवळे

Saturday, October 28, 2017

परत


अल्लड वयातली
दिवस वर येईतो
प्रिय झोप

उन्हाच्या दोरीवर गाठ
तिरीप
गजांतून पडलेली

आणि
वर निघालीत
यंदाच्या मोसमात
मुळे

पुढे सरकलेत गाडे
प्रतिगमन
म्हणता-म्हणता

जगण्याचा धबडगा
झोतातून
उगमाकडे
परततो आहे
--
अनंत ढवळे

Tuesday, October 24, 2017

समकालीन गझल अनियतकालिकाचे अंक

समकालीन गझल अनियतकालिकाचे अंक इथे उपलब्ध आहेत :


पहिला अंक :

http://home.iitk.ac.in/~chavan/samakalin%20gazal_first%20issue%20-%20main_final_3.pdf


दुसरा अंक :

http://home.iitk.ac.in/~chavan/samakalin%20gazal_second%20issue_final.pdf




Tuesday, October 17, 2017

ट्रेन


लोक कधीचे तयार बसून आहेत
सामान-सुमान बांधून
इथून पळ काढण्यासाठी


ट्रेन नेहमीप्रमाणे आजदेखील
दोन तास लेट आहे


-
अनंत ढवळे

Saturday, October 14, 2017

थोडी गंमत

माझा गझल संग्रह २००६ च्या सुरूवातीला आला. ह्यात स्वरयमकाच्या गझल भरपूर होत्या. तेंव्हा " ह्यात अनेक प्रयोग आहेत " " सौती काफियाच्या सुंदर गझला" ह्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या. त्यावेळी माझ्या मतांचा कार्यशाळांमधून, जालावरून, संमेलनातून प्रचंड विरोध झाला. अनेकांशी वाद झाले. आता नव्या पिढीने स्वरयमक इतका सहजगत्या स्वीकारला आहे की तो मराठीत चालतो की नाही अशी चर्चा करण्यास फारशी जागा उरलेली दिसत नाही. नवी जाणीव येताना नव्या गोष्टी घेऊन येते - त्यातलीच ही एक आहे

Friday, September 15, 2017

1

दररोज जसा की किंचित मरतो आहे...

दरखेप जशी की आणत आहे काही       
लाटांचे उठणे पडणे बघतो आहे

मी झालो बहुधा बहुतेकांचे जगणे
बहुतांची चादर बुनतो, विणतो आहे 

वैयर्थ्य आले चालत मागेमागे
मी व्यर्थपणाची खळगी भरतो आहे...


--

अनंत   ढवळे 

Sunday, September 3, 2017

गझल

स्वातंत्र्य दिवस, समाज, आपण इ.इ.



-----

पुढे गेलेत जे जाणार होते
कुढत बसलेत जे उरलेत मागे

तसे आश्चर्य नाही यात काही
पुढे गेलेत जे जाणार होते

तसे आश्चर्य नाही यात काही
कुढत बसलेत जे उरलेत मागे

दिला नाहीच जर का हात कोणी
पडत जातील ते मागेच मागे

तुझी माझी कधी नसतेच सत्ता
तुझे माझे कुणी दिल्लीत नसते

लढे झालेत कोणाचे कुणाशी
तुझे माझेच पण शिरकाण झाले

अजुन अर्धेच आहे स्वप्न बहुधा
उजळले गाव, पण अर्धे उजळले

नजाते ,पण नजाते हाक माझी
तिथे ऐकायला कोणीच नसते

__
अनंत ढवळे


नोंद  :या गझलेत "किता" ( कत'आ )आहे :

तसे आश्चर्य नाही यात काही
कुढत बसलेत जे उरलेत मागे

दिला नाहीच जर का हात कोणी
पडत जातील ते मागेच मागे

खरेतर पाहिले तीन शेर म्हणजे एकाच  शेराचे  एक्सटेंशन आहेत

+++

अजून एक उदाहरण:

उगाचच पाहतो आहे कधीचा मी 
ढगांसोबत भटकणारी निरर्थकता

निरर्थकता तरी  पुरते मला कुठवर
पुन्हा  शोधेन मी  कुठलीतरी  तृष्णा


अनंत ढवळे


---

Saturday, August 19, 2017

माझ्यासमोर एक खिडकी आहे

माझ्यासमोर एक खिडकी आहे
पलीकडे बाग
बागेत झाडे
निश्चल  उभी

काल रात्री बहुतेक पाऊस पडून गेलेला आहे
कौलांवरून निथळूनही गेलेला

खिडकीच्या पटांमधून
उतरून आले आहेत
सावल्यांचे  सम्यक  गुच्छ
उजेडाच्या काही
पारमिता

दूरवर उभे निळसर हिरवे डोंगर
त्यातून वाहत जाणारे
बिलोरी ओघळ
भगव्या- तपकीरी
पाऊलवाटा

अद्याप मी
सरावलेलो नाही
बदलत्या मौसमांना
चहुवार पसरलेल्या
सावकाश रंगसंगतीला

संदेह आणि सरळतेच्या
मधल्या पट्ट्यामध्ये
मी उभा आहे
कधीचा
सहभागी असून नसल्यासारखा

एवढ्यात आलेल नाही
कुठल्याही पत्राच  उत्तर
किंवा
पाठवल गेलच नाहीए
टपाल
पण म्हणून अडकून पडलेलेही नाहीत
संदेह किंवा सरळता


एवढ्यात , बाहेर
दिवसाची  खुडबुड  सुरू होते आहे
पंचवीस घोडे जुंपलेली  गाडी
भरधाव भरण्यासाठी
टाच लावून  तयार आहे.




--


अनंत ढवळे

दीर्घकविता - अजून लेखन सुरु आहे 

Saturday, August 12, 2017

गझल

स्वातंत्र्य दिवस, समाज, आपण इ.इ.
------



पुढे गेलेत जे जाणार होते
कुढत बसलेत जे उरलेत मागे

तसे आश्चर्य नाही यात काही
पुढे गेलेत जे जाणार होते

तसे आश्चर्य नाही यात काही
कुढत बसलेत जे उरलेत मागे

दिला नाहीच जर का हात कोणी
पडत जातील ते मागेच मागे

तुझी माझी कधी नसतेच सत्ता
तुझे माझे कुणी दिल्लीत नसते

लढे झालेत कोणाचे कुणाशी
तुझे माझेच पण शिरकाण झाले

अजुन अर्धेच आहे स्वप्न बहुधा
उजळले गाव, पण अर्धे उजळले

नजाते ,पण नजाते हाक माझी
तिथे ऐकायला कोणीच नसते


__


अनंत ढवळे


Sunday, July 30, 2017

गझल

रात्र, खिडकी आणि हे डोकावणे
मी, डिसेंबर आणि पारा गोठणे

स्तब्ध रात्रीचा प्रहर, डोक्यामधे
हरवलेले चेहरे आकारणे

आठवत बसणे तुझे गोष्टी जुन्या
मी उगाचच मग तुला समजावणे

लवकरच होईल जागे हे शहर
चल पुरे झाले तुझे रेंगाळणे

थबकली रस्त्यात भीतीने मुले
त्यात गाड्यांचे सतत गुरकावणे

पडत जातो दिवसरात्रींचा रतीब*
सूत वृद्धाने जसे की कातणे

--

अनंत ढवळे


* रतीब मध्ये एक अतिरिक्त लघु आहे. शेराच्या मोहात पडल्याने बदल केलेला नाही. उर्दू / हिंदी दोन्हीकडे अशी मात्रा पडण्याची उदाहरणे सापडतात.

Sunday, July 9, 2017

गझल - परिवेश, परंपरा आणि अर्थवत्तेची साधने

 झलेचा भारतीय उपखंडावरील प्रभाव स्पष्ट आहे. गेल्या दोन-तीनशे वर्षांच्या काळातील गझल लेखनाचा प्रभाव इथल्या जीवनावर आणि इथल्या जीवनाचा प्रभाव गझलेवर पडला आहे.  अनेक गझल, त्या गझलांमधले शेर लोकोक्तीचा भाग बनलेले आहेत, अजूनही बनत आहेत.  लोकजीवनात गझलेचे इतक्या मोठ्या प्रमाणावर रूळण्याचे काय कारण असावे?  ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित पौर्वात्य संस्कृतीत - आणि त्याहूनही अधिक इथल्या मानसिकतेत अथवा सामूहिक जाणीवेत दडलेले असावे. भारतीय तत्वज्ञान, भक्ती परंपरा आणि सूफी संप्रदायांची उदारमतवादी प्रेम-जाणीव ह्यांचा अनोखा संगम गझलेच्या चिंतनात झालेला दिसून येतो. भारतीय उपखंडातल्या लोकजीवनाकडे बघितल्यास असे दिसून येते, की इथला समाज अनेक पातळ्यांवर तुटलेला आणि विभाजित आहे.  धर्म, जात, भाषा, प्रांतिक अभिनिवेश अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण एक मोठाच सामाजिक विरोधाभास हाही आहे, की एक उदारमतवादी विचारधारा ह्या खंडप्राय देशाच्या उंचसखल जमीनीतून शतकानुशतके वाहत आलेली आहे. हे चिंतन, ही विचारधारा वेगवेगळ्या भाषांमधून उभ्या राहिलेल्या भक्तीपरंपरा आणि संतकवींच्या माध्यमातून आलेली आहे.  भक्तीपरंपरेतली प्रेमाची, साधेपणाची शिकवण ह्या उदारमतवादी सर्वसमावेशकतेचा पाया आहे. या चिंतनाचे काहीसे 'भौतिक' रूप गझलेतून उतरून आलेले आहे. भक्तीपरंपरेत प्रेम आध्यात्मिक पातळीवरचे तर गझलेतले काहीसे अधिभौतिक - किंबहुना ह्या दोन पातळ्यांच्या मधले आहे.

कविता आणि चिंतन ह्यातला मूलभूत फरक आहे की चिंतन (किंवा तत्वज्ञान) गोष्टींची व्याख्या करण्याचा, आणि त्या व्याख्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असते - तर कविता ही गोष्टींच्या - माणसावर, त्याच्या जीवनावर होणार्‍या परिणामाचा विचार करत असते. चांगल्या कवितेत हा विचार भावनेच्या किंवा निव्वळ कल्पनेच्या पलीकडे - जाणिवेच्या पातळीवर जाताना दिसून येतो.  गझल देखील ह्या गोष्टीला अपवाद नाही.  गझल ही रोमँटीक कविता आहे का?  ह्या प्रश्नाचे उत्तर हो आणि नाही असे दोन्ही देता येते. मी मागेच म्हटल्याप्रमाणे गझलेचा सुरुवातीचा तोंड्वळा पाहिला तर तो प्रियकराच्या व्यथित आणि अति भावनिक 'उद्गारांचा' दिसून येते.  त्यामुळे हे अति भावनिक उद्गार किंवा हुंकारयुक्त 'वक्तृत्व' म्हणजेच गझल आहे असा समज अनेकांचा होऊ शकतो.  पण हे गझलेचे सर्वंकष वर्णन किंवा स्वभाव नाही.  रोमँटीक कविता क्वचितच विचाराला प्राधान्य देताना दिसून येते. ह्या कवितांचे वैशिष्ट्य म्हणजे थेट भावनिक प्रतिक्रिया - आणि भावनेच्या पातळीवर निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कल्पना आणि प्रतिमा.  गझल अशी कविता आहे का?  तर नक्कीच नाही.  गझलेचा शेर क्वचित भावनेच्या पातळीवर जाणारा असला - तरी तो निव्वळ भावुक अभिव्यक्ती नसतो. वेदनेने विव्हळणे एक आणि त्या वेदनेचे मूळ शोधू जाणे दुसरे. मानवी जीवन अथाह आहे, माणसाचे स्वभावविश्व महासागराप्रमाणे विशाल आहे. व्यक्तीचे अनुभवविश्व आणि लौकिक जग ह्यांचा परस्पर संबंध शोधणे हा गझलेचा मूळ स्वभाव आहे; आणि तिचा गाभा चिंतनाचा आहे.  पण हे चिंतन रूक्ष तत्वज्ञानाच्या भाषेत नाही - तसेच ह्या चिंतनाचा कल गोष्टींची व्याख्या करण्याचा देखील नाही. अभिव्यक्तीमधली उत्कटता आणि मानवीयता राखूनच गझल हे चिंतन करताना दिसून येते. अपवाद प्रत्येक गोष्टीला असतात, गझलेतही आहेत.  निव्वळ भावनिक लेखन गझलेतही होतेच - पण त्यापलीकडे लिहिली जाणारी गझल बघणे ह्या दृष्टीने आवश्यक आहे. मराठी गझलेतली पहिली पिढी मात्र व्याज रोमँटिकतेच्या आहारी जाऊन बव्हंशी भावूक लेखन करती झाली हे ह्या ठिकाणी खेदाने नमूद करावेसे वाटते. ह्या पिढीने गझलेचा प्रवाह वाहता ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम केले हे मान्यच, पण आशय आणि विचारांच्या कसोट्यांवर ह्या पिढीचे लेखन तोकडे पडताना दिसून येते. सध्या मराठी गझलेत मुशायर्‍यांचा जोर आहे. या उपक्रमांमधून नवे कवी लोकपटलावर पुढे येत असले तरी निव्वळ भावनाप्रधान आणि लोकरंजनपर लेखनाकडे कल वाढत जातो आहे हे देखील नोंदवावेसे वाटते. 
       
मी कोण आहे? माझ्याभोवतीचे अफाट, प्रचंड वेगाने पुढे जाणारे जग आणि मी - ह्यांचा परस्पर संबंध कसा आहे? या जीवनाचे मूळ कारण काय आहे?  हे जग कुणी बनवले आहे?  गोष्टी अशा आहेत तर त्या अशा का आहेत? प्रेम, वासना, अहंकार, द्वेष, हिंसा ह्या भावनांचे मानवी परस्परसंबंधांमध्ये काय स्थान आहे? मानवी जीवनातील प्रचंड मोठ्या विरोधाभासाचे मूळ कशात आहे?  असे अनेक प्रश्न आहेत. काही प्रश्न मूलभूत जगाबद्दलचे आहेत - तर काही मानवी मनोव्यापारांबद्दलचे. विचार करण्याची तयारी असलेल्या कुठल्याही माणसाला हे प्रश्न पडतच असतात. ह्या प्रश्नांचा शोध घेण्याचे काम अनेक हजार वर्षांपासून सुरूच आहे. प्रत्येक भाषेतल्या मोठ्या चिंतकांनी, कवींनी ह्या प्रश्नांना हात घातलेला आहे - गझलेतही या प्रश्नांचे, ह्या अन्वेषणाचे प्रतिबिंब अनेकविध रंगांत पडलेले दिसून येते. फारसी गझलेकडून परंपरेने चालत आलेले चिंतनाचे विषय (फिक्र), प्रतिमा- प्रतीके उर्दू गझलेने हातोहात उचलून घेतले. ह्या दृष्टीने उर्दू कवींच्या चिंतनावर फारसी अरबी कवींच्या चिंतनाचा मोठाच पगडा होता - पण त्याहूनही अधिक प्रभाव सूफी विचारधारेतल्या वहदतुल वुजुद - म्हणजे अस्तित्वातल्या एकतेच्या मताचा (ईश्वराचे प्रत्येक गोष्टीत अस्तित्वआहे - किंबहुना ईश्वर हेच एकमेव अस्तित्व) होता हे लक्षात घेतले पाहिजे. सूफींचे हे मत वेदांत आणि बौद्ध तत्वज्ञानाशी काहीसे मिळतेजुळते आहे. मी आणि माझा प्रियकर, माझा देव एकच आहोत ही ती भावना.  महायान बौद्धांचा शून्यवाद; उपनिषदांनी सांगितलेला व्यक्तीचा ब्रम्हणातला विलय; आणि भक्तीपरंपरेतल्या विविध मतांचा इस्लाममधल्या सूफी परंपरेशी हा एकप्रकारे समन्वयच आहे. नागार्जुनाचे शून्य आणि वेदांत्यांचे निर्गुण ब्रम्ह ह्या दोन्ही गोष्टी अंतिमतः मिळत्याजुळत्या आहेत. शून्यवादाला मध्यम मार्ग असे देखील म्हटले जाते. सत्य आणि असत्य अशा दोन टोकांना मान्य न करता वस्तूंच्या निर्भर अस्तित्वास शून्यवादाने मानले आहे (conditional existence) - गोष्टींचा स्वभाव इतर गोष्टींवर अवलंबून असतो. अशी कुठलीच वस्तू नाही जी अन्य वस्तूवर अवलंबून नाही. गोष्टींची परनिर्भरता आणि अवर्णनीयता म्हणजे शून्य- कुठलेच अस्तित्व नसणे म्हणजे शून्य नसून, जे काही आहे ते वर्णनातीत आहे असे शून्यवाद मानतो. शून्य म्ह़णजे काय - तर जे सत्य नाही, असत्य नाही, सत्य आणि असत्य दोन्ही नाही, किंवा सत्य आणि असत्य दोन्ही आहे असेही म्हणता येत नाही.  ह्या अफाट अवर्णनीय अस्तित्वाचे गहन दर्शन गझलेतून सतत येत गेलेले आहे.  एकूण भारतीय दर्शन अफाट आहे. या दर्शनाचा प्रभाव गझलेवर न पडता तर नवलच. वेगवेगळ्या मतांचा, विचारधारांचा समन्वय गझलेतून अनेकविध रूपांनी झाला असल्याचे दिसून येते. ह्या व्यापक अर्थाने बघू जाता गझल ही समन्वयाची कविता आहे असे म्हणावे वाटते - हा समन्वय वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर झालेला आहे. भारतातल्या विविध भाषांना गझलेने आकर्षून घ्यावे ह्यामागे हा समन्वय, जीवनाकडे बघण्याची सहिष्णू आणि उदार दृष्टी कदाचित कारणीभूत असावी; आणि बहुधा हेच कारण असावे की गझलेत इथल्या मातीचा सुगंध दडलेला - रचला - बसला आहे.

मराठी कवितेला चक्रधर, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ अशी प्रदीर्घ परंपरा आहे.  ह्या परंपरेच्या परिवेशात आणि गझलेच्या भाषेत मराठी गझलेत चिंतन यावे ही अपेक्षा रास्त ठरेल. हे चिंतन तत्वज्ञानाप्रमाणे निव्वळ मूलभूत विश्वाचेच असेल असे नाही, तर व्यक्तीच्या अनुभवविश्वाचेही असेल. अट एवढीच, की जे लिहिलं जातंय तो केवळ वृत्तनिर्वाह नसावा - त्यात कविता हवी. मानवी मूल्यांचे, मानवी स्वभावाचे, जीवनातील विरोधाभासांचे चित्रण व्हावे.  मात्रा जुळवण्यासाठी किंवा मोजण्यासाठी कुठलीही प्रतिभा लागत नाही.  वृत्त हे गझलेचे साधन आहे, साध्य नाही, ही गोष्ट पुन्हा एकदा सांगावीशी वाटते.         
             
आता थोडेसे बोलूयात ते समकालीनतेबद्दल. समकालीन म्हणजे आताच्या काळातले, सध्याचे.  याहून अधिक संदर्भ ह्या संज्ञेला जोडण्याची गरज नाही. आताच्या काळात जगणार्‍या लेखकांचे लेखन; आणि गंमत अशी की, की हे लेखन जर मूलगामी असेल - तर ते कुठल्याही काळात समकालीनच ठरेल. मीर, गालिब आणि तुकाराम अगदी सध्याच्या काळात लिहित असल्यासारखे वाटतात. ह्याचे कारण काय असावे? ह्या कवितांचा पट इतका मोठा आहे की त्यात मानवी जीवनाचा प्रचंड आवाका सामावलेला आहे.  हा आवाका सामावून घेण्याच्या प्रयत्नात असणारे हे लेखन मानवी जाणिवेच्या मुळापर्यंत पोचते.  माणूस आणि त्याचा भवताल, त्याचे आयुष्य ह्याची सांगड घालू पहाणारे हे लेखन अनेक पातळ्यांवर फिरताना दिसते.  या स्तरांमध्ये वरवर दिसणारे भावनावेगही येतात आणि रेखीव- घडीव चौकटीच्या पली़कडे असणारे संभ्रम, विरोधाभास, भीती, द्वेष, अहंकार, वासना देखील. एकूण माणूस हा मोठ्या कवितेचा (किंबहुना कुठल्याही कलेचा) केंद्रबिंदू राहिलेला दिसून येतो: 

कद्र नहीं कुछ उस बंदे की

असे जेंव्हा मीर म्हणतो तेंव्हा त्याचा इशारा सामान्य माणसाच्या ओढाताणीकडे आणि विवंचनेकडे असतो. काळ कुठलाही असू देत, सामान्य माणूस नेहमीच हलाखीच्या परिस्थितीत जगत आलेला आहे.  कुठल्याही धर्माने अथवा राजसत्तेने सामान्य माणसाचे जीवन सुकर केलेले दिसून येत नाही. ह्या माणसाचे दु:ख, त्याचा दैनंदिन संघर्ष, त्याला कराव्या लागणार्‍या तडजोडी - आणि एकूणच त्याचे जीवन हा गझलेच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गझलेतून उमटणारी दु:खाची छटा ही या माणसाच्या दु:खाचे बखान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे हे 'अधिभौतिक' दु:ख आणि दुसरीकडे मानवाच्या अस्तित्वविषयक मूलभूत समस्या - एवढे प्रदीर्घ अंतर पार करणे मोठा कवीच जाणो. मीर जेंव्हा:

वर्ना मैं वही खिल्वती ए राजे निहां हूं

असे म्हणून अस्तित्वाच्या गहन प्रश्नांना सामोरे जातो तेंव्हा ह्या गोष्टीची प्रचीती येते. .
        
एकूण माणूस आणि त्याचे भावविश्व गझलेच्या संवादाचा विषय आहे.  दलित आणि ग्रामीण साहित्यात सामान्य माणसाबद्दलचा जो कळवळा, जी आस्था आणि जे प्रेम दिसून येत - ते साहचर्याने मराठी गझलेत देखील येईल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी. पण गझलेतून निव्वळ 'तपशीलीकरणाचे' काम होऊ नये. मीर, गालिब, तुकाराम, कबीर - ह्या महाकवींनी आपल्या काळाचा निव्वळ तपशील मांडण्याचे काम केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक मराठी कविता - आणि कवितेतले काही 'राजमान्य' प्रवाह हे दुर्दैवाने तपशीलातच गुंतून पडलेले दिसून येतात. जागतिकीकरण आणि महानगरातले विखंडित आयुष्य ह्याच्या परिणामी आलेल्या प्रतिक्रियात्मक स्वरूपाच्या कविता अति-प्रासंगिक ठरून कालबाह्य होताना दिसून येताहेत. कविता नुसतीच प्रतिक्रिया असू शकत नाही. कवितेने  भावनिक प्रतिक्रियेच्या पुढे जाणे अपेक्षित आहे.   
        
कवींची इच्छा असो वा नसो - किंवा गझल लिहिणाऱ्या अनेकांना ह्या गोष्टीची जाणीव असो वा नसो; मराठी गझल ही तथाकथित प्रतिक्रियावादी कविता आणि नाटकी भावकवितेच्या मधोमध उभी आहे.  गझलेने ह्या दोनही प्रवाहांपासून काहीसे दूर राहणे आवश्यक आहे. आम्हाला पाडगावकर - गुलझार- मुनव्वर राणा वळणाची अतिभावनिक - कौटुंबिक अभिव्यक्ती नको आहे - तशीच निव्वळ स्लँगमध्ये लिहिलेली महानगरांची सपाट वर्णने देखील नको आहेत. मराठीत गझल लिहिणाऱ्यांसाठी दलित कविता, साठोत्तरी कविता आणि ग्रामीण कादंबरी हे साहित्यातले महत्वाचे संदर्भ आहेत.  मराठीच काय - ह्या साहित्यातली जीवनानुभुती खरेतर जगातल्या कुठल्याही भाषेसाठी मार्गदर्शक ठरावी इतकी प्रखर आणि अस्सल आहे. साठोत्तरी कवितेने मराठी साहित्याला कृत्रिमतेच्या जोखडातून सोडवले. साठोत्तरी प्रतिभावंतांची समृद्ध शब्दकळा, प्रखर सामाजिक / ऐतिहासिक जाणीव, अभिव्यक्तीमधला आत्यंतिक प्रामाणिकपणा गझलेत आला पाहिजे. थोडक्यात गझलेतल्या आशयाच्या बांधणीसाठी; जीवनाकडे बघण्याच्या व्यापक दृष्टीसाठी आपल्याला मराठीतील उपरोल्लिखित साहित्याकडे वळावे लागेल.
         
एकूण परंपरा आणि आधुनिकता ह्यांचा मेळ गझलेकडून अपेक्षित आहे. आधुनिकता कशातली? - तर व्यक्तीकरणातली, विचार करण्यातली, शेरांची मांडणी करण्यातली. ह्यात निश्चीत नवेपणा असू शकतो. चौकटी बाहेरचा विचार करणे; घासून पुसून सपाट झालेल्या प्रतिमा न वापरणे अशा काही गोष्टी सांगता येतील. लेखनात निव्वळ भावनिकता नको, विचारही हवा. शेरांमधून झटकेदार प्रतिक्रिया देण्यापेक्षा जाणीवेच्या मूळापर्यंत जाण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. आणखी एक गोष्ट – सध्या उर्दू मुशायऱ्यांमधून कधी नव्हे इतकी वाईट गझल पुढे येते आहे - ह्या प्रकारच्या मंचीय गझलेपासून मराठी गझलेने प्रकर्षाने दूर रहावे हे देखील इथे सुचवावेसे वाटते.

गेल्या अंकात गझलेतल्या काही महत्वाच्या अंगांची सविस्तर चर्चा केली. तीच चर्चा इथे पुन्हा करण्याचा उद्देश नाही. ह्यावेळी गझलेचे अर्थगामीत्व आणि अर्थांच्या विविध छ्टांकडे एक नजर टाकूयात.  
       
बरेचदा गझलेतला सूत्रधार आणि स्थिती संदिग्ध असल्याने (बोलणारा तो किंवा ती कोण आहे? प्रसंग काय आहे? पार्श्वभूमी काय आहे?)  अनेकार्थत्वाला भरपूर जागा असते.  शिवाय जे काही बोललं जातं ते बरेचदा सूत्रबद्ध किंवा संकेतांच्या भाषेत सांगितले गेल्याने अर्थाच्या व्यापकतेत आणखी भर पडते. गझलेतल्या ह्या रचनात्मक भागाचे उपयोजन लिहिणारा कसे करतो ह्यावर गझलेची अर्थवत्ता अवलंबून असते.  हे कदाचित वाचायला अनेकांना जड जाईल - पण माझ्या मते संज्ञाप्रवाही लेखनासाठी गझलेत खूपच वाव आहे. हे बारिक कोपरे- कापरे नव्याने लिहिणारे प्रतिभावंत कवी जोखून पाहतील अशी अपेक्षा आहे. शेराचे अर्थगामीत्व समजून घेण्यासाठी जी काही साधने आहेत , त्यामध्ये गझलेची  घडीव शैली काहीसा हातभार लावते. ही घडाई गझलेतल्या शेरांना स्वयंपूर्ण एकक बनवण्यात मदत करत असते. एखादा शेर वेगळा काढून पाहिल्यास तो कवितेसारखा किंवा हायकूसारख संपूर्ण अर्थानुभव उभा करतो - ह्या मागे त्याची शैली आणि रचना देखील आहेच. दुसरे महत्वाचे साधन म्हणजे कवीने वापरलेले सूत्र - मग ती एखादी म्हण असेल, किंवा एखादी विशिष्ट प्रतिमा.  शेरातल्या मूळ विचाराचा विस्तार करण्यात ही साधने हातभार लावतात.  शेराच्या दोन ओळींमधला परस्पर संबंध देखील अर्थनिर्णयात महत्वाचा असतो - बरेचदा पहिल्या ओळीत एखादे प्रतिपादन करून, दुसऱ्या ओळीत तिचे समर्थन किंवा अधिक विवेचन केले जाते. हा क्रम असाच पाहिजे असा कुठेही आग्रह नाही - विपरितविन्यास न्यायाने एखादा शायर ह्याच्या नेमके विरूद्ध ही करू शकतो! अनेकदा ह्या दोन ओळींमधले अंतर जास्त असल्याचे दिसून येते - ह्याचे कारण शेरातली अव्यवस्था नसून गुंता-गुंतीच्या विषयांबद्दल बोलताना काहीसा दुरान्वयाने अर्थ लावण्याचा कवीचा प्रयत्न दिसून येतो.

कल्लोळ, अर्थ आणि भावावस्था हे तीन घटक आहेत {शोरिश, मानी (म'आनी), कैफियत} - जे गझलेच्या शेराला संपूर्णत्व देतात. (कैफियत म्हणजे मूड किंवा एक भावावस्था, मराठीत हा शब्द तक्रार ह्या अर्थाने रूढ होवून बसला आहे). जुन्या उर्दू कवींनी तहदारी आणि पेचदारी अशी दोन साधने वापरलेली दिसतात. तहदारी म्हणजे आशयातली स्तर-दर-स्तर उलगडत जाणारी खोली, तर पेचदारी म्हणजे गुंतागुंत. गालिबने मानी आफरीनी (माना' असे ही म्हटले जाते) असा शब्द वापरलेला आहे.  मानी आफरीनी म्हणजे अर्थाला अधिक संपन्न करणे, अनेक आयाम देणे. गालिब मानी आफरीनीच्या कलेतला मोठाच किमयागार आहे. तो अर्थाला खुलवत नेत-नेत अर्थाचे अक्षरशः बांधकाम करताना दिसून येतो. प्रतिमा, दंतकथा, शब्दांचे विशिष्ट प्रयोग करून तो शेरांमधून अनेक ताण - अनेक पेच निर्माण करतो. नारंग म्हणतात त्याप्रमाणे गालिब वाचताना वाचक एखाद्या 'सौंदर्यशास्त्रीय घटनेतून' गेल्या सारखा अवाक होतो ते ह्या मुळेच.  विचाराची मांडणी आणि तो विचार शब्दांमध्ये लिहिताना होणारी बोलण्याची मांडणी ह्या म्हणाल तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पैकी दुसऱ्या भागात शेर लिहिणाऱ्याची मोठीच कसोटी असते. इथे तुम्ही अर्थाला विस्तारत नेता, वेगवेगळे आयाम देता.  हे करण्यासाठी भाषेची मोठीच जाण हवी. भाषा लिहिता वाचणे एक आणि भाषेची जाण असणे दुसरे. शब्दांचे अर्थ, त्या शब्दांना जोडले गेलेले संदर्भ, शब्दांच्या परस्पर खेळातून (Play) उभे राहणारे अर्थसंघात ह्या गोष्टी शेरांना व्यापक बनवत जातात आणि मग एखादा अर्थ निव्वळ कळवला जात नाही तर एक संपूर्ण अर्थानुभव ह्या रूपात उभा केला जातो. शेरातून निव्वळ एखादी गोष्ट 'कळवणे' म्हणजे खबरिया (बातमीवजा) लिहिणे - अशा लेखनातून अनेकार्थत्वाच्या संभावना राहात नाही, केवळ एकच एक विषय सूचित केला जातो.  ह्या उलट इंशाइया बोलणे - संकेत, आश्चर्य, प्रश्न, आवाहन अशा अनेक अंगांनी समृद्ध असते - आणि ह्या 'वक्तृत्वा'तून (rhetoric) अनेकार्थत्वताच्या शक्यता निर्माण होतात. प्रतिमा, आदिबंध, प्रतिमा अशा आणखी काही गोष्टी सांगता येतील, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.
      
अर्थ (मानी) आणि विषय (मजमून) ह्या दोन गोष्टींमधला फरक ह्या दृष्टीने लक्षात घ्यावा लागेल. गालिबने अर्थांच्या शक्यता शोधण्याच्या प्रयत्नात ज्या अनेक गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे अत्फ आणि इजाफतींचा वापर. इजाफत म्हणजे काय तर हाले दिल किंवा गमे-दुनिया मधला ‘ए. नाम आणि विशेषणाला जोडणारी, किंवा दोन गोष्टींमधला संबंध सांगणारी सोय. अत्फ म्हणजे 'ओ', दोन गोष्टींना जोडणारा प्रयोग. गालिबने एकानंतर एक अशा वेगवान अत्फ आणि इजाफत वापरलेल्या दिसून येतात (उदा.  कैद-ए-हयात-ओ-बंद-ए-गम). ह्या प्रयोगांमधून तो वाचकावर प्रतिमा चित्रांचा भडिमार करत जातो - आणि अर्थाची अनेक वलये बनवत जातो. इथे रब्त (म्हणजे संबंध) आणि रवानी (म्हणजे प्रवाह, क्वचित वेग) हे दोन अर्थबंध काम करताना दिसून येतात. एकूण एखादा शेर वाचताना जे अर्थ उभे राहतात - त्यामागे अनेक गोष्टी कार्यरत असतात. ह्या सगळ्यांमध्ये लिहिणाऱ्याची जाणिवपूर्वकता असेलच असे मात्र नसते. बरेचदा शब्दांचे तणाव आणि गझलेच्या जमीनीतले उतार चढाव देखील अदृष्य रूपात काम करतात. (गझलेच्या जमीनीचा मी इथे उल्लेख केला आहे आहे कारण कवितेचा आकार - आणि तिचा अर्थ ह्यामधला परस्पर संबंध महत्वाचा असतो).
  
प्रत्येक भाषेची काही वैशिष्ट्ये असतात. अत्फ आणि इजाफत हे उर्दूचे वैशिष्ट्य आहे. आपल्याला आपल्या भाषेतले प्रयोग शोधून काढावे लागतील, ज्याने अर्थसंघाताचे काम नीट पार पडेल. जुन्या मराठीत वापरातले काही भाषिक प्रयोग ह्या दृष्टीकोनातून महत्वाचे आहेत. गेल्या सात-आठ दशकांमध्ये मराठी पद्य कविता अत्यंत मागे पडलेली दिसून येते. ह्या पद्य कवितेचा विकास, तिचे भाषिक आणि आशयिक संहतीकरण गझलेच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आहे.
        
वर बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे – पण ही सगळी अर्थातच साधने आहेत.  शेवटी कुठल्याही चांगल्या कवितेत अर्थांच्या शेकडो शक्यता मावलेल्या असतात- आणि म्हणूनच- लिहिणाऱ्याची मूळ भूमिका वाचणाराने काढलेल्या अर्थाशी सुसंगत असेल असे आवश्यक नसते. शब्दाकडे निव्वळ संकेत म्हणून पाहिल्या कुठल्याही पाठाची अर्थवत्ता धोक्यात येऊ शकते, पण त्याबद्दल अधिक उहापोह करण्याची इथे आवश्यकता नाही.  शेरातला वर्ण्य विषय आणि शब्दांची केलेली निवड - आणि बोलणाऱ्याचा स्वर ह्यात एक प्रकारचे संतुलन असल्यास एकसंध अर्थनिर्मिती होऊ शकते. हा समतोल भाषेचा आहे, आशयाचा आहे तसाच विचारांचा देखील आहे. गझलेतून सगळेच विषय व्यवस्थित मांडता येतील असे नाही. ह्याबाबतीत कवीकडून थोडे तारतम्य बाळगले जाणे अपेक्षित आहे.  कुठल्या विषयावर शेर लिहावे आणि कुठल्यावर कविता इतकी जागरूकता लिहिणाऱ्याकडे हवी.                         



--

अनंत ढवळे
डब्लीन, ओहायो
२०१७



संदर्भ सूची::
१. उर्दू गझल अँड इंडियन माईंड,  गोपीचंद नारंग (इंग्रजी अनुवाद: निशाद झैदी)
२. गालिब मानी आफरीनी, जदलियाती वजा, शुनीता और शेरीयात, गोपीचंद नारंग
.  शेर--शोर अंगेज (मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध), शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, भारतीय ज्ञानपीठ
. नेट्स ऑफ अवेरनेस, फ्रांसिस प्रिटश्शे, युनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया प्रेस
.  तत्वमीमांसा एवं ज्ञानमीमांसा, केदारनाथ तिवारी, प्रकाशक मोतीलाल बनारसीदास, दिल्ली
६. कुल्लियात-ए–मीर, मुंशी नवल किशोर प्रेस, लखनऊ

. दीवान-ए-गालिब, ग़ालिब अकादमी, दिल्ली

Wednesday, July 5, 2017

गझल


स्वतःला  पाहणे अस्तास जाताना
अजब  ठरली तुझ्या जगण्यातली शोभा

उन्हाच्या तप्त दिवसांचे फलित बहुधा
जमवला खूप मी ही थोर पाचोळा

वितळते हरघडी आयुष्य थोडेसे
दिवस एकेक हा मातीत मिळणारा

उगाचच पाहतो आहे कधीचा मी
ढगांसोबत भटकणारी निरर्थकता

निरर्थकता तरी  पुरते मला कुठवर
पुन्हा  शोधेन मी  कुठलीतरी  तृष्णा


करु सध्यातरी माझेच अन्वेषण
तुझा नंतर कधी घेवूत धांडोळा


अनंत ढवळे


---

ह्या गझलेत किता (  कत'आ) आहे :

उगाचच पाहतो आहे कधीचा मी
ढगांसोबत भटकणारी निरर्थकता

निरर्थकता तरी  पुरते मला कुठवर
पुन्हा  शोधेन मी  कुठलीतरी  तृष्णा




Tuesday, June 13, 2017

1

वेडेपणात रंग गवसले किती-तरी
थोडे उजाडताच हरवले किती-तरी

संदर्भहीन होत निघालेत चेहरे
ह्या गोंधळात हात निसटले किती-तरी

---

अनंत ढवळे

Monday, May 29, 2017

काही नोंदी स्वतःसाठी


१.

तू कवी नाहीस
तू जुळवून आणले आहेस
शब्दांचे जुगाड
जे पडेल कोसळून
अशात कधीही

२.

ही दुपार
असेल बोधीवृक्षाची सावली
किंवा रणरणते उन
पोस्टमन आलेला असेल
पत्र घेवून
किंवा नसेलही

३.

हे रस्ते भलतेच संशयी आहेत
किंवा ही वेळच तशी असावी
मघाशी
बथ्थड काळही
सामील झालेला
दिसला
रस्त्यांना

४.

ही इथून तिथवर
पसरलेली
अपरंपार गर्दी
गर्दीसोबत  जिवंत झालेला
तू ही

५.

 नोंदी संपल्यात.


--

अनंत ढवळे

Friday, May 26, 2017

जिक्रे मीर

मीरच्या गझलेत अथाह शांतता आहे. त्याच्या बोलण्याची  ढब अशी आहे जसे कुणी हळुवार  आवाजात  आपले चरित्र ऐकवत असावे.   काही उदाहरणे :

मेरे रोने की हकीकत जिस में थी
एक मुद्दत तक वो कागज नम रहा

**
आतशे दिल नहीं बुझी शायद
कतर-ए-दिल  है शरार हनोज..

**

शाम से कुछ बुझा सा रहता है
दिल हुआ है चराग मुफलिस का

**

मीर खरे तर माणसाच्या दु:खाचा महाकवी आहे. बुद्धाच्या चिंतनातले  असीम दु:ख मीरकडे कविता होऊन आले आहे असे वाटते. दु:ख ही व्यापक वस्तू असावी - आपल्या समजेपलीकडची, जी सृजनाची मूळ भावना किंवा प्रेरणा असावी असे त्याचे शेर वाचून  जाणवते

मैं कौन हूं ऐ हमनफसां , सोख्ता जां हूं
इक आग मेरे  दिल में  है  जो शोला फशां हूं

लाया है मेरा    शौक मुझे  पर्दे से बाहर
मै वर्ना   वही खिल्वती ए राजे निहां हूं....

मीरची कविता म्हणजे आपला सांस्कृतीक  ठेवा आहे. तो जपला पाहिजे..


--
अनंत ढवळे



Wednesday, May 24, 2017

गझल


मलाच उत्तरात मागती जशा
दिशा सदैव हाक मारती जशा

निशब्द चालले ॠतू हळूहळू
स्त्रिया निमूट जन्म काढती जशा

फिरून एक सोंग घेतलेय मी
कमीच एरवी करामती जशा

निघून एक-एक शब्द चालला
उगा  उभारल्या इबारती जशा

मनात आज खूप प्रश्न दाटले
जुन्या पुण्यातल्या इमारती जशा..



 अनं त   ढवळे

Thursday, April 20, 2017

सध्या तुम्ही मेलात तरी हरकत नाही

कपडे करा
भांग पाडा
गाडी स्टार्ट करा, निघा
गावभर मोकाट फिरा
ही टपरी तो ठेला
चहावर चहा
एखादी सिग्रेट
ह्याला भेटा त्याला बोला
ह्याला ठोका
त्याला झोडा
दिवसभर थकून भागून
संध्याकाळी घरी या
कमावून आणा न आणा
कुणीही विचारणार नाही
( सध्या तुमच्या अस्तित्वाला
अमरवेलीहून अधिक अर्थ नाही )
भाजी पोळी तयार असेल
तडस लागेतो चापून खा
नऊ साडे नऊला पुन्हा निघा
पूनम किंवा ब्लु नाईल किंवा रेड हेवन
चार पाच पेग पोटात ढकला
चार दोन फंडे चखना म्हणून गिळून घ्या
रात्री उशिरा परतून या
सुटलेल्या आगगाड्यांच्या आठवणी काढीत
झोपून राहा
झोपून राहा भडव्यांनो
सूर्य पार डोक्यावर येईतो
कुणी तुम्हाला उठवणार नाही
सध्या तुम्ही मेलात तरी हरकत नाही.
( २००६)
अनंत ढवळे.

Friday, April 7, 2017

schrodinger's cat :)

समुद्र किनार्‍यावर  बसून लाटांचे बनणे - फुटणे बघणे हा  जितका आनंददायी अनुभव आहे तितकाच विलक्षणही.  हे चित्र बघणारा अनेक गोष्टींमध्ये हरवून जातो. लाटांचे एकत्र येणे, प्रचंड शक्तीने  किनार्‍याकडे  वाहत वादळत येणे आणि  शेवटी फुटून जाणे; लाटांच्या निर्मीती आणि संपण्यातून निघणारा प्रचंड आवाज.  ही एक अव्याहत प्रक्रीया असते.  पाणी, आवाज आणि गतिमानतेचे सतत आवर्तन.  डोळ्यांच्या  शेवटच्या मर्यादेपर्यंत  पसरलेले अथाह पाणी,  त्याचे निळसर  अथांगपण  आणि बघणार्‍याने ह्या अमर्यादाला  नकळत जोडलेले  वैयक्तिक संदर्भ असा काहीसा प्रकार.  लाटांसोबत आपणही प्रदीर्घ अंतर कापून दूरवर जाऊन पोचतो आहोत  असा आभास होतो. 

घेउनी दूर - दूर डोळ्याना 
लाट एकेक चालली होती

हे दूर जाणे तसे  निर्हेतुक असते. विचारांची गती इतर कुठल्याही गतीला मागे टाकणारी  गोष्ट आहे.  लाटांसोबत वाहत जाणारे विचार दूरवर न  जातील तर नवलच.   खूप आधी घडून गेलेल्या गोष्टी, बालपणातले पुसट  संदर्भ,  मागे पडून गेलेली गावे, हरवलेले लोक आणि अशा एक ना हजार अनेक वैयक्तिक अनुभवांचे गुंते उलगडत जातात.  हे बघणे आणि हे विचार असूनही नसल्याप्रमाणे असतात.  स्थळकाळाच्या सीमेमध्ये असून नसण्याची, जिवंत असण्याची किंवा नसण्याची अवस्था.   ह्याचे कारण बहुधा निरिक्षकाचे अस्तित्व-भान विसरून जाणे हे असावे.  बघणारा भानावर आला की ही अधे-मध्येची (श्रोडींगरच्या मांजराची 'क्वांटम' अवस्था )  संपून समोर दिसणार्‍या आणि इंद्रियांनी ओळखता येणार्‍या गोष्टी राहून जातात.  बघणारा  आणि बघितले जाणारे बहुधा एकच असावे ह्या विचाराला थेट तडा जातो तो इथेच.  इथे दृष्य आणि दृष्टा अशी सीमा पाडली जाते.  

         एकूण बघणार्‍याचे भान ही अवस्थांतर संपवून एकाच अवस्थेत वापस खेचून घेणारी बाब असावी.   एरवी दाटून असलेली एकच-एक महावस्था  बघणार्‍याच्या उपस्थितीने भंग पावते.  परिपूर्ण असलेल्या चित्राला मधोमध चीर पडावी आणि त्याची अनेक शकले  व्हावीत असे काहीतरी.    निसर्गाच्या अपरिमेय पटावर माणसाचे  हे अवस्थांतर आणि ही  तगमग  ठरलेलीच असते.  वस्तूंचे असणे , नसणे आणि  सापेक्षतेच्या अनेक सिध्दांतांची उजळणी घडवून आणणारे हे अनुभव असावेत. समुद्र ,  डोंगरांची  उत्तुंग शिखरे, दर्‍या- खोर्‍या, घनदाट जंगले  माणसाला खेचून घेतात - ते बहुतेक ह्याच अनुभवांच्या मुशीतून जाण्यासाठी.  

 थेंबाचा समुद्र होण्याचे काय  बखान
आर- पार पसरून  राहिलेला विस्तार

थेंबाचा समुद्र होणे  आणि समुद्राच्या अफाट विस्तारात त्याचा पुन्हा कणामध्ये विलय होणे,   हा अनुभव प्रत्येकासाठी नवीन असला तरी मानवी इतिहासाइतकाच  तो प्राचीन आहे.  पहिल्यांदा अनुभवणार्‍याच्या कुतुहलाइतपतच  त्याची नवलाई.



लेख आणि गझल
-  अनंत ढवळे

Thursday, March 30, 2017

गझल - काही नोंदी

'समकालीन गझल' मधला लेख - इथे पुन्हा देतो आहे. :
---
गझल : काही नोंदी
---
गझलेची व्याख्या काय असावी ह्याबद्दल अनेकदा चर्चा होताना दिसून येते. माझ्या मते एखाद्या साहित्यविधेची सरधोपट व्याख्या करणे शक्य नाही. तसेच ते अत्यावश्यक देखील नाही. सुरुवातीच्या काळातल्या व्याख्या बघितल्या तर स्त्रीसोबत केलेला संवाद किंवा स्त्रियांबद्द्ल बोलणे म्हणजे गझल; हरिणाच्या शोक आणि भयग्रस्त हृदयातला हुंकार म्हणजे गझल अशी काही वर्णने सापडतात. पण गेल्या साताठशे वर्षांचा गझलेचा प्रवास बघता, ह्या व्याख्यांची व्याप्ती गझलेने केंव्हाच पार केलेली आहे असे लक्षात येते. त्यामुळे ह्या व्याख्या अत्यंत मर्यादित आहेत असे म्हणावे वाटते. खरे तर गझलेला विषयांची मर्यादा नाही. मानवी जीवन आणि संवेदनांचे जग जितके विशाल आहे, तितकीच गझलेची व्याप्तीदेखील. गझलेला निव्वळ प्रेमकविता म्हणणे हे तिच्या मूलभूत वैशिष्ट्यांचा खून करण्यासारखे आहे असे आहे प्रसिद्ध उर्दू समीक्षक डॉ. इबादत बरेलवी ह्यांनी म्हटले आहे. गझलेत जसे अमूर्ताचे चिंतन आहे तसे अनेक ऐतिहासिक, सामजिक, मनोदैहिक विषयही आहेत. थोडक्यात गझलेच्या चिंतनाचे विषय हे माणसाच्या जीवनाप्रमाणेच अमर्याद आहेत.
तगज्जुल (म्हणजे भाषिक साधने) आणि तखैय्युल (म्हणजे प्रातिभिक साधने) ह्या दोन प्रमुख घटकांचा परिपाक असलेली, वृत्त-काफियादिकांचे काही विशिष्ट नियम पाळून लिहिलेली घाटनिष्ठ आणि संवादी कविता म्हणजे गझल असे ढोबळ मानाने म्हणता येईल. भाषिक साधने आणि विचार (किंवा) आशय ह्यांना मर्यादा नाहीत. जसजशी गझल लिहिली जाईल, तसतसा ह्या संज्ञांचा विकास होत जाईल. शेर हा गझलेच्या घाटाचा प्रमुख घटक. गझलेची म्हणून जी काही वैशिष्ट्ये आहेत ती शेराची देखील आहेत. गझलेतला शेर हा एक स्वतंत्र आणि संपूर्ण विचारसंकुल असतो असे फिराक गोरखपुरी म्हणतात. कवीचे वक्तव्य, त्याची अनुभुती, त्या अनुभवातली तीव्रता - उत्कटता, आवाहकत्व, भाषेचे आणि प्रतिमांचे संघटन ह्या सगळ्यांचा परिपाक होऊन एक अंतर्बाह्य एकजीव असे संकुल जेव्हा उभे राह्ते - तेंव्हा खऱ्या अर्थाने चांगला शेर उभा राहतो. आशय आणि व्यक्तीकरणामध्ये एक प्रकारची समतानता आणि संतुलन हे शेराचे प्रमुख वैशिष्ट्य. शेर संपल्यानंतर त्यातल्या अर्थ आणि जाणिवेच्या अनेक छटा वाचणाऱ्याच्या मनात उमटत राहतात. गझलेचा शेर हा शेर संपल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू होते असे बशर नवाज ह्यांनी म्हटले आहे ते यामुळेच. चांगला शेर हा बरेचदा आपल्या अपूर्वतेने किंवा ताजेपणामुळे देखील लक्षात राहतो - भाषा, शैली आणि आशयाच्या नाविन्यामुळे एरवी लक्षात न आलेली गोष्ट पुढे आणली जाते. निव्वळ विरोधाभास, धक्कातंत्र, कलाटणी अथवा चमत्कृती ही शेरांची वैशिष्ट्ये नाहीत ही गोष्ट इथे लक्षात यावी. गालिबचे शेर जनमानसात कायमचे कोरले गेले आहेत, ते त्यातल्या बौद्धिक प्रतिमा, अंगभूत पेच, अत्यंत समृद्ध शब्दकळा आणि शैलीमुळे - विरोधाभास, चंचलता किंवा हेलकाव्यामुळे नाहीत. चांगल्या शेरांचे जे अनेक गुण सांगितले जातात त्यात अनेकार्थत्व (वरकरणी जो अर्थ वाटतो आहे त्यापेक्षा वेगळा अर्थ असणे, अनेक अर्थ निघणे); शब्दौचित्य (उचित आणि अर्थाशी योग्य संबंध सिद्ध करणारे शब्द वापरणे); भाषासौकर्य (बोलण्यासारखी सहज भाषा वापरणे) इ. उल्लेखनीय आहेत.
गझल ही घाटनिष्ठ रचना आहे असे आपण जेंव्हा म्हणतो, तेंव्हा त्यात एक प्रकारचे सौष्ठव, घडाई किंवा बांधणी अपेक्षित असते. कुठल्याही पद्य कवितेत, मग ती साधी ओवी का असेना, एक विशिष्ट रचना दिसून येते - ही रचना गझलेत थोडी जास्त उठावदार असते इतकेच. गझलेच्या पारंपरिक टीकाकारांना ह्या रचनेबद्दल, तिच्यातल्या बंधनांबद्दल नेहमीच आक्षेप राहिलेला आहे. इतके क्लिष्ट नियम असलेली कविता विचाराचा अथवा आशयाचा नीट विकास होवू देणे शक्य नाही असा काहीसा हा आक्षेप असतो. गझलेत मोठ्या समजल्या जाणाऱ्या कवींच्या गझलांकडे बघितल्यास ह्या बंदिस्त घाटातूनही अत्यंत गहन आशय आणि क्लिष्ट विचार उतरून आलेली दिसून येतात. शिवाय गझलेच्या रुपात आल्याने, त्या गहन विषयांमध्येदेखील एक प्रकारची सहजता आणि संस्मरणीयता आलेली आहे हे ही लक्षात येते. मीर तकी मीर आणि गालिब ह्यांचे अनेक शेर या गोष्टीचे प्रमाण आहेत. या दोन कवींचे शेर बरेचदा आपल्या अर्थाआधी आपल्या रचनासौंदर्याने वाचणाऱ्याला आकर्षून घेतात. थोडेसे वेगळ्या शब्दांत बोलायचे झाल्यास गझलेच्या बंधनांमध्येच गझलेचे सौंदर्यदेखील दडलेले आहे. शब्दांची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, लय, नाद, जाणिवेची तीव्रता ह्या रचनावैशिष्ट्यांमुळे गझलेतील अनुभवाची संघटना बनत, उलगडत आणि विकसित होत जाते.
साहित्याच्या प्रत्येक विधेची आपली अशी बलस्थाने असतात, तशाच मर्यादाही असतात. गझलेलाही आपल्या अंगभूत मर्यादा आहेतच - त्या नाकारण्याचे कारण नाही. मुक्त कवितेत विचार खुलवत नेण्यासाठी भरपूर जागा असते. गझलेत मात्र दोन ओळींचाच अवकाश असतो. दरवेळी कवीला आपला आशय शेरांच्या बंदिस्त घाटातून समर्थपणे पेलवेलच असे नाही. पण ह्या संक्षिप्ततेमुळे गझलेच्या शेरामधून येणारा आशय अधिक गडद, सघन होऊन येतो हे ही लक्षात घेतले पाहिजे.
आता गझलेच्या भाषिक साधनांबद्दल थोडेसे बोलू. वर म्हटल्याप्रमाणे तगज्जुल हा गझलेतला महत्वाचा घटक. ह्या संज्ञेबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज पसरलेले आहेत. तगज्जुल म्हणजे 'गझलीयत' आहे असेही सर्रास बोलले जाते. वास्तविक गझलीयत असा काही प्रकार नसतो. शेरांमध्ये चमत्कृती असावी, हेलकावा असावा, शेर गोटीबंद असावा, शेरातून काही विरोधाभासात्मक आले पाहिजे आणि हे घटक शेरात नसले, तर त्या शेरात गझलीयत नसते - असे अनेक गैरसमज मराठीत वर्षानुवर्ष पसरून राहिलेले आहेत. खरंतर विरोधाभास, चमत्कृती इ. लक्षणे मुशायऱ्यातून हमखास गाजणाऱ्या पण उर्दू साहित्यात नेहमीच गौण मानल्या गेलेल्या टाळीबाज गझलांची आहेत. थोडक्यात तगज्जुल या संज्ञेचा गझलीयत सारख्या काल्पनिक गोष्टींशी काहीएक संबंध नाही. तगज्जुल म्हणजे गझलेची भाषिक साधने - ह्यात प्रतिमा, प्रतिके, दंतकथा, वाक् प्रचार, उपमा इ.चा समावेश होतो. उर्दू गझलेपुरते पाहू गेल्यास जाम, सुराही, मैखाना, साकी, गुल, बुलबुल, लैला मजनू, शीरी फरहाद ह्यांच्या कथा इ. अनेक गोष्टींचा समावेश होतो. अर्थातच काळासोबत ही प्रतिमा प्रतिके बदलत गेलेली आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. आधुनिक उर्दू गझलेची प्रतिमासृष्टी ही चिंतनपरक आहे; शिवाय दैनंदिन जीवनातल्या अनेक गोष्टीही तिच्यात समाविष्ट झालेल्या आहेत. एकोणिसाव्या शतकात – विशेषत: तरक्कीपसंद (प्रगतीशील) कवींच्या गझलांमधून ह्या प्रतिमासृष्टीचा विशेष विस्तार झालेला दिसून येतो . डॉ शाहपार रसूल यानी म्हटल्याप्रमाणे प्रगतीशील उर्दू कवींनी आयुष्याच्या फैलावत जाणाऱ्या परिदृष्याला आपल्या अभिव्यक्तीचा पाया मानले आहे.
मराठी गझलेची ही साधने किंवा प्रतिमाविश्व सुरुवातीच्या काळात स्वाभाविकपणे मर्यादितच होते. मी विरुद्ध जग हा काल्पनिक संघर्ष आणि ह्या संघर्षांच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रतिमा आणि काहीशा आग्रही - अनेकवेळा आक्रमक अशा शैलीचा बोलबोला होता. ख्ररं तर कवीने कुठल्या प्रकारे लिहावे, संयत लिहावे की आक्रमक लिहावे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे असे म्हणता येते. पण गझलेचा, विशेषतः उर्दू गझलेचा इतिहास बघता, ह्या गझलेत मोठे किंवा महत्वाचे मानले गेलेले लेखन बघता - गझलेचा स्वर हा संयत असतो असेच म्हणावे लागेल. गझलेच्या शेरांमधली आक्रमकता क्वचितप्रसंगी आपल्या वेगळेपणामुळे आकर्षक वाटत असली तरी ती गझलेचा स्थायीभाव होऊ शकत नाही. हीच गोष्ट चमत्कृती,विरोधाभास ई. बद्दलही म्हणता येईल.
गझल आपण उर्दूकडून घेतली - त्याबद्दल आपण उर्दू भाषेचे आणि अर्थातच सुरेश भटांचे ऋणी आहोत. गेल्या चार शतकांमध्ये उर्दूत प्रचंड मोठ्या प्रमाणात गझल लिहिली गेलेली आहे. तिच्यात अनेक प्रवाह, शाखा आणि मत-मतांतरे आहेत. पैकी मराठीला दिल्ली स्कूलची उर्दू गझल - विशेषत: मीर आणि गालिब ह्यांच्या गझला जास्त जवळच्या वाटतात ही वस्तुस्थिती आहे. चक्रधर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथादिकांच्या अध्यात्म आणि भक्तीच्या रंगात रंगलेले मराठी मन; समाजसुधारकांच्या प्रखर सामाजिकतेत विकसित आणि विस्तारीत झालेली मराठी मनाची सामूहिक जाणीव - लखनवी वळणाच्या बनावटी आणि चंचल गझलांच्या (ज्याना उर्दूतही विशेष महत्वाचे मानले जात नाही) वाटेने जाणे कठीणच आहे. प्रत्येक भाषेचा आपला एक स्वभाव, परंपरा, इतिहास आणि कल असतो. मराठी गझल ही उर्दू गझलेची थेट प्रतिकृती असणार नाही - तशी अपेक्षा करणे देखील चुकीचे ठरेल. तिचे स्वतःचे व्यक्तित्व आणि स्वभाव असेल.
गझल ह्या विधेचा व्यापक पातळीवर विचार करू जाता मराठीत (आणि इतर भाषांमधून) जे गझल लेखन होते आहे - त्याने गझल उत्तरोत्तर समृद्ध होते आहे. मराठीतले समाजजीवन, अध्यात्म, ग्रामीण आणि नागर प्रतिमा ह्या गोष्टी मराठी भाषेची गझलेला देणच आहे. मराठी गझलेबद्दल वाढलेली उत्कंठा ही उर्दू गझलेला देखील पोषक ठरते आहे. अनेक उर्दू कवी महाराष्ट्रात ओळखले, वाचले आणि चर्चिले जातात. ही आनंद आणि समाधान देणारी गोष्ट आहे; साहित्य व्यवहाराने माणसे जवळ यावीत, भाषांमधले संवाद वाढावेत हे एका उदार आणि सहिष्णू अशा सामाजिक, साहित्यिक मानसिकतेचे द्योतक आहे.
मराठी कवितेवर वारकरी साहित्याचा प्रभाव स्पष्ट आहे. किंबहुना आधुनिक मराठीच्या निर्मितीत ह्या परंपरेचा, विशेषत: तुकारामाचा मोठाच हिस्सा आहे. तुकारामाची भाषा रोखठोक आहे म्हणून आपणही रोखठोक गझल लिहिली पाहिजे हे गृहितक मात्र मुळातच चुकीचे आहे. तुकारामाची कविता अत्यंत गहन आणि एखाद्या महासागराप्रमाणे विशाल आहे. तुकारामातले काही निवडक सामाजिक अभंग म्हणजेच तुकाराम आहे असे समजून लिहिणे अयोग्य ठरेल. मराठी साहित्य, मराठी परंपरा आत्मसात करून - गझलेच्या मूळ अक्षापासून दूर न जाता आपल्याला गझल लिहिली पाहिजे. नुसतेच वृत्त लिहिता आले आणि काफिया रदीफ समजला म्हणजे गझल समजली असे होत नाही. गझलेची लय, तिचा घाट, शेरांमधले अंतर्विरोधात्मक पेच इ. समजून घेणे आवश्यक आहे.
गझलेचा सूर संयत असतो; पाण्याचा एखादा प्रवाह संथ वाहत जावा - एकसंध गतीने, तशी गझल आपल्या विचारांसहित पुढे जात असते. कुठलीही कविता ही मानवी जाणिवांची अभिव्यक्ती असते आणि जिथे जाणीवा येतात - तिथे एक गोंधळ आणि असमतोल असतोच. मात्र हा गोंधळ देखील एका 'एकसंधत्वात' आणि एका प्रतलात गझलेतून उमटताना दिसून येतो. एकीकडे विचारांचा, जाणिवांचा हा गोंधळ, आणि दुसरीकडे गझलेची संथ लय - हा समतोल साधणं कठीण असलं, तरी अशक्य नक्कीच नाही. गझलेची ही लय समजून घेण्याची इच्छा असणाऱ्यांनी मीरच्या गझलांचा निश्चीत अभ्यास करावा असे सुचवावेसे वाटते.
गेल्या दिडेक दशकात झालेले मराठी गझल लेखन मात्र ह्या अंगाने खूपच चांगले उतरलेले आहे असे आवर्जून नमूद करावेसे वाटते. जसे जसे नवनवीन कवी गझल लिहू लागले आहेत, तसतसे गझलेचे प्रतिमाविश्वही विस्तारत जाते आहे. मराठी भाषेचा स्वभाव, तिची वळणे, दैनंदिन बोलीभाषेतले वाक्प्रचार आणि म्हणी, शब्दप्रयोग, ग्रामीण भाषेचे सौंदर्य आता गझलेत खऱ्या अर्थाने येऊ लागले आहे, बहरू लागले आहे. आंतरजालामुळे कवींना उपलब्ध झालेली विविध साधने आणि गझलेचा झालेला प्रसार हे ह्या या बदलामागचे मुख्य कारण आहे हे देखील स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. मराठी गझलेची ही भाषिक साधने अशीच विकसित आणि विस्तारीत होत राहोत ही अपेक्षा आहे.
आता थोडेसे बोलूत ते 'तखय्युल' ह्या संज्ञेबद्दल. खयाल म्हणजे विचार ह्या संज्ञेपासून बनलेला हा शब्द आहे. ह्या शब्दाच्या निव्वळ शब्दकोशीय अर्थाच्या पलीकडे जाऊन कवीची प्रतिभा विचार, कल्पना, आशय असे काही व्यापक अर्थ आपण घेऊ शकतो. एकूण कवीच्या प्रतिभेतून गझलेत चित्रित होणारी जी विचारव्यूहे आहेत त्याला तखैयुल म्हणता येईल. इथे गझल लिहिणाऱ्या कवीचा खरा कस लागतो. चांगले शेर चांगले का वाटतात, ह्या मागे अनेक कारणे असली तरी त्या शेरामधून व्यक्त झालेली लिहिणाऱ्याची प्रतिभा हे एक मोठेच कारण असते. मानवी जीवनाचा परिवेश बदलत गेलेला असला तरी जीवन तेच आहे; मूलभूत विषय आणि पेच तेच आहेत. आपल्या प्रतिभेतून कवीने घेतलेला मानवी जीवनाचा शोध ही कदाचित कुठल्याही गझलेची (अथवा कवितेची) सगळ्यात मोठी उपलब्धी असते. कवीची प्रतिभा ही त्याचे वाचन, चिंतन मननातून झालेले संस्कार, त्याचे निरिक्षण, स्वतःचे आणि इतरांचे अनुभव, त्याच्या कळत नकळत तयार झालेल्या भूमिका, त्याच्या आधी अस्तित्वात असलेली कवितेची परंपरा इ. अनेक गोष्टींच्या परिपाकातून विकसित होत असते. ही प्रतिभा किंवा हा तखैय्युल, कवीची गझलेतून उतरणारी छवीदेखील असते. ही प्रातिभिक साधने आणि भाषेच्या मिश्रणातून कवीची शैली निर्माण होत असावी असे मानण्यास भरपूर वाव आहे.
गझल ही 'स्व'च्या शोधाची आत्मनिष्ठ कविता आहे, पण ह्या 'स्व' ला आपल्या परिवेशापासून, परंपरा, इतिहास आणि समाजापासून वेगळे करून पाहणे शक्य नाही. सुरुवातीच्या काळातली मराठी गझल ही आत्मनिष्ठ कमी आणि आत्मकेंद्रित जास्त होती. कालानुरूप हे चित्र बदलले; किंबहुना माझ्या पिढीतल्या गझलेने ते जाणीवपूर्वक बदलवून आणले - ते आणखी बदलणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात जगणाऱ्या, विचार करणाऱ्या माणसाचे युगभान, समूहभान, त्याच्या दैनंदिन जीवनातले संघर्ष, अतिप्रगत तंत्रज्ञानामुळे झालेले भंजन, खेड्यांचे कोसळत जाणे, शहरांची बकाली, बदलत चाललेली कुटुंबव्यवस्था, दिवसेंदिवस वाढत चाललेले धार्मिक संघर्ष - आणि ह्या सर्वांच्या परिणामी मानवी जीवनात आलेले दुभंगलेपण - ह्या विषयांचा वेध घेणारी; ह्या विषयांवर गझलेच्या भाषेत बोलणारी गझल अधिकाधिक प्रकर्षाने पुढे आली पाहिजे. पण असे करताना निव्वळ ह्या विषयांचे सरधोपट बातमीवजा वर्णन करून चालणार नाही. कालानुरूप होत जाणारे बदल, सामाजिक तपशील जसेच्या तसे टिपणे हे कवितेचे काम नाही. त्यासाठी इतर अनेक गोष्टी आहेत. झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगाचा मानवी मनावर काय परिणाम होतो आहे; त्याच्या अस्तित्वलक्ष्यी प्रेरणा, महत्वाकांक्षा, भीती, प्रेमभावना, वासना; समूहाशी असलेले त्याचे नाते इ. गोष्टींचा विचार गझलेला करावा लागेल.
उर्दू गझलेत अनेक शतके प्रेमाचा बोलबाला राहिलेला आहे. इतका की गझल म्हणजे एक प्रकारची प्रेमकविताच आहे असेही म्हटले जाते. हे अगदीच मर्यादित अर्थाने खरेही आहे. गझलेच्या प्रारंभिक शायरांमध्ये अनेक सूफी संत होते. ह्या संतांनी आपल्या ईश्वराला उद्देशून अनेक प्रेमकविता लिहिल्या आहेत. अमिर खुसरौचे उदाहरण ह्या अनुषंगाने लक्षात घेता येईल. खुसरौच्या गझलेतला पिया म्हणजे त्याचा ईश्वर आहे. आपल्याकडे भक्ती संप्रदाय आणि वारकरी संप्रदायातले प्रेम; किंवा तुकाराम ज्याला 'आनंद' म्हणतो तीच ही भावना आहे. पुढे मीर आणि गालिबच्या गझलांमधून हे चिंतन निव्वळ प्रेमभावनेपुरते मर्यादित न राहता एकंदर मानवी जीवन आणि आयुष्याचा ठाव घेताना दिसून येते. विशेषता: मीरच्या गझलांची भाषा ही वरकरणी बाह्य प्रेमाची असली, तरी त्याची प्रवृत्ती ही प्रेमातला 'हकीकी' म्हणजे 'सत' भाव शोधण्याकडेच असल्याची दिसून येते. एकूणच उर्दू गझलेतल्या प्रेमाला बरेचदा चिंतनाची डूब असते असे लक्षात येते.
अर्थातच उर्दू शायरांनी हे जे चिंतन केले आहे, ते प्रेमाच्या भाषेत - गझलेचे सौंदर्यभान राखत, तिचे 'कवितापण' जपत केलेले आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. गझल प्रेमाबद्दल, आयुष्याबद्दल चिंतन करते, पण ती काही थेट आध्यात्मिक कविता अथवा भक्तीगीत नसते; तसेच ती रुक्ष दर्शनशास्त्रही नसते हा तरल भेद विसरता कामा नये. थेट भक्तीपर लिहिणे किंवा तत्वचिंतनातला एखादा सिद्धांत जसाच्या तसा उचलून गझलेच्या शेरात टाकणे म्हणजे गझलेच्या मूळ अक्षापासून दूर जाण्यासारखेच आहे. गझलेतला मानवी स्पर्श हरवता नये. आपल्या चिंतनपरकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्ली स्कूलमधल्या कवींना देखील मानवी भाव भावनांवर, प्रेमावर भरपूर लिहिलेले आहे - त्यांच्या अनेक गझला ह्या प्रेमातली आर्तता, प्रेयसीच्या सौंदर्याची वर्णने, विरहातली व्याकुळता इ. विषयांवर बोलताना दिसून येतात (इथे बोलणे हा गझलेच्या संवादी असण्याकडे केलेला इशारा आहे). गालिबचे अनेक शेर प्रेमभावनेतल्या अनेक बारिकसारिक खाचाखोचांबद्दल बरेचदा मानसशास्त्रीय पातळीवरून विचार करताना दिसून येतात.
ह्या सगळ्या परिवेशात जेंव्हा आपण मराठी गझलेचे चिंतन करू जातो - तेंव्हा काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. त्या म्हणजे मराठी कवितेची परंपरा, मराठी जनमानसाचा एकून स्वभाव आणि तिसरा, सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सध्याच्या काळात आणि साहित्यात होत असलेली प्रचंड स्थित्यंतरे. मराठी कवितेची परंपरा पाहू जाता गझल ही तुलनेने अद्यापही नवी आहे असे म्हणावे लागेल. उर्दू किंवा फारसी इतकी जुनी मराठी गझलेची परंपरा नाही. ह्याचे दोन परिणाम होतात. एक परिणाम लिहिणाऱ्यांवर होतो, तो असा की त्यांच्यापुढे संदर्भासाठी विशेष सामग्री उपलब्ध नसते. दुसरा परिणाम होतो तो तत्कालीन साहित्यिक समज आणि समीक्षेवर. तुलनेने नव्या आणि दुसऱ्या एखाद्या भाषेतील परंपरेशी जवळीक सांगणाऱ्या साहित्य विधेकडे समीक्षक आणि अभ्यासक सपशेल दुर्लक्ष करतात. मराठी गझलेसोबत सध्या हेच होते आहे. वास्तविक पहाता मराठी आणि उर्दू ह्या भाषांचा संबंध अतिशय जुना आहे. उर्दूतून मराठीत आलेल्या हजारो शब्दांची उदाहरणे देता येतील. शिवाय मराठीतून दखनी उर्दूत गेलेले शब्दही अनेक आहेत. गालिबच्या अनेक उर्दू शेरांचा प्रभाव मराठीतल्या गद्यपद्य लेखनावर दिसून येतो. असे असताना केवळ उर्दूतून आलेली आहे म्हणून गझलेकडे दुर्लक्ष करणे अयोग्य तर आहेच, पण अत्यंत कोत्या मानसिकतेचे द्योतकही आहे. गझलेवर अधूनमधून होणारी द्वेषमूलक टीकेतून ही मानसिकता वेळोवेळी दिसून येत असते. साठोत्तरी पिढीतल्या काही समीक्षकांनी सुरुवातीच्या काळात गझलेवर केलेली विखारी टीका अजूनही गझलेचे अतोनात नुकसान करते आहे. नंतरच्या समीक्षक अभ्यासकांनी ह्या टीकेचे निव्वळ अनुसरण करत गझलेला दुर्लक्षित करणे सुरूच ठेवलेले आहे. असो.
गेल्या दहा पंधरा वर्षांत लिहिली गेलेली मराठी गझल ही मराठीतली अत्यंत महत्वाची कविता आहे. ही गझल कशी आहे ? तर ती कुठल्याही 'उत्तरी' गटात न मोडणारी; शहरी, ग्रामीण, महानगरी अशा कुठल्याही बेगडी विद्यापीठीय संज्ञांमध्ये न अडकलेली; तपशील आणि माहितीच्या जोखडातून कवितेला सोडवून माणसाला आणि त्याच्या आयुष्याला आपल्या सर्जनाच्या केंद्रस्थानी ठेवणारी आहे. प्रतिभेच्या आणि चिंतनाच्या सीमांना आवाहने देणारी; भाषेला तिच्या समृद्ध वारशाचा पुनः प्रत्यय देणारी; बहुतांच्या जीवन आणि भावविश्वाचे प्रतिनिधित्व करणारी ही विधा मराठी साहित्यातले एक अत्यंत महत्वाचे आणि समृद्ध दालन आहे. मराठी कवितेच्या अभ्यासकांनी, समीक्षकांनी आणि साहित्यिकसंस्थांनी ह्या गझलेची योग्य ती दखल घेणे आणि गझल लिहिणाऱ्या कवींना यथोचित स्थान देणे अत्यंत आवश्यक आहे. साहित्य अकादेमीने प्रातिनिधिक गझल संग्रह प्रकाशित केला ही आनंदाची बाब आहे. मात्र ह्यासारखे अधिकाधिक उपक्रम यापुढेही होत राहणे गरजेचे आहे. मराठी जनमानसाने एवढ्या प्रेमाने आणि आत्मियतेने जवळ केलेली ही विधा, समीक्षकांच्या अनास्थेमुळे जर साहित्यात दुर्लक्षित राहणार असेल तर ती एक मोठी विडंबनाच ठरेल.
अनंत ढवळे
पुणे, सप्टेंबर २०१६
anantdhavale@gmail.com
-------------------
संदर्भ सूची:-
१. डॉ.इबादत बरेलवी, गज़ल और मुताला ए गज़ल, अंजुमन तरक़्क़ी उर्दू पाकिस्तान, १९५५.
२. शम्सुर्रहमान फ़ारूक़ी, मीर की कविता और भारतीय सौन्दर्यबोध (शेर-ए-शोर अंगेज का हिन्दी अनुवाद), भारतीय ज्ञानपीठ, २०१४.
 ३. अग्निएस्झ्का कुक्झ्जेविक्क्झ फ्रास, द बिल्वड अँड द लवर - लव इन क्लासिकल उर्दू गझल, क्रॅको इन्डोलॉजिकल स्टडीज, व्हॉल्युम १२, २०१०
४. फ़िराक़ गोरखपुरी, उर्दू की इश्क़िया शायरी, वाणी प्रकाशन, २०१४
५. डॉ शाहपार रसूल ‘फिक्रो तहकी़क’ ह्या मासिकाचा नयी गज़ल विशेषांक
 ६. मराठी ग़ज़ल : अर्धशतकाचा प्रवास, संपादक: राम पंडित, साहित्य अकादेमी, २०१४
७. मीर, संपादक: अनंत ढवळे, हिंडोल प्रकाशन औरंगाबाद, २००६
ॠणनिर्देश :
ज्येष्ठ उर्दू कवी आणि विचारवंत स्व. बशर नवाझ साहेब; प्रसिद्ध उर्दू कवी आणि अनुवादक श्री अस्लम मिर्झा; ज्येष्ठ अभ्यासक डॉ. राम पंडीत आणि इतर अनेक कवी, अभ्यासक मित्र

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...