Friday, March 28, 2014

एक कविता

दिवस तापत चाललेत
घोंघावत राहते हवा
मी वाहावत जातो रस्तोरस्ती
या धुराळ्या सोबत

मनात
उजाड झालीए
एक वस्ती

ही उन्हे नेहमीचीच
हा ऋतू नित्याचा
उजाड वस्त्यांमधील
उदास दारे
डोळे लावून असल्यासारखी
कुठेतरी

हे वैराण दुभंगलेपण
कुठल्या दुःखासोबत
माझ्या मागे मागे चालत आलंय

या उध्वस्त कोरड्या दुपारी
किती वर्षं झालीत
माझा पाठलाग करताहेत

अनंत ढवळे