Saturday, March 15, 2014

तीन गझला

आणखी काही जुन्या गझला, २००६/७ साली लिहीलेल्या. जालावर २००८ मध्ये एकत्र प्रकाशित  झाल्या होत्या:

1.
तोडले संबंध इतके जाहले
आणखी डोकयातले तण वाढले

काळ हा इतिहास हा की दु:ख हे
आपल्या वर्षांमधे जे तुंबले

व्हायचे जे तेच झाले शेवटी
केवढे जन्मावरी घण घातले

येथुनी मागे न काही या पुढे
हे कुठे येऊन जीवन थांबले

रंग नाही राहिला दुनियेत की
आपल्या रक्तात पाणी साचले



अनंत ढवळे

2.
उजाड माळावरती हिरवळ शोधत गेलो
नको तिथे मग स्वभाववश मी गुंतत गेलो

प्रश्न तेवढा कठीण नव्हता, अता वाटते
उगाच तेंव्हा उभ्या जगाशी भांडत गेलो

प्रेम तुझ्यावर असे अम्ही बेसुमार केले
दिसेल त्यावर तुझ्या कल्पना लादत गेलो

तुझे बोट सुटले एका नाजुक वळणावर
उभा जन्म मी इथे-तिथे ठेचाळत गेलो

सरता सरता रात्र दुःख वाढ्वून गेली
दिवस तापला आणिक मी भेगाळत गेलो

अनंत ढवळे

3.

एवढीही आठवण येऊ नये
एवढे कोणामधे गुंतू नये

हा कसा संवाद आहे चालला
की कुणी ऐकू नये, बोलू नये

जन्मण्याआधीच भंगावी कॄती
एवढे शिल्पास या कोरू नये

थांबलो आपण कुणासाठी कधी
आपल्यासाठी कुणी थांबू नये

अनंत ढवळे



Monday, March 10, 2014

गझल


एक जुनी गझल..

तसा कुठे मी धर्माच्या चौकटीत बसतो
कधी तरी देवळात जातो, पाया पडतो

थेट तुझ्याशी बोलून काही साधत नाही
अनुत्तरित प्रश्नांचा गठ्ठा मागे उरतो

मला पाहिजे काय मला हे कुठे उमगले
मागी बनुनी दिशा दिशा धुंडाळत फिरतो

निर्मळ हसून तू जन्माचे गूढ उकलले
मी व्याख्येच्या वनात अजुनी वणवण फिरतो

-- अनंत ढवळे

Wednesday, February 26, 2014

सुटे शेर

किती तरी वलये प्रेमाची
तुझे कोणते कुठले माझे

जे माझे नाही ते नाही
जे आहे ते आहे माझे

अनंत ढवळे

फेब्रुवारी २७ २०१४ 

Sunday, February 23, 2014

गझल

 गोष्टींमधला व्यर्थपणा समजू येणे
 एक सूर्य बुडणे दुसरा उगवू  येणे

  हे कुठले जंगल तुडवू जातो आपण
  पदोपदी आभास जिथे उगवू येणे
 
  टपटपून येतात प्रश्न आपल्यापुढे
  कपाळावरी घाम  जसा निथळू येणे

   अनंत ढवळे

Friday, January 10, 2014

सुटे शेर

 सुटे शेर

  वाट बघत बसलेत जगाचे मंच हजार
  मी किमया हरवत जाणारा किमयागार

  दु:ख जसे अव्यक्त तसे आयुष्य महान
  हे आदिम निर्वंश  तसे ते  अपरंपार

  ++++

 पाहिली दुनिया जशी  दिसली तशी
 रेघ मग मी ओढली जमली तशी

 भटकतो गर्तेत पाचोळा जसा
 आपली आवर्तने  उरली तशी

अनंत ढवळे

पुणे २०१३/ १४

Tuesday, May 28, 2013

बेटावरच्या कविता

बेटावरच्या कविता
१.
हे मिस्टर
यू लुक लॉस्ट
दोन इंग्रजी पोरं मला म्हणाली
मी विचारात पडलो
बहुतेक आपलं हरवलेपण
आजकाल चेहर्‍यावरही दिसून येऊ लागलंय
२.
डू यू गो टू द युनी ऑर समथिंग
मी तिला विचारलं  
नथिंग ऑफ दोज सॉर्टसआय हॅव  बेबी  
ती म्हणाली
गिव द लेडी वॉटेवर शी वाँटस
मी बार टेंडरला म्हणालो.
३.
हे देशी लोक स्वतःला आजकाल देशी समजत नाहीत
इनिट मेट वगैरे म्हणतात
खणाणा पाउंड्स मोजतात
पुण्या- मुंबईकडं घरं विकत घेतात
वेदर बिदर च्या गप्पा मारतात
कडाक्याच्या थंडीत
नाताळाच्या सेलमधल्या
सगळ्यात स्वस्त वस्तू हडपण्यासाठी
सकाळी चार वाजेपासून
दुकानांबाहेर रांगा लावून उभे राहतात
अधून-मधून
माणसाला आयुष्यात कुठं थांबायचं
हे कळाल पाहिजे
असंही म्हणतात
- अनंत ढवळे

Sunday, February 24, 2013

तारेने जोडलेली गर्दी

मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही

एक गर्दी माझ्याकडून आपली कामं करून घेत असते
एका तारेन जोडलेली ही गर्दी
माझ्यासोबत चालत राहते रात्रंदिवस
माझा रंग या गर्दीचाच रंग आहे
मी या गर्दीच्याच भाषेत बोलत असतो
ही गर्दी माझ्या घरात-
माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये
येऊन शिरली आहे

ही गर्दी मला वाहावत नेत असते
उंची शहरांच्या वैभवशाली रस्त्यांमधून
बहुमजली दुकानांमधून
माझ्यासभोवती वस्तूंचे एक जाळं पसरून पडलेले आहे
या वस्तू माझ्या आहेत की नाहीत
हे मला माहीत नाही
किंवा हे की या वस्तू नक्की कशासाठी आहेत

ही गर्दीच ठरवत असते माझ्या वेळा
माझी जगण्याची पध्दत
माझं जीवन
या गर्दीसाठी एक मनोरंजन आहे
ही गर्दी बघत असते माझ्या प्रतिमा
ऐकत असते माझा आवाज
न्याहाळत असते
माझी प्रत्येक हालचाल

इथून तिथवर पसरलेली ही अफाट गर्दी
एका तारेने जोडलेली ही भयंकर वेगवान गर्दी;
ही गर्दी माझ्याकडून आपली कामं करून घेत असते
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही…..
अनंत ढवळे

(02/2013 Milton Keynes)