Sunday, February 24, 2013

तारेने जोडलेली गर्दी

मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही

एक गर्दी माझ्याकडून आपली कामं करून घेत असते
एका तारेन जोडलेली ही गर्दी
माझ्यासोबत चालत राहते रात्रंदिवस
माझा रंग या गर्दीचाच रंग आहे
मी या गर्दीच्याच भाषेत बोलत असतो
ही गर्दी माझ्या घरात-
माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये
येऊन शिरली आहे

ही गर्दी मला वाहावत नेत असते
उंची शहरांच्या वैभवशाली रस्त्यांमधून
बहुमजली दुकानांमधून
माझ्यासभोवती वस्तूंचे एक जाळं पसरून पडलेले आहे
या वस्तू माझ्या आहेत की नाहीत
हे मला माहीत नाही
किंवा हे की या वस्तू नक्की कशासाठी आहेत

ही गर्दीच ठरवत असते माझ्या वेळा
माझी जगण्याची पध्दत
माझं जीवन
या गर्दीसाठी एक मनोरंजन आहे
ही गर्दी बघत असते माझ्या प्रतिमा
ऐकत असते माझा आवाज
न्याहाळत असते
माझी प्रत्येक हालचाल

इथून तिथवर पसरलेली ही अफाट गर्दी
एका तारेने जोडलेली ही भयंकर वेगवान गर्दी;
ही गर्दी माझ्याकडून आपली कामं करून घेत असते
मी मला जे वाटतं ते कधी करतच नाही…..
अनंत ढवळे

(02/2013 Milton Keynes)

No comments:

बरेच

बरेच काही आहे - जमलेले, जमवलेले निरर्थक रूपके देऊन मी वेळ मारून नेऊ शकेन एवढी बेगमी तुम्ही काय आणणार पुढे ते सांगा पिढ्यांचा निरर्थक इत...