Sunday, July 13, 2014

इच्छा

बळ माझे अथवा काळाची इच्छा ही
जग  भवताली कोसळणे ;  उरणे माझे

अनंत  ढवळे


 

Thursday, June 12, 2014

गझल

गझल


कारण काही नाही पण, मन उदास झाले आहे
हा अनाथ धुरकटला क्षण, मन उदास झाले आहे
भेटेन एकदा म्हणतो, मृत्यूच्यापार तुला मी
दरम्यान युगांताचे रण, मन उदास झाले आहे
एकेक मोजतो आहे, की कसे बळावत गेले
जन्माचे विस्कटलेपण, मन उदास झाले आहे
उर्वरिता रिक्ता त्याज्या, मिळतील तुला ही नावे
हे दुनियेचे दानीपण, मन उदास झाले आहे
हे प्रवाहगामी जीवन, ही अनुगमनांची कथने
दशकांवर काळाचे वण, मन उदास झाले आहे
अनंत ढवळे

Saturday, April 19, 2014

जग बहुधा पालटून  गेले
मी रस्ता चुकलेला नाही..

अनंत ढवळे

Tuesday, April 15, 2014

काचेरी

आजकाल मी विचार करतो
डोक्यामधल्या हजार गोष्टी
लहान मोठे लढे निरंतर
या सगळ्याचा निकाल लाउन
कल्पनेतल्या कवीप्रमाणे
धाउन जावे अवघे अंतर
समोरच्या काचेतुन दिसतो
किती भव्य हा हिरवा डोंगर

अनंत ढवळे

Saturday, April 12, 2014


पुर्ण गझल अद्याप झालेली नाही :

कारण काही नाही पण, मन उदास झाले आहे
हा अनाथ धुरकटला क्षण, मन उदास झाले आहे..

अनंत ढवळे

Tuesday, April 1, 2014

एक दिवशी रोडवर येतील बघ
आपल्या संकीर्णतेची लक्तरे...
अनंत ढवळे

Friday, March 28, 2014

एक कविता

दिवस तापत चाललेत
घोंघावत राहते हवा
मी वाहावत जातो रस्तोरस्ती
या धुराळ्या सोबत

मनात
उजाड झालीए
एक वस्ती

ही उन्हे नेहमीचीच
हा ऋतू नित्याचा
उजाड वस्त्यांमधील
उदास दारे
डोळे लावून असल्यासारखी
कुठेतरी

हे वैराण दुभंगलेपण
कुठल्या दुःखासोबत
माझ्या मागे मागे चालत आलंय

या उध्वस्त कोरड्या दुपारी
किती वर्षं झालीत
माझा पाठलाग करताहेत

अनंत ढवळे