Sunday, December 11, 2016

पहाटेचे हायकू



++

पहाटेची नीरवता
तांबडं फुटण्याची
आसमंती वेळ

++

दूरवर काही खूडबूड
सुरू होते आहे
दिवसाची लगबग

++

ह्या नंतर सूरू होतील
कितीतरी गोष्टी
दिवसासोबत कलंडत जातील

--

अनंत ढवळे

डब्लीन  (ओहायो)


http://marathihaiku.blogspot.com/

Sunday, November 13, 2016

कादंबरी - 'बेरंग'

सध्या एक कादंबरी लिहितो आहे. पहिला भाग ऐसीअक्षरेच्या दिवाळी अंकात छापून आला आहे, त्याची ही लिंक :

http://aisiakshare.com/node/5587

Wednesday, September 28, 2016

समकालीन गझल

'समकालीन गझल' ह्या अनियतकालिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला आहे. 'समकालीन गझल' ह्या फेसबुक समूहात तो बघता येईल. वाचा, चर्चा करा, टीका करा. स्प्रेड द वर्ड !

Saturday, September 3, 2016

गझल

रात्र, तुझ्या डोळ्यांची जादू
गोष्ट चालली आहे लांबत


किती दूर आलेलो आपण
रमत- गमत वाटा धुंडाळत


रंग रूप उतरून चालले
ओळख जाते आहे हरवत



कसे तुझ्याशी संवादावे
तिथवर काही नाही पोचत



काय काय पडलेले मागे
उगाच बसलो आहे मोजत...


--
अनंत ढवळे


(ह्या गझलेत मतला नाही)

एक शेर

परिचीत कुणी भेटेल शक्यताही नाही
हे गाव नव्या शतकात नागरी झालेले
अनंत ढवळे

चार शेर


मी म्हणतो मी ह्या काळाची सूक्ते लिहितो
खरे पाहता काळच माझी कवने लिहितो

पदोपदी हे का वाटत जाते जगताना
कुणीतरी भलताच आपले जगणे लिहितो

सुसंगती जगण्यातच जर उरलेली नाही
काय वावगे करतो जर बेढंगे लिहितो

रक्तामधला जोर देत असतो या धडका
जे झालेले नाही ते झालेले लिहितो

अनंत ढवळे

Friday, September 2, 2016

दहशत

रस्त्यारस्त्यांतून
कानाकोपर्‍यांतून
चकचकीत ऑफिसांतून
शाळाकॉलेजांमधून
भरगच्च गर्दीच्या
बसट्रेनलिफ्टमधून
घराच्या चार भिंतीतून
ओळखीच्यांतून
नातलगांतून
शिक्षकबॉसभाऊदिरांतून
बलात्काराची दहशत घोंघावत येते आहे
कुठूनकुठून
कुणाकुणातून ..
--
अनंत ढवळे

1

कडेकपारीत राहणारे लोक
काय विचार करत असतील
गंमत म्हणून डोंगर चढणारी
डिझायनर माणसं पाहून?

--

अनंत ढवळे

Friday, August 12, 2016

गझल

रात्र, तुझ्या डोळ्यांची जादू
गोष्ट चालली आहे लांबत

किती दूर आलेलो आपण
रमत- गमत वाटा धुंडाळत

रंग रूप उतरून चालले
ओळख जाते आहे हरवत

कसे तुझ्याशी संवादावे
तिथवर काही नाही पोचत

काय काय पडलेले मागे
उगाच बसलो आहे मोजत...


अनंत ढवळे

Saturday, July 30, 2016

एक कथा

सध्या एक कथा लिहितो आहे, आलेख या ब्लॉगवर ती वाचता येईल :


http://aaalekh.blogspot.in/



Tuesday, July 26, 2016

अनुकरणे

या गझलेवरून प्रेरित एक गझल अशात वाचण्यात आली. अर्थात हे नवीन नाही . गेल्या दहाबारा वर्षांत विविध जालीय माध्यमातून आलेल्या , किंवा त्याही  आधी माझ्या मूक अरण्यातली पानगळ या गझलसंग्रहातल्या अनेक गझलांची अनेक अनुकरणे पहायला मिळाली, मिळताहेत . मी अर्थातच कुणाला या बद्दल हटकत नाही. नव्या पिढ्यांवर आधीच्यांचा प्रभाव असणारच...पण बरेचदा समकालीनांनी देखील अशी अनुकरणे केली आहेत. असो.

नकोसे तुला आज जे वाटते
उद्या तेच सारे मिरवशील तू

बदलतात येथे जशा तारखा
बदलतात सारे बदलशील तू

अशी वेळ येईल की एकदा
तुझे तत्व पायी तुडवशील तू

अनंत ढवळे
(मूक अरण्यातली पानगळ या संग्रहातून
प्रसीद्धी वर्ष २००६ )

Monday, July 25, 2016

धन्यवाद !

या ब्लॉगची वाचक संख्या बघता बघता चौदा हजारांवर जाऊन पोचली आहे. कवितेच्या तथाकथित मुख्यधारेपासून दूर राहणार्‍या माझ्यासारख्या एखाद्या अप्रसिद्ध कवीच्या कविताविषयक ब्लॉगसाठी ही संख्या मोठीच आहे. इथे येणार्‍या  सर्व वाचक मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा आभार !

अनंत ढवळे

Tuesday, July 19, 2016

होड्या

मघापासून पाऊस पडतोय...
एका संथ लयीत निथळणार्‍या दुःखासारखा
तुला पाऊस आवडतो
मला पडतात प्रश्न
मी पावसाच्या सरींवर लिहिलेल्या
अदृश्य ऋचा वाचून
आणखीनच अस्वस्थ होतो
मला बालपणीचा पाऊस नेहमीच आठवतो
या पावसावर नोंदवलेली
आपली अनेक वर्षे
आपली साहसे
आपली भीती
आपले जयपराजय
आपली लहान सहान प्रासंगिक वेडं
आणि जन्माची अपरिहार्य नवलाई


पावसात नाचणारी मुले पाहून
मला आजही आनंद होतो
मुले नाचत आलीएत
वर्षानुवर्षं
पिढ्यानपिढ्या
ही जीवनाची न तुटणारी शृंखला
हे जन्माचे स्नेह तुषार
वाहत आलेत ओलांडून
असंख्य नद्या नाले
काळाचे अभेद्य पहाड


 पाऊस
आजचा संथ पाऊस
आपल्या अस्वस्थतेचा पाऊस
किती पावसाळे
एकवटून राहिलेत, आपल्या मनात
रस्तो रस्ती साचून राहिलेलं
हे निर्वंश पाणी
असहायतेचं गढूळ पाणी
मुले या पाण्यात होड्या सोडतील
आपण न्याहाळत बसूत डबक्यांत साकोळलेलं आकाश
होड्या पार करून जातील
स्थळकाळाची क्षितिजं
मी ऐकत आलोय
गोष्टींतील होड्या
चंद्राला पोचतात
मुले बघतील आपापल्या लहानशा होड्यांचे
वीत दीड वीत प्रवास
आणि टाळ्या पिटतील
मुले टाळ्या पिटतील
होड्या चंद्राला पोचेतो
आपण न्याहाळत राहूत
गढुळल्या पाण्यात विस्तारत जाणारी क्षितिजे
चाळत राहूत
आपल्या वैयक्तिक इतिहासांची
भिजलेली पिवळसर पाने......


--
अनंत ढवळे
(2008/ वडगाव , पुणे )

काही शेर


 काही शेर :

रात्र, तुझ्या डोळ्यांची जादू
गोष्ट चालली खूपच लांबत 

किती दूर आलेलो आपण
रमत गंमत वाटा धुंडाळत

दारावरती पाटी नाही
ओळख जाते आहे विसरत

अनंत ढवळे

Friday, July 15, 2016

साहित्यात

साहित्यात प्राथमिक दुय्यम असे काही नसते. तत्कालिन समज आणि साहित्यिक समुदायांची दिशा अमुक साहित्य महत्वाचे आणि अमुक कमी महत्वाचे ठरवत असली तरी ही समज काळासोबत बदलत जाते , आणि महत्वाच्या साहित्याबद्दलच्या कल्पना देखील.

शेरे शोर अंगेज

मीरने शेरे शोर अंगेज ही कल्पना मांडली आहे. मी तिचा अर्थ कवितेतला अंतर्गत संघर्ष आणि उद्रेक या अंगाने घेतो. एक प्रकारचा गोंधळ , केऑस. शब्द, विचार आणि जाणिवांचा गोंधळ:

जहां से देखिए एक शेर ए शोर अंगेज निकले है ।
कयामत का सा हंगामा है हर जा मेरे दीवां में..
...
(मीर तकी मीर)

1

काळासोबत आपण बदलत जातो . या संदर्भातला माझा एक जुना शेर :


बदलतात येथे जशा तारखा
बदलतात सारे, बदलशील तू ...

घोडे


अचानक भानावर आल्यागत
धावत सुटलेत
इच्छांचे असंख्य घोडे

 
मागे पुढे
काचेरी इमारतींचे उत्तुंग वैभव
या वैभवात
सर्वत: प्रवेश निषिद्ध असणारे
तू, मी

 
 
अपरिमित   इच्छाधार्‍यांची  खडी  फौज;
घोडे पाण्याला थांबणार नाहीत
घोडे सावलीला  थांबणार नाहीत
घोडे पाळणारेत नाकातोंडातून रक्त येईतो

 
 
बाहेर नुकतीच पहाट झालीये
एक लहानसा पक्षी
डहाळीवर बसून गाणे गातो आहे ..

 
 
 
अनंत ढवळे

Friday, June 24, 2016

गझल

आभासी दुनियेतच मेले
आभासी दुनियेचे राजे

तग धरून उरलेले काही
बाकी गोंगाटातच विरले

कोणासाठी माहित नाही
लढणारे पण तुंबळ लढले

पळणाऱ्या खिडकीची दौलत
बकाल वस्त्या उजाड नगरे

काही भूक करवते म्हटला
काही गर्दी करवुन घेते
--
अनंत ढवळे

1

निशब्द चालले ऋतू हळू हळू
स्त्रिया निमूट जन्म काढती जशा

मनात आज खूप प्रश्न दाटले 
जुन्या पुण्यातल्या इमारती जशा..

अनंत ढवळे




 

अनोळखी

जेथे जातो  तेथे अनोळखी असतो
मी नसतो कुठलाही, कुठलाही नसतो

अनंत ढवळे 

Tuesday, June 21, 2016

एक कविता

अजब आकळीक 

पाण्यावर उतरलेले पक्षी
पाहण्यातली
अजब दु:ख
चहुवार दुभंगलेली जमीन
बघण्यातलं
नजर संपेतो पसरलेली
अनिवार शांतता अनुभवण्यातलं
विलक्षण कोरेपण
बांधाबांधावरून उठून
हवेत विरून जाणाऱ्या
हाळ्यांची लय
अभंग गवळणी
आणि ओव्यांचे
हे गहिवारे
उन्हाळ माध्यान्हांमधून
डोकावणारं
नीम शहरी बालपण
रानोमाळ बुडून जाणारे 
सूर्य,
चंद्र,
आपण
की भाई मोठे विलक्षण आहेत
तुझ्या माझ्या जगण्यातले संदर्भ
एकाच अनाकलनीय
गोष्टीचे
हजारो
अन्वय.....

--
अनंत ढवळे 


खूनबारी

खूनबारी
--
बहुत रंजिस झाली
इतकी, की आता आठवतही नाहीत कारणॆ;
एक ज्वालामुखी निरंतर आग ओकणारा
चाके फिरून गेलीत हजारदा; या दरम्यान
जुन्या गढ्या पडून नवे इमले बनलेत
हवेत एव्हढा धूर की श्वासही घेता येऊ नये
हा अष्टौप्रहर दिव्यांचा झगमगाट
घरांवर चढत चाललेली संपत्तीची आवरणं
अहर्निश पडत चाललेले माणसांचे रतीब; या दरम्यान
धर्म साखळदंडून जाताना पाहिलेत
पाहिलीत जग गिळून घेणारी धर्मवेडं
वेशींचे चमत्कार
रंगरूपांमध्ये दडलेले अहंकार
आणि तमाम आलेपनांखाली दडून बसलेलं
मुलभूत माणुसत्व


तोबा खूनबारी झाली
भर रात्रीत छावणीवर हल्ला होवून
कापलो गेलोत आपण दहाव्यांदा
इमले, महाल आणि झगमगाट
आपापल्या ठिकाणी बलंद आहेत
इथे तिथे पडलेलं आपलं रक्त तुडवून
भन्नाट पुढे निघून गेलीए गर्दी...
--
अनंत ढवळॆ
June 16 at 8:35pmPrivacy: Public

Monday, May 2, 2016

शोभायात्रा

शोभायात्रा

-

सूर्याची प्रशंसा करा
पृथ्वीची प्रशंसा करा
नदीचे सूक्त म्हणा
गुहांमधली रेखाटने
तुमच्या वंशाची साक्ष देतील

अनेक हजार वर्षं निघून जातील
स्थानिकांचे निर्वासित होतील
निर्बळांच्या झुंडी चिरडल्या जातील
विषारी पावसाच्या सरी
तुमुल युद्धध्वनी
दडपून टाकतील
जय पराजयाची अविश्वसनीयं संस्करणं पसरवली जातील
उध्वस्त होतील जनपदं
फिरवले जातील राजमुकुट अनेकदा
बदलत जातील मानववंशाचे इतिहास

हळू हळू बदलत जातील
कातडीचे रंग, बोलीभाषा आणि पेहराव
अनिश्चीततेचे बिगुल वाजत राहतील
अनेक शतकांचं हरवलेलं युग येईल
लोक येतील शेकडो हजारो लाखोंच्या संख्येने
सामावून जातील
माती, पाणी आणि हवेत

असाही एक कळ येईल की जिथे
एकमेव द्वंद्व राहून जाईल;
इतर सर्व संघर्षांचा विनाश होवून
आणि मग
कुठलाही अर्थ उरणार नाही
तुमच्या हजारो वर्ऱ्षांच्या शोभायात्रेस
किंवा या गोष्टीस
की तुम्ही सूर्याची प्रशंसा करत होतात
अथवा चंद्राची

अनंत ढवळे

Sunday, April 17, 2016

प्रबंध वाचन


समकालीन गझल


नव्या वाटा शोधणाऱ्या , जीवनाभिमुख आणि समकालीन मानसिकतेशी जवळीक दाखवणाऱ्या गझललेला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेला उपक्रम..

https://www.facebook.com/groups/1650092041894900/

गझल

वाट बघत बसलेत जगाचे मंच हजार
मी किमया हरवत जाणारा किमयागार

दृष्य असे जे बदलत जाते सतत पुढ्यात
मी उगाच जोडू बघतो तारेला तार

दु:ख जसे अव्यक्त तसे आयुष्य महान
हे आदिम निर्वंश तसे ते अपरंपार

बिंदूचा समुद्र होण्याचे काय बखान
आरपार पसरून राहिलेला विस्तार

जन्म कुणाचा जगतो आपण क्षणाक्षणात
मनामधे कुठल्या दु:खाची संततधार...

अनंत ढवळे

Sunday, February 28, 2016

परिणमन


1.
सार्वत्रिक धुळीमधून
आपणही धूळ बनून रस्ता काढीत जातो आहोत
एकंदर परिवेशाहून आपलं जगणं वेगळं नाही
आपल्या भवताली चकाकणारं वस्तूंचं लोकविलक्षण जग
आणि ह्या चकाकीतून इतिहास संस्कृती आणि संघर्षांकडे पाहणारे आपण
एकच बनून राहिलो आहोत
ह्या शहरातली ही आपली कितवी पिढी आहे?
ह्या दशकभरात आपण किती पिढ्या ओलांडून आलो आहोत?
की खरंतर थबकूनच राहिलो आहोत आपण
आणि भयंकर वेगाने बदलून गेल्या आहेत
इतर बहुतेक गोष्टी
2.
निरंतर युद्ध सुरू आहे
एक अहमहमिका
एवढे सगळे लोक
जीवाच्या आकांताने पळणारे
आपापल्या समजेचं गाठोडं घेवून
रस्ता ओलांडत पुढे जाणारे
किती झपाट्याने बदलून गेल्यात गोष्टी
बसकी घरं जावून
अपार्टमेंटस आलीत
वस्तूंनी ठासून भरलेल्या
मॉल्स आल्यात
आपणही या रेट्यासोबत
बरेच दूरवर निघून आलो आहोत
जागोजागी
मोबाईलशी खेळणारे
टापटीप कपड्यांमधून
आपापलं अर्थकारण नीटस जपत
सावध सजग फिरणारे
चुणचुणीत लोक
जे जाणून आहेत प्रेमापासून
ईश्वरापर्यंतची
तमाम सूचक उत्तरं
तसे
आपण देखील
धावत पडत
ठेचाळत हेलकावत
ह्या जथ्थ्यांमध्ये सामील झालो आहोत
कसे सजग
सावध आणि
हुशार झालो आहोत
--
अनंत ढवळे

Friday, February 19, 2016

गझल

एक गझल :

कुणाचे ऐकणे नाही कुणाशी बोलणे नाही
अशा वैराण दिवसांची उदासी संपणे नाही

असे हे काय होते की दुवे तुटतात कायमचे
सहज मग बोलणे नाही उगाचच भेटणे नाही

तुझ्या प्रेमामधे आहेच किमया दोन विश्वांची
तुझ्या किमयेत पण माझे वचन सामावणे नाही

मनाची पानगळ संपेल तर बदलेलही शोभा
करावे काय मन ठरवून बसले पलटणे नाही

तसेही कोणते मुक्काम आपण घेतले होते..
नको रस्ताच तो जेथे निरंतर चालणे नाही

अनंत ढवळे




Tuesday, January 19, 2016

एक शेर

थेंबाचा समुद्र होण्याचे काय बखान
आरपार पसरून राहिलेला विस्तार

॰*
अनंत ढवळे 

Saturday, January 16, 2016

चर्चा

मागे स्नेहसदनात समकालीन गझल या अनौपचारिक व्यासपीठांतर्गत गझल वाचन आणि चर्चेचा एक काऱ्यक्रम आयोजित केला होता. मी तिथे वाचलेल्या प्रबंधाची ही चित्रफीत :

https://www.youtube.com/watch?v=uJHdhubEWUQ

Saturday, January 9, 2016

गझल


एक साधी सोपी गझल :

एकही गोष्ट आवडेनाशी 
एकही ओढ ओढवेनाशी 

काय आहे तुझ्या मनी जाणे 
बाब साधीच उलगडेनाशी 

प्रेम नाही वियोगही नाही 
आजची रात्र काढवेनाशी 

आपली शांत शांत ही भाषा 
क्रुद्ध काळास मानवेनाशी 

शोधतो अडगळीत केंव्हाचा 
आपली खूण आढळेनाशी...

अनंत ढवळे 

Friday, January 1, 2016

औरंगाबाद

औरंगाबाद
***
मी लौकिकार्थाने शिकलो नाही विद्यापीठात
पण अनेक दिवस घालवले आहेत
तिथल्या गर्द झाडांच्या सावलीत
बेगमपुऱ्याच्या काठावर इतिहास भक्कम
पाय रोवून उभा आहे;
मी त्याला अनेकदा जवळून पाहिलं आहे
गोगापीर आणि हनुमान टेकडीच्या उंचावरून

त्या दिवसांमध्ये मी
बहुतेक पूर्ण करीत होतो
अर्धवट सूटून गेलेल्या लेण्या
किंवा शोधत होतो
सिराजची एखादी हरवलेली गझल;या
शहराला जोडले गेलेत
कितीतरी संदर्भ आणि
अन्वय
शतकाच्या उंबरठ्यावर उभे बशर नवाझ
कधीमधी रस्त्यात भटकताना भेटणारे
तुळशी परब;
बावन्न पुरे
आणि छप्पन दरवाजे

पुढे नेमाड्यांनी हिंदूमध्ये उभं केलं
हे शहर
तेंव्हा वाटलं ही कविता लिहायला
जरा उशीरच होवून गेलेला आहे..
--
अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...