Tuesday, March 28, 2017

गझल

अर्धे- मुर्धे , कच्चे - पक्के सगळे काही
ह्या बाजारी विकले गेले सगळे काही
उगाच नाही बेचैनी ही वाटत जाते
चुकलेले आठवते आहे सगळे काही
रिक्तपणाचे मूळ शोधणे शक्य नसावे
संदेहाच्या ठायी विरते सगळे काही
आग्रह माझा की नाही काहीही माझे
हट्ट तुझा की माझे आहे सगळे काही
रस्ता-रस्ता पडले आहे आज शिराळे
प्रेम तुझे आहे की सरले सगळे काही
--
अनंत ढवळे


Wednesday, March 8, 2017

काही शेर

माझ्या संग्रहातले काही शेर/एक मतला इ. :
++
मी माझ्या या हातांनी पेटवले ज्या वस्त्यांना
आलीत पुन्हा भेटाया त्या विस्मरणांची नावे
तृष्णेच्या काठावरती पडलेत सडे रक्ताचे
मी मोजत बसलो आहे व्याकुळ हरणांची नावे
++
नकोसे तुला आज जे वाटते
उद्या तेच सारे मिरवशील तू
बदलतात येथे जशा तारखा
बदलतात सारे बदलशील तू
++
असेल बसुनी तशीच ती पोरगी उदास
गतकाळाची उचकुन सगळी खोकी काढ
++
पाण्यासाठी भांडत होत्या काही बाया
भेदरलेली पोरे दुरुनी पहात होती
++
किती गोंधळ उडला
पान पडले पाण्यात
++
कसे सांगू तुला मी स्थान माझे
कथेच्या शेवटाचे पान माझे
++
तू नको सांगू मला काही कृपाळा
मी कुठे चुकलो मला ठाऊक आहे...
++
अनंत ढवळे
सगळे शेर २००३- २००५ ह्या कालखंडातले आहेत

Saturday, March 4, 2017

रहाटगाडी

अनेक दिवसांपासून  सुरू असलेल्या
निरर्थक बर्फवृष्टीसारखा
मी  देखील निरर्थक बनलो आहे

माझ्या मागून
प्रचंड वेगाने धावत जाते आहे
दुनियेची अव्याहत
रहाटगाडी

दुनियेला कदाचित
मी दिसत असावा
खिडकीतून
मजल-दरमजल
मागे पडत  जाणारा
एवढं  धुधाट घडत असताना
सभोवती जग कोसळून पडत असताना
खुर्चीत बसून
व्हिस्की पीत बसणारा
  
जगण्यातले प्रदीर्घ संदर्भ
आणि बाहेरच्या थंड हवेची
मी सांगड घालू बघतो आहे

आणि
विसरून गेलेले आहेत
स्थळकाळ
समुदाय
ओळखमूलक  गोष्टी

म्हणजे
मौसम बदललेत की
माझे झोपेत बरळणे वाढले आहे ?

पहाटेच्या संदिग्ध वेळात
लिहिलेली
ही गोष्ट
कुणाची आहे ?

बर्फावरून
आर पार  उमटून गेलेले पाऊल
कुणाचे आहे  ?

--

अनंत ढवळे


शब्द आणि अर्थ


शब्दांची उकल कठीण आहे. शब्द आणि अर्थ ह्यांचा संबंध निकट असला तरी  शब्द हे अर्थासाठी संदर्भाचे काम करत असतात. तुलसी दासाने अर्थ आणि ध्वनी अभिन्न असून देखील भिन्न असल्याचे म्हटले आहे.  ज्ञानेश्वराने
देखील अमृतानुभवात ' इथे ' म्हणजे  ज्ञानग्रहणात शब्दाचा संबंध नसल्याचे म्हटले आहे:

किंबहुना शब्दु |  स्मरण दानी प्रसीद्धू
परि ययाही संबंधु | नाही येथे

(अमृतानुभव)

उदाहरणार्थ पडदा ह्या शब्दाने आपण ज्या वस्तूचा बोध घेतो , ती वस्तू आणि हा शब्द ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. शब्दांना अर्थ प्राप्त होत जातात, ते बदलवले जाऊ शकतात. ..  थोडक्यात अर्थापर्यंत  पोचायचे तर भौतिक शब्दाच्या / भाषेच्या चौकटीच्या पलीकडे  जाऊन  बघावे लागते. ही प्रक्रिया  जाणीवेच्या पातळीवरच होऊ शकते.  शब्दाचे काम अर्थबोध  असले तरी हा अर्थ  वृथाबोध असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे.


अनंत ढवळे

Sunday, February 26, 2017

तपशील

चाळिशीजवळ जाण्यातला भाग म्हणजे
तुम्ही तिशीपासून फार लांब नसता
आणि मागे पडून गेलेले असतात
विशीतले उनाड दिवस

मागे वळून बघण्यासाठी
बर्‍याच गोष्टींची
बेगमी झालेली असते
आणि बहुतेकांना
सुचू  लागतात कविता

रटाळ नोंदी
जुने  सिनेमे, अवघड पुस्तके
आणि  इतर बेरंग तपशीलांमध्ये
अडकून पडण्याचे वय

अधून मधून
जमा खर्च
कमाईचे हिशेब
दुरावलेले लोक
शहरे
आणि हरवलेल्या श्रेयाचे
पुसट उद्वेग

मरण
तसे कुठल्याच वयाहून दूर
किंवा जवळ नसते
पण हे वय
तसे मध्यम आहे
की जगून झालेले असते बर्‍यापैकी
आणि उरलेले देखील

__

अनंत  ढवळे


Saturday, February 18, 2017

भाषेची चौकट

गेले काही दिवस विरचनेबद्दल  ( Deconstruction )विचार करतो आहे. शब्दांचे रूढ अर्थ , त्या शब्दांमधून वहन होणारे संदेश आणि एकूण भाषेच्या चौकटीचे अर्थवाहित्व किंवा  निरर्थकता असे  काहीसे मुद्दे आहेत. Deconstruction ला  मराठीत विरचना अथवा विखंड असे म्हणणे योग्य ठरेल. डिकंस्ट्र्क्शनिजम असा शब्द वापरात नाही- त्यामुळे ह्या संज्ञेत ‘वाद' जोडणे योग्य ठरणार नाही

Thursday, February 16, 2017

Deconstruction / विरचना

भाषेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन गोष्टी  बघणे शक्यनसते, आणि शब्दांना कुठलेही निर्विवाद किंवा निखळ अर्थ नसतात. त्यामुळे बोलली गेलेली प्र त्येकच गोष्ट दुर्बोध आहे - किंवा वृथा बोधक आहे असे म्हणता येते.