Tuesday, July 5, 2022

2

 Trees forget 

Books forget


The circumlocutions of life 

Everybody forgets,

The minutiae 


The plans, the

Mighty schemes the

Hurrahs and effulgences 


Poems forget 

Stories forget 


The little details, the vain 

Glances of appreciation

The ephemeral validations

The ornaments of craft


Everyone forgets 

Everything forgets 


-


Anant Dhavale 

Wednesday, June 15, 2022

1


रस्ते विसरतील 

गावे विसरतील


जमिनी, विहिरी, शेते, बांध विसरतील 

विकून टाकलेली घरे विसरतील 


कविता विसरतील

गोष्टी विसरतील 

जगण्याची आल्हाळपाल्हाळ 

कवने विसरतील 


ह्या फापटपसाऱ्यात

विसरून जातील बहुतेक आयुष्ये 

चढ - उतार 

खाच- खळगे 



हे पूर ओसरतील तेंव्हा 

उंचावून येतील 

आपापल्या पतनांचे

मरण उंचवटे 



अनंत ढवळे 



Tuesday, May 24, 2022

दुरावलेल्या 

भावंडांसारख

तुरळक-विरळ आहे आभाळ

त्यात

हे नंबर हरवल्यागत काही वाटण

म्हणजे 

बंद झालेल्या जुनेराची 

जाणीव होण्यासारख काही 

असल पाहिजे


माध्यान्हीच उनाडपण

कडूलिंबाच्या 

तुरळक सावलीत 

विचार करत बसण्याजोग

मटकन बसून


ही घालमेल सुटत नाही

दगडमातीखडकांतल्या 

दिवसांची


पहाड उतरून आहेत खोलवर आपल्या मनात

म्हणून या बेरंग दऱ्याखोऱ्यात काहीतरी

धुंडाळत जाण्यासारख


किंवा असच काहीतरी



अनंत ढवळे 


1

 हे लेखक- कलाकार 

यडचाप 

छंदीफंदी लोक


माणसाला माणूस ठेवणारे लोक


मोठी विपदा ही नाही की आजकाल उरलेच नाहीत 

असे बेदरकार लोक - 

ठाम भूमिका घेवू शकणारे लोक


भल्या-भल्याना वठणीवर आणणारे 

साधेसुधे लोक 


त्रासदी ही आहे, की ठार

गप्प बसून आहेत 


कधीच गुमान न बसू शकणारे लोक.



अनंत ढवळे 


Thursday, April 28, 2022

2

 काय मारून खात चालल आहे

दिवसेंदिवस

की आपण असे कणाकणाने मरत 

जातो आहोत


हा आपल्या बघण्याचा होत जाणारा लोप आहे

अथवा सभोवती पसरून असलेल

द्वेष आणि हिंसेच

विष

रूतत चालल आहे

काळजात

खोलवर


आणखी खोलवर.



अनंत ढवळे

Tuesday, April 26, 2022

सूचना

गझल संकलकांसाठी एक कायदेशीर सूचना - माझ्या कविता, हायकू आणि गझल माझ्या अधिकृत परवानगीशिवाय कुठल्याही ऑनलाईन माध्यमातून, मासिकातून, पुस्तकातून अथवा अन्य कुठल्याही माध्यमातून प्रकाशित करू नये. 

Sunday, March 13, 2022

2

 शेरात सर्वनामांचा अतिरेक झाला की कवीची वृत्तपूर्तीसाठी धडपड सुरू आहे हे सहज लक्षात येते. विशेषत: अक्षरगणांमध्ये हे होताना दिसते. 


ही गोष्ट शब्दयोगी / उभयान्वयी अव्ययांच्या बाबतीतही लागू होते. एकाच शेरात अनेक अव्यये घुसडली की शेर निर्रथक वाटू लागतो.

हा क्राफ्टचा भाग आहे, बारिक मुद्दा आहे - आणि ह्यात बरेच प्रसिघ्द कवी फसलेले मी पाहिले आहेत. अशा गझलाना मी गमतीने सर्वनामी गझला म्हणतो 🙂.

सर्वनाम म्हणजे काय, अव्यये काय आहेत हे बघितल पाहिजे. शिवाय शब्दांशी विशेष जवळीक असलेली बरी..जुने शब्द कुठले होते, काय वेगवेगळ्या अर्थच्छटा निघून येतात हे बघण चांगल्या कवीच्या मशागतीचा भाग असतो.

अमूक शब्दाची व्याकरणातली संज्ञा काय आहे हे माहिती असावेच असा नियम नाही, पण आशय मांडताना शब्दांची गफलत होते आहे हे लक्षात येण तेवढ कठीण नाही.

मीर आणि गालिब जेवढे मोठे कवी होते, तितकेच ते भाषेचे अभ्यासक देखील होते, शेरांचा अनेक अंगाने विचार करणारे होते. 

एकूण चांगले शेर आकाशातून पडत नाहीत, ते लिहावे लागतात ! 

(ह्या नोंदीचा टोन उपदेशात्मक वाटल्यास क्षमस्व.)

ता. क. - व्याकरणाचे काम नुसते नियम बनवण्याचे नसून संज्ञा ठरवण्याचे, दिशा दाखवण्याचे देखील आहे. बोलीभाषेला देखील स्वत:चे असे अलिखित व्याकरण असतेच. व्याकरण हे साधन (means to an end) आहे, त्याचा द्वेष नको. तिथल्या नको त्या गोष्टी दूर करता येवू शकतात - उदाहरणार्थ नको तिथ अनावश्यक अनुस्वार देण मला योग्य वाटत नाही आणि माझ्यापुरत ते मी बंद केलेल आहे. 

__

अनंत ढवळे