Sunday, February 28, 2016

परिणमन


1.
सार्वत्रिक धुळीमधून
आपणही धूळ बनून रस्ता काढीत जातो आहोत
एकंदर परिवेशाहून आपलं जगणं वेगळं नाही
आपल्या भवताली चकाकणारं वस्तूंचं लोकविलक्षण जग
आणि ह्या चकाकीतून इतिहास संस्कृती आणि संघर्षांकडे पाहणारे आपण
एकच बनून राहिलो आहोत
ह्या शहरातली ही आपली कितवी पिढी आहे?
ह्या दशकभरात आपण किती पिढ्या ओलांडून आलो आहोत?
की खरंतर थबकूनच राहिलो आहोत आपण
आणि भयंकर वेगाने बदलून गेल्या आहेत
इतर बहुतेक गोष्टी
2.
निरंतर युद्ध सुरू आहे
एक अहमहमिका
एवढे सगळे लोक
जीवाच्या आकांताने पळणारे
आपापल्या समजेचं गाठोडं घेवून
रस्ता ओलांडत पुढे जाणारे
किती झपाट्याने बदलून गेल्यात गोष्टी
बसकी घरं जावून
अपार्टमेंटस आलीत
वस्तूंनी ठासून भरलेल्या
मॉल्स आल्यात
आपणही या रेट्यासोबत
बरेच दूरवर निघून आलो आहोत
जागोजागी
मोबाईलशी खेळणारे
टापटीप कपड्यांमधून
आपापलं अर्थकारण नीटस जपत
सावध सजग फिरणारे
चुणचुणीत लोक
जे जाणून आहेत प्रेमापासून
ईश्वरापर्यंतची
तमाम सूचक उत्तरं
तसे
आपण देखील
धावत पडत
ठेचाळत हेलकावत
ह्या जथ्थ्यांमध्ये सामील झालो आहोत
कसे सजग
सावध आणि
हुशार झालो आहोत
--
अनंत ढवळे

No comments:

सिनिकल माणसाचं इतिवृत्त

तुम्ही जगता - मौजमजा करता  मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...