स्वतःला पाहणे अस्तास जाताना
अजब ठरली तुझ्या जगण्यातली शोभा
उन्हाच्या तप्त दिवसांचे फलित बहुधा
जमवला खूप मी ही थोर पाचोळा
वितळते हरघडी आयुष्य थोडेसे
दिवस एकेक हा मातीत मिळणारा
उगाचच पाहतो आहे कधीचा मी
ढगांसोबत भटकणारी निरर्थकता
निरर्थकता तरी पुरते मला कुठवर
पुन्हा शोधेन मी कुठलीतरी तृष्णा
करु सध्यातरी माझेच अन्वेषण
तुझा नंतर कधी घेवूत धांडोळा
अनंत ढवळे
---
ह्या गझलेत किता ( कत'आ) आहे :
उगाचच पाहतो आहे कधीचा मी
ढगांसोबत भटकणारी निरर्थकता
निरर्थकता तरी पुरते मला कुठवर
पुन्हा शोधेन मी कुठलीतरी तृष्णा
No comments:
Post a Comment