Monday, May 7, 2007

पेटली ह्रदयात होळी आजही
घेरुनी आली उदासी आजही

कोणत्या जन्मातला संबंध हा
बांधला जातो तुझ्याशी आजही

मी कितीसा वागलो तेंव्हा खरे
चाचणी घेतो मनाची आजही

जन्मलो होतो इथे केंव्हातरी
चालली आहे भ्रमंती आजही

आजही बघतात स्वप्ने तारका
रंगते हातात मेंदी आजही.....


अनंत ढवळे ( cont.09823089674/ anantsdhavale@rediffmail.com )


2...

मनाची आग कोठे शांतवावी
कुठे जाऊन चादर अंथरावी

फरक ना आमच्यामध्ये जरासा
कशी मी जात त्याची ओळखावी

मनाचे मोल ना काहीच येथे
कुणाला आपली भाषा कळावी

शहर परके , न कोणी ओळखीचे
कुठे ही रात्र आता घालवावी

मिळो संवेदनेचे दान तुजला
तुला ही वाट माझी सापडावी.........

अनंत ढवळे

3.......


काठ डोळ्यांचे भिजावे सारखे
वाटते आहे रडावे सारखे

मी विचारावे तुला काहीतरी
आणि तू नाही म्हणावे सारखे

काय या गावात होते आपले ?
पाय का मागे वळावे सारखे

वाटते पाऊस यावा एवढा
रंग भिंतींचे उडावे सारखे

वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे सारखे.....


अनंत ढवळे


4.....

एक औदासिन्य मागे राहिले
शेवटी हे शुन्य मागे राहिले

पांगले सर्वत्र निष्ठांचे धनी
आपले सौजन्य मागे राहिले


वाहुनी गेली किती संवत्सरे
केवढे मालिन्य मागे राहिले

संपले सौहार्द  संबंधातले
कोरडे पर्जन्य मागे राहिले

घेउनी जा मृत्तिकेचा गंध हा
राहू दे जे अन्य मागे राहिले

अनंत ढवळे


5.........


मागणे संपले मागताना तुला
पोचलो मी कुठे शोधताना तुला

दु:ख आकाश भेदून गेले पुढे
आज मी पाहिले भंगताना तुला

धर्म हा कोणता ,कोणता पंथ हा
लोक किंचाळती पूजताना तुला

ही कहाणी तुझी ,कल्पना ही तुझी
लाज का वाटते वाचताना तुला ?

गोपुरे कंपली , पांगली पाखरे
विश्व भांबावले पाहताना तुला.....


अनंत ढवळे

स्वरांत यमक

स्वरकाफिया, स्वरयमक असे न म्हणता स्वरांत यमक म्हणणे अधिक योग्य ठरेल...