Saturday, March 15, 2014

तीन गझला

आणखी काही जुन्या गझला, २००६/७ साली लिहीलेल्या. जालावर २००८ मध्ये एकत्र प्रकाशित  झाल्या होत्या:

1.
तोडले संबंध इतके जाहले
आणखी डोकयातले तण वाढले

काळ हा इतिहास हा की दु:ख हे
आपल्या वर्षांमधे जे तुंबले

व्हायचे जे तेच झाले शेवटी
केवढे जन्मावरी घण घातले

येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले

रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले



अनंत ढवळे

2.
उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो
नको तिथे मग स्वभाववश मी गुंतत गेलो

प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो

प्रेम तुझ्यावर असे अम्ही बेसुमार केले
दिसेल त्यावर तुझ्या कल्पना लादत गेलो

तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो

सरता सरता रात्र दुःख वाढ्वून गेली
दिवस तापला आणिक मी भेगाळत गेलो

अनंत ढवळे

3.

एवढीही आठवण येऊ नये
एवढे कोणामधे गुंतू नये

हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये, बोलू नये

जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये

अनंत ढवळे



A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...