Friday, June 24, 2016

गझल

आभासी दुनियेतच मेले
आभासी दुनियेचे राजे

तग धरून उरलेले काही
बाकी गोंगाटातच विरले

कोणासाठी माहित नाही
लढणारे पण तुंबळ लढले

पळणाऱ्या खिडकीची दौलत
बकाल वस्त्या उजाड नगरे

काही भूक करवते म्हटला
काही गर्दी करवुन घेते
--
अनंत ढवळे

1

निशब्द चालले ऋतू हळू हळू
स्त्रिया निमूट जन्म काढती जशा

मनात आज खूप प्रश्न दाटले 
जुन्या पुण्यातल्या इमारती जशा..

अनंत ढवळे
 

अनोळखी

जेथे जातो  तेथे अनोळखी असतो
मी नसतो कुठलाही, कुठलाही नसतो

अनंत ढवळे 

Tuesday, June 21, 2016

एक कविता

अजब आकळीक 

पाण्यावर उतरलेले पक्षी
पाहण्यातली
अजब दु:ख
चहुवार दुभंगलेली जमीन
बघण्यातलं
नजर संपेतो पसरलेली
अनिवार शांतता अनुभवण्यातलं
विलक्षण कोरेपण
बांधाबांधावरून उठून
हवेत विरून जाणाऱ्या
हाळ्यांची लय
अभंग गवळणी
आणि ओव्यांचे
हे गहिवारे
उन्हाळ माध्यान्हांमधून
डोकावणारं
नीम शहरी बालपण
रानोमाळ बुडून जाणारे 
सूर्य,
चंद्र,
आपण
की भाई मोठे विलक्षण आहेत
तुझ्या माझ्या जगण्यातले संदर्भ
एकाच अनाकलनीय
गोष्टीचे
हजारो
अन्वय.....

--
अनंत ढवळे 


खूनबारी

खूनबारी
--
बहुत रंजिस झाली
इतकी, की आता आठवतही नाहीत कारणॆ;
एक ज्वालामुखी निरंतर आग ओकणारा
चाके फिरून गेलीत हजारदा; या दरम्यान
जुन्या गढ्या पडून नवे इमले बनलेत
हवेत एव्हढा धूर की श्वासही घेता येऊ नये
हा अष्टौप्रहर दिव्यांचा झगमगाट
घरांवर चढत चाललेली संपत्तीची आवरणं
अहर्निश पडत चाललेले माणसांचे रतीब; या दरम्यान
धर्म साखळदंडून जाताना पाहिलेत
पाहिलीत जग गिळून घेणारी धर्मवेडं
वेशींचे चमत्कार
रंगरूपांमध्ये दडलेले अहंकार
आणि तमाम आलेपनांखाली दडून बसलेलं
मुलभूत माणुसत्व


तोबा खूनबारी झाली
भर रात्रीत छावणीवर हल्ला होवून
कापलो गेलोत आपण दहाव्यांदा
इमले, महाल आणि झगमगाट
आपापल्या ठिकाणी बलंद आहेत
इथे तिथे पडलेलं आपलं रक्त तुडवून
भन्नाट पुढे निघून गेलीए गर्दी...
--
अनंत ढवळॆ
June 16 at 8:35pmPrivacy: Public

About Me

My photo
Born 1977. Poet and critic. Writes Poetry and fiction in Marathi, Urdu and English languages. Many poems published in reputed literary journals in all these languages, some of which include Naw Anushtubh , Kavita Ratee, Asmita Darsh , Aaj-kal ( urdu ), Saakhsat ,Kusumakar, The Open Road Review etc. Anant works as a consultant in the Information technology industry; lives in Dublin, OH with his wife and son.