Tuesday, July 19, 2016

होड्या

मघापासून पाऊस पडतोय...
एका संथ लयीत निथळणार्‍या दुःखासारखा
तुला पाऊस आवडतो
मला पडतात प्रश्न
मी पावसाच्या सरींवर लिहिलेल्या
अदृश्य ऋचा वाचून
आणखीनच अस्वस्थ होतो
मला बालपणीचा पाऊस नेहमीच आठवतो
या पावसावर नोंदवलेली
आपली अनेक वर्षे
आपली साहसे
आपली भीती
आपले जयपराजय
आपली लहान सहान प्रासंगिक वेडं
आणि जन्माची अपरिहार्य नवलाई


पावसात नाचणारी मुले पाहून
मला आजही आनंद होतो
मुले नाचत आलीएत
वर्षानुवर्षं
पिढ्यानपिढ्या
ही जीवनाची न तुटणारी शृंखला
हे जन्माचे स्नेह तुषार
वाहत आलेत ओलांडून
असंख्य नद्या नाले
काळाचे अभेद्य पहाड


 पाऊस
आजचा संथ पाऊस
आपल्या अस्वस्थतेचा पाऊस
किती पावसाळे
एकवटून राहिलेत, आपल्या मनात
रस्तो रस्ती साचून राहिलेलं
हे निर्वंश पाणी
असहायतेचं गढूळ पाणी
मुले या पाण्यात होड्या सोडतील
आपण न्याहाळत बसूत डबक्यांत साकोळलेलं आकाश
होड्या पार करून जातील
स्थळकाळाची क्षितिजं
मी ऐकत आलोय
गोष्टींतील होड्या
चंद्राला पोचतात
मुले बघतील आपापल्या लहानशा होड्यांचे
वीत दीड वीत प्रवास
आणि टाळ्या पिटतील
मुले टाळ्या पिटतील
होड्या चंद्राला पोचेतो
आपण न्याहाळत राहूत
गढुळल्या पाण्यात विस्तारत जाणारी क्षितिजे
चाळत राहूत
आपल्या वैयक्तिक इतिहासांची
भिजलेली पिवळसर पाने......


--
अनंत ढवळे
(2008/ वडगाव , पुणे )

No comments:

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...