Tuesday, April 1, 2014

एक दिवशी रोडवर येतील बघ
आपल्या संकीर्णतेची लक्तरे...
अनंत ढवळे

Friday, March 28, 2014

एक कविता

दिवस तापत चाललेत
घोंघावत राहते हवा
मी वाहावत जातो रस्तोरस्ती
या धुराळ्या सोबत

मनात
उजाड झालीए
एक वस्ती

ही उन्हे नेहमीचीच
हा ऋतू नित्याचा
उजाड वस्त्यांमधील
उदास दारे
डोळे लावून असल्यासारखी
कुठेतरी

हे वैराण दुभंगलेपण
कुठल्या दुःखासोबत
माझ्या मागे मागे चालत आलंय

या उध्वस्त कोरड्या दुपारी
किती वर्षं झालीत
माझा पाठलाग करताहेत

अनंत ढवळे

Saturday, March 15, 2014

तीन गझला

आणखी काही जुन्या गझला, २००६/७ साली लिहीलेल्या. जालावर २००८ मध्ये एकत्र प्रकाशित  झाल्या होत्या:

1.
तोडले संबंध इतके जाहले
आणखी डोकयातले तण वाढले

काळ हा इतिहास हा की दु:ख हे
आपल्या वर्षांमधे जे तुंबले

व्हायचे जे तेच झाले शेवटी
केवढे जन्मावरी घण घातले

येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले

रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले



अनंत ढवळे

2.
उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो
नको तिथे मग स्वभाववश मी गुंतत गेलो

प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो

प्रेम तुझ्यावर असे अम्ही बेसुमार केले
दिसेल त्यावर तुझ्या कल्पना लादत गेलो

तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो

सरता सरता रात्र दुःख वाढ्वून गेली
दिवस तापला आणिक मी भेगाळत गेलो

अनंत ढवळे

3.

एवढीही आठवण येऊ नये
एवढे कोणामधे गुंतू नये

हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये, बोलू नये

जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये

अनंत ढवळे



Monday, March 10, 2014

गझल


एक जुनी गझल..

तसा कुठे मी धर्माच्या चौकटीत बसतो
कधी तरी देवळात जातो, पाया पडतो

थेट तुझ्याशी बोलून काही साधत नाही
अनुत्तरित प्रश्नांचा गठ्ठा मागे उरतो

मला पाहिजे काय मला हे कुठे उमगले
मागी बनुनी दिशा दिशा धुंडाळत फिरतो

निर्मळ हसून तू जन्माचे गूढ उकलले
मी व्याख्येच्या वनात अजुनी वणवण फिरतो

-- अनंत ढवळे

Wednesday, February 26, 2014

सुटे शेर

किती तरी वलये प्रेमाची
तुझे कोणते कुठले माझे

जे माझे नाही ते नाही
जे आहे ते आहे माझे

अनंत ढवळे

फेब्रुवारी २७ २०१४ 

Sunday, February 23, 2014

गझल

 गोष्टींमधला व्यर्थपणा समजू येणे
 एक सूर्य बुडणे दुसरा उगवू  येणे

  हे कुठले जंगल तुडवू जातो आपण
  पदोपदी आभास जिथे उगवू येणे
 
  टपटपून येतात प्रश्न आपल्यापुढे
  कपाळावरी घाम  जसा निथळू येणे

   अनंत ढवळे

Friday, January 10, 2014

सुटे शेर

 सुटे शेर

  वाट बघत बसलेत जगाचे मंच हजार
  मी किमया हरवत जाणारा किमयागार

  दु:ख जसे अव्यक्त तसे आयुष्य महान
  हे आदिम निर्वंश  तसे ते  अपरंपार

  ++++

 पाहिली दुनिया जशी  दिसली तशी
 रेघ मग मी ओढली जमली तशी

 भटकतो गर्तेत पाचोळा जसा
 आपली आवर्तने  उरली तशी

अनंत ढवळे

पुणे २०१३/ १४