समकालीन गझलच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिसऱ्या अंकातला हा लेख. खरतर लेख ह्याच अंकात पूर्ण करायचा विचार होता पण विषयाचा आवाका मोठा असल्याने केवळ पहिलाच भाग लिहिता आला.
कवितेची अथवा कुठ्ल्याही कलेची मीमांसा करण्याचे काम सरळसोट नाही. एरवी होणारे ज्ञानार्जन आणि कलेतून होणारी निर्मिती असे दोन तौलनिक बिंदू घेवून ह्या संदर्भात विचार करता येईल का हे बघणे ह्या लेखाचा काहीसा उद्देश्य आहे. एका लेखातून हे पूर्णपणे साध्य होणारे नाही ह्याची मला जाणीव आहे. प्रश्न आणि समस्या मुळातून ओळखणे, हे त्यांची सोडवणूक करण्याइतपत अथवा त्याहूनही अधिक महत्वाचे असते असे इतर शाखांमधील संशोधन सांगते. बीजरूपाने काही महत्वाच्या संदर्भांची चर्चा करणे, महत्वाचे प्रश्न ओळखणे आणि त्यातून काही उत्तरांच्या शक्यता शोधता येतील का हे बघणे असा काहीसा हा प्रयत्न आहे. गझलेसारख्या विचारानुगामी साहित्यविधेच्या बाबतीत हे काम अधिकच जटिल बनते. इथे रचना हा एक अधिकचा घटक बनून उभा राहतो. गझलेच्या रीती बघताना, गझलेचे भौतिक, ठाशीव घटक आणि शब्दांमागची वैचारिक साधने असा दोन्ही अंगानी विचार करावा लागतो. गझलेची भाषिक, आकारिक साधने गझलेची 'रीती' घडवताना दिसून येतात; तर वैचारिक साधने ह्या रीतीच्या साच्यामधून कलेचे रसायन ओतून नवनिर्मितीचे , सर्जनाचे काम करत असतात. इथे अनेक गोष्टी आहेत - राग, लोभ, आवड , ऊन, सावली ह्यांसारखी संश्लेषणात्मक ( सिंथेटिक) वेदने (पर्सेप्शन्स) आहेत. या वेदनांमधून निर्माण होणार्या भावना आहेत, त्याहूनही अधिक जटिल असे विश्लेषणात्मक (अनलिटिकल) विचार आहेत. एकूण इंद्रियाना जाणवणारे अनुभव आणि त्या अनुभवांचे सातत्याने होत जाणारे वैचारिक संकलन अशा संमिश्रतेची ही जमीन आहे. गोष्टींचा इंद्रियांद्वारे अनुभव येणे, त्या गोष्टी समजणे, आणि त्याही पलिकडे जाऊन गोष्टींमागचा अन्वयार्थ जाणवणे या तीनही प्रक्रिया सात्यत्याने अथवा खंडीत स्वरुपात होत असतात. वरकरणी 'लक्षात येणे ' ह्या एकाच घटनेसाठी या वेगवेगळ्या शब्दांची भाषेत योजना होण्या मागचे हे एक महत्वाचे कारण असावे.
विचाराच्या अंगाने जाणारी कविता निव्वळ भावनिक असू शकते का? भावनेच्या तळाशी देखील विचार आहेच. मुळात विचार हे व्यक्त होण्याचे वाहन आहे असे मानून चालल्यास ह्या प्रश्नाचे उत्तर होय असेच द्यावे लागते. विचार कसा व्यक्त झाला आहे ह्यावर कवितेची तथाकथित बाह्यता यशस्वी होते अथवा होत नाही. ह्या ' कसे' चे उत्तर अनेक अंगाने देते येते. शैली आहे, गझलेच्या बाबतीत मजमून-निगारी (ढोबळ मानाने एखादा विचारव्यूह अथवा बंध घेवून त्याचा विकास करणे) ह्या सारखा एखाद-दुसरा अधिक घटकदेखील आहे. मोठ्या कवींकडे नव-नवे बंध निर्माण करण्याची हातोटी असते - निव्वळ विकास करण्याची नव्हे. मोठा कवी भाषेचे निर्माण करतो असे म्हटले जाते त्याचे हे देखील एक कारण आहे. उर्दू गझलेत शतकानुशतके मजमूननिगारीचे काम सुरू असल्याने तोच- तोचपणाचा कहर झालेला दिसून येतो. यात नवे मजमून (विचार-प्रतिमाबंध) न कल्पिता जुन्या कवींचे मजमून उचलून त्यावर बांधकाम करण्याचा प्रयास दिसून येतो. ह्या ठराविक गोष्टींचे साहचर्य मूल्य अधिक असते - म्हणजे ‘सर्व’ (देवदाराचे झाड - फारसी कवींनी प्रियकाराला सदाहरित देवदाराची उपमा दिली. नंतर शतकानुशतके हा मजमून अनेक कवींनी मोठ्या प्रमाणात वापरलेला दिसून येतो) हा मजमून आला की, त्याचा रेखीव डौलदारपणा, सौंदर्य आलेच. अत्यंत कमी शब्दांत कवीचे काम होवून जाते! क्वचित काही शेरात हे प्रतिमान बरे भासत असले तरी अतिरेकाने रसभंग होऊन जाताना दिसून येतो.
कवीने आपले विचार-प्रतिमाबंध (मजमून) स्वतः निर्माण केले पाहिजेत असे मला प्रकर्षाने वाटते. हे दरवेळी शक्य नसते, भाषा आणि कवितेच्या काही मर्यादा आहेत हे मी जाणून आहे, पण कवीची स्वतःची अशी अद्वितीय वैशिष्ट्ये कवितेला दरवेळी नव्याने उजाळा देत असतात. हा ताजेपणा कवितेचा प्रवाह वाहता ठेवतो, कलेला जिवंत आणि विकसनशील ठेवतो. जिथे नवेपण असते, तिथे एक प्रकारची अव्यवस्थादेखील असते. वरवर घडीव वाटणार्या गझलेसारख्या कवितेच्या संदर्भात ही अव्यवस्था असहज वाटू शकते, पण ह्या अव्यवस्थतेच्या उलथा-पालथीमधूनच निर्मिती प्रक्रियेचे सौंदर्य पुढे येताना दिसून येते.
वरवर दिसणारे, बोचणारे वास्तव आणि मनातल्या संकल्पनांचे (आयडियाज) जग, या दोन अक्षांच्या भोवती विचारांची आवर्तने सुरू असतात. मात्र या वास्तवाचे देखील एकच एक वर्णन होऊ शकत नाही. मग ते निव्वळ वैयक्तिक स्तरावरचे वास्तव असो किंवा मानवी मनोव्यापाराच्या संभावनांचा (शक्यतांचा) अमर्याद भूमीपट. वास्तव काय आहे? ज्ञान कसे होते? विश्वाच्या व्यवस्थेमागे कोणती मूलभूत तत्वे आहेत? यांसारखे अनेक प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाला पडत आलेले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या प्रयत्नातून दर्शनांचा आणि विद्याशाखांचा जन्म झालेला दिसून येतो. भौतिकशास्त्राचे नियम असोत किंवा तत्वचिंतनातले सिध्दांत, काळ आणि अवकाश यांना समजून घेण्याचे हे मानवी प्रतिभेचे विविध प्रयास आहेत. कवितेचा प्रयत्न देखील असाच काही आहे, पण त्याला मानुषी आयाम जोडले गेलेले दिसून येतात. (किंबहुना याही पुढे जावून, इतर शास्त्रे विकसित होण्याआधी कविता हा मानवी ज्ञानाचा स्त्रोत होता असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. होमरच्या इलियड आणि ऑडिसी या दोन महाकाव्यांना ग्रीकमधल्या अनेक शास्त्रांचा आधार मानले जात होते.) भाषा ही अर्थातच ह्या व्यवस्थांची आधारभूत व्यवस्था (सिस्टम ऑफ सिस्टम्स) असल्याने या तीनही शाखांमधे मला अनेक ठिकाणी साधर्म्य आणि समानता दिसून येते. अर्थातच रीतीच्या पातळीवर विद्याशाखांमध्ये जे हजारो भेद दिसून येतात ते इथेही आहेतच. महायान बौद्धांचे निर्भर अस्तित्व, द्वैतवाद्यांचे द्वैत, आरिस्टॉटल आणि डिमोक्रेटस ह्यांची प्रकाश आणि कणांविषयीची मते, आधुनिक भौतिकशास्त्रातल्या डूआलिटी आणि इंटर-कनेक्टेड स्पेस ह्या संज्ञांशी जवळीक दाखवतात. आईनस्टाईन ह्या द्वैतासंबंधी काय म्हणतो हे बघणे उद्बोधक ठरेल:
"....असे वाटते की आपण कधी-कधी एकच सिद्धान्त वापरला पाहिजे, तर कधी दुसरा एखादा. ह्यातून एक नवी अडचण उभी राहते -ती म्हणजे वास्तवाची दोन परस्परविरोधी चित्रे; आणि यापैकी कुठलेही एकट्याने (निव्वळ स्वबळावर) प्रकाशाची घटना पूर्णपणे समजावून सांगू शकत नाही; एकत्रितपणे मात्र ह्या घटनेची संगती लावता येते. "
तरंग आणि कणाचे द्वैत (वेव्ह अँड पार्टिकल ड्युआलिटी) हा सिद्धांत ह्या संदर्भात उद्बोधक आहे. पदार्थांमध्ये कण आणि लाट (तरंग) ह्या दोन्हींची वैशिष्ट्ये असतात. प्रकाश काही वेळा कण स्वरूप भासतो तर काही वेळा एखाद्या लाटेसारखा. ह्या घटनेला वैशेषिक दर्शनातले ‘अनध्यवसाय’ म्हणजे 'अनिश्चयात्मक ज्ञान' असेही म्हणता येईल.
विचार हे एक गतिमान संघटन आहे. मनाच्या अवस्थांची उभारणी आणि संचलन अशी दोन्ही रूपे विचाराच्या संदर्भात दिसून येतात. भौतिक अवस्थेमुळे येणारे विशिष्ट विचार आणि विचारांमधल्या गडदतेचा व्यक्तिपुरत्या भवतालावर होणारा परिणाम या दोन्ही घटना विचाराना धरून घडतात. मग विचार हे या अनुभवांचे कार्यस्वरूप प्रकटन आहे अथवा मूलभूत कारण असा प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाची उकल कवितेच्या उलगडण्यातून होत जाते, किंवा कवीचा तसा प्रयत्न निश्चित असतो. विचार ही जाणीव, भावना, गरज, इच्छा इत्यादिंपेक्षा निश्चीत अधिक ठाशीव गोष्ट आहे. विचाराच्या रचनेत पडणारा कच्चा माल म्हणून या मूलभूत आणि अमूर्त गोष्टींकडे बघता येईल. भाषा, चिन्हे आणि विचारांच्या अभावात ह्यांचे अस्तित्व निश्चित असले, तरी असंप्रेषणीय आहे.
संशोधन पध्द्ती आणि विज्ञानाची प्रचंड प्रगती झालेली असली तरी अद्यापही एकूण मनोव्यापार सर्वतः समजणे आणि स्पष्टपणे संज्ञीकृत करणे कठीण आहे. हे भेद आपण आपल्या समजेनुसार आणि भाषिक साधनांच्या चौकटीतून करत जात असतो. विचाराचे बांधकाम बघितले, तर त्या खाली भाषेची भक्कम संरचना दिसून येते. विशिष्ट भाषा जाणणार्यांचे विचार विशिष्ट पध्दतीने घडत जातात असे संशोधक सांगतात. या संरचनेत घड-बिघाड अर्थातच आहेत. माझ्या मनात आलेला हा एक विचार मी मराठीतून मांडतो आहे, त्याची पूर्व-भूमिका, मांडणी आणि उत्तर-भूमिका, यांवर अर्थात मराठीतून बोलण्याचा आणि विशिष्ट लकबीने गोष्टी मांडण्याचा प्रभाव पडलेला आहे, शिवाय माझ्या सध्याच्या मनोवस्थेचाही. मी किंचित रागात, आहे, उदास आहे अथवा आनंदी आहे ई. एकूण विचाराचा पोत ही एक लांबरूंद दरी आहे. भाषा ही चिन्हांची व्यवस्था मानली, तर भाषेचे प्रमुख काम विचार व्यक्त करणे ठरून जाते.
विचारांशिवात ज्ञान संभवत नाही, पण विचार हे सत्य अथवा असत्य नसतात, तर ते केवळ आकृतीरूपाने असतात. विचारांच्या आधीची मानवी मेंदूची अवस्था ही कोर्या पाटीप्रमाणे (ट्याब्युला राझा) असते; ज्यावर आपले अनुभव विचार लिहितात असे जॉन लॉक म्हणतो. हे मत अनुभववादाला धरून आहे. म्हणजे जन्मजात (सहजात) कुठलीही गोष्ट नसते, इंद्रियाना येणारे अनुभव हेच आपली मनोभूमिका बनवत असतात असे ढोबळ मानाने म्हणता येईल.
एकीकडे देकार्तचे सहजात ज्ञान , तर दुसरीकडे लॉकची ही अनुभववादी विचार धारा, अशी ही दोन विरुध्द टोके आहेत. सर्व ज्ञान केवळ आणि केवळ अनुभवातूनच मिळत जाते असा लॉकच्या मतांचा अर्थ बरेचदा घेतला जातो, तो मात्र योग्य वाटत नाही. काही ज्ञाने आणि कल्पना सहजात असतात असे देकार्तचे म्हणणे होते. पुढे नॉम चॉम्स्की यांनी देखील भाषेच्या संदर्भात काहीसा समांतर प्रमेय मांडलेला दिसून येतो. ह्या प्रमेयानुसार (मनोवाद) भाषेच्या संरचनेच्या मुळाशी असलेली तत्वे ही मानवी मेंदू मध्ये जनुकीय पातळीवर, जन्मजात उपलब्ध असतात. मनात बीजरूपाने पडून आलेल्या गोष्टींचा बोध नंतर कधीतरी वेगवेगळ्या कारणांनी होणे, ही गोष्ट काही ज्ञाने सहजात असतात ह्या सिध्दांताला दुजोरा देते. किंवा हे की, एकतर ही ज्ञाने सहजात असतात किंवा योग्य तो उद्दीपक मिळेतो निष्क्रिय अथवा सुप्तावस्थेत पडून असतात (उदा. उपजतच जाणीव असलेल्या भाषेचा योग्य वातावरणात विकास घडून येणे). गोष्टी वरवर समजणे आणि त्याच सर्वार्थाने जाणवणे यातला कदाचित हाच फरक असावा.
लॉकने अनुभवाचे वेदन आणि अंतरिक्षण असे दोन प्रकार सांगितलेले आहेत. त्याच्या मते कल्पना आणि त्यांचे परस्पर संबंध यांनी आपले समग्र ज्ञान बनलेले असते. प्रतिमा आणि वेदन या दोहोंना तो कल्पनाच (ideas) मानतो. इथे कल्पना म्हणजे विचाराचा विषय असा अर्थ घ्यावा - आयडियाज). आपण बघितलेली एखादी वस्तू म्हणजे ती वस्तू नसून त्या वस्तूची आपल्या इंद्रियांनी उभारलेली प्रतिमा असते. आपण जी विधाने करत असतो, त्या विधानांमागच्या संकल्पना इंद्रियानुभवातून बनत जातात असा अर्थ घेता येतो. अनुभववादाचे एकंदर स्वरूप वैज्ञानिक पध्दतीना पाठबळ देणारे आहे. मानवी ज्ञान आणि नीती ह्यांचे स्वरूप समजावून घेण्यात अनुभववादाने मोठा हातभार लावलेला दिसून येतो. वेगवेगळी वेदने आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिक प्रतिमा ह्यांच्या मालिका म्हणजे आपले अनुभव असतात असे डेव्हिड ह्यूम मानतो. त्याच्या मते कार्य आणि त्याचे कारण हे बुद्धिगम्य नसून अनुभवगम्य असते. त्याने मानवी वर्तनाच्या संदर्भात विवेकापेक्षा भावना / उत्तेजना (इथे पॅशन ह्या अर्थाने) ह्या अधिक प्रबळ असतात असे मानले होते. माणसाचे मन म्हणजे कुठलेही एकत्व नसलेला वेदनांचा पुंजका आहे (बंडल ऑफ पर्सेप्शन्स - वेदन) असे तो म्हणतो
"…. मी जेंव्हा माझ्या 'स्व' मध्ये प्रवेश करतो - तेंव्हा मी नेमका कुठल्या न कुठल्या वेदनाशी येवून अडखळतो - जसे की गर्मी वा थंडी, ऊन किंवा सावली, प्रेम अथवा द्वेष, पीडा किंवा आनंद. मला मी कुठल्यातरी वेदनाशिवाय कधी सापडतच नाही, आणि वेदनाखेरीज इतर काही मला दिसतही नाही. जेंव्हा ही वेदने माझ्यापासून काढून घेतली जातात, उदाहरणार्थ गाढ झोपेत असताना, (तेंव्हा) मी जणू काही अस्तित्वातच नसतो, मला माझी कुठलीही जाणीव नसते.” (इथे वेदन हा शब्द पर्सेप्शन या अर्थाने वापरलेला आहे; नेहमीच्या वापरात असलेल्या ‘वेदना’ म्हणजे पीडा, दु:ख या शब्दाहून वेगळा अर्थ घ्यावा.)
एकूण ‘स्व’ किंवा ‘आत्म’ ही संकल्पना अनुभवजन्य बोधनांखेरीज संभवत नाही. आपण म्हणजे आपल्या इंद्रियाना येणारे अनुभव आणि त्यांपासून अंतिमतः बनणार्या संकल्पना असतो. इंद्रियाना आलेले अनुभव (इंद्रियगोचर ज्ञान) आणि त्या अनुभवाचा मानसिक आशय अथवा प्रतिमा हा मानवी कल्पनांचा कच्चा माल असतो. सहज काय आहे, आणि अर्जित काय आहे हा सहजवादी (विवेकवादी /नेटिविस्ट्स) आणि अनुभववादी (एम्पिरिअलिस्ट्स) ह्यांच्यातला काहीसा मतभेदाचा विषय असला तरी ही दोन्ही मते आपापल्या ठिकाणी योग्यच वाटतात. इंद्रियांना होत जाणारे दैनंदिन ज्ञान आणि बुध्दी व विवेकातून विकसित होत जाणारे विचारात्मक ज्ञान, ह्या दोन्ही गोष्टी ढोबळ मानाने स्वतंत्रपणे अस्तित्वात असतात असे मानणे अगदीच अयोग्य ठरू नये. बुध्दी आणि विवेकामागच्या मूलभूत प्रेरणा आणि व्यवस्था काय आहेत हा संशोधनाचा विषय आहे.
कांटच्या काळात या दोन्ही मतप्रवाहांचा दबदबा होता. वरकरणी पूर्णतः विरोधी वाटणारी ही मते, एकीकडे धर्म आणि दुसरीकडे विज्ञान, या दोन टोकांमधल्या तत्कालीन पेचातून उद्भवली होती. कांटने त्याच्या क्रिटिक ऑफ प्यूर रिझन (शुद्ध बुध्दीची समीक्षा) ह्या ग्रंथातून, या मतांचे विश्लेषण आणि समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. अनुभवातून मिळालेले पश्चातनुभवीय (अपोस्टिरिअरी) ज्ञान आणि अनुभवांच्या पलीकडे असणारे प्रागनुभवीय (अप्रिओरी) ज्ञान असे दोन प्रकार त्याने चर्चिले आहेत. कांटची ट्रान्सेंडेंटल आयडियालिझम (आध्यात्मिक चिद्वाद) ही विचारप्रणाली नैतिकता, सौंदर्यशास्त्र आणि तत्वज्ञान अशी सर्वत्र लागू होते. अर्थबोधासाठी कांटने चार प्रमुख वर्गांतर्गत बारा प्रकारच्या आकलन-कोटी सांगितल्या आहेत, त्या याप्रमाणे :
परिमाणसूचक (क्वांटिटी) - एकता (युनिटी), अनेकता (प्लूऱ्यालिटी), समष्टि (टोट्यलिटी ); गुणसूचक (क्वालिटी) - सत्ता (रिअॅलिटी), नकार (निगेशन), ससीमता (लिमिटेशन); संबंधसूचक (रिलेशन) - विषयगुणसंबंध, द्रव्यत्व (इनहरंस , सबसिस्टंस), कारणता (कॉजॅलिटी), निर्भरता (डिपेंडंस), सामूहिकता (कम्यूनिटी); प्रकारता - (मोडॅलिटी): शक्यता - अशक्यता (पॉसिबिलिटी, इंपॉसिबिलिटी), अस्तित्व-अनस्तित्व (एक्झिस्टंस, नॉन-एक्झिस्टंस), अनिवार्यता आकस्मिकता (नेसेसिटी, कंटिंजंसी) .
ह्या आकलन-कोटींच्या माध्यमातून बाह्य जगाचा बोध होत असताना बुद्धी इंद्रियजन्य वेदनांमध्ये इतके बदल घडवून आणते की बाह्य वस्तूचे इंद्रियांना समजलेले स्वरूप आणि त्यांचे विवेक-बोधानंतर बनणारे आंतरिक स्वरूप हे अतिशय भिन्न असते. मागे म्हटल्याप्रमाणे वस्तूचे स्वरूप आणि त्या वस्तूची आपण बनवलेली मानसिक प्रतिमा या भिन्न असू शकतात. अर्थातच वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर प्रमाणीकरण झाल्याने, तसेच छायाचित्रणातून मिळणाऱ्या संदंर्भांमुळे ह्या संकल्पनेत किती बदल झालेला आहे (किंवा अजिबात झालेला आहे का) हे बघणे उपयुक्त ठरावे.
कांटने या आकलन-कोटी अॅरिस्टॉटलच्या विचारांच्या पायावर उभ्या केलेल्या दिसून येतात. अॅरिस्टॉटलने ज्ञानाच्या कारणांबद्दल काहीसा असाच विचार केला होता. त्याच्या मते कशाचेही ज्ञान होणे म्हणजे त्या वस्तूच्या कारणांचे ज्ञान होणे होय. ह्यासाठी त्याने उपादानकारण, आकस्मिककारण, हेतुकारण, आणि कर्तुकारण असे चार प्रकार कल्पिले होते. ह्या चार कारणांमध्ये पुढे सर्व पदार्थ अंतर्भूत होतात. भारतीय दर्शनांचा विचार करता वैशेषिकांनी ह्या संदर्भात सखोल चिंतन केल्याचे दिसून येते. वैशेषिकांनी अस्तित्वात असलेल्या आणि वर्गीकरण करण्याजोग्या सगळ्या वस्तूंना पदार्थ मानून त्यांचे द्रव्य, गुण आणि कर्म हे तीन प्रकार केले आहेत. ह्या द्रव्यांचे पुढे पृथ्वी, आप, वायू, तेज, आकाश ही पंचमहाभूते; काल, दिशा, आत्मा आणि मन असे नऊ भेद होतात. पैकी पंचमहाभूते ही इंद्रियगोचर/ अनुभवीय या प्रकारात मोडतात. सजीवांमध्ये असलेली बहुतेक जैविक वैशिष्ट्ये ही पंचमहाभूतांपैकी कुठल्या न कुठल्या प्रकारात मोडतात. पुढे गुणांचेही वैशेषिकांनी अनेक पोटप्रकार सविस्तर वर्णन केलेले दिसून येतात. त्यानी लौकिक विश्वाचे भाव आणि अभाव असे दोन विभाग सांगून ह्या दोन्हींचे प्रकार केले आहेत. पैकी भावाचे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष आणि समवाय; तर अभावाचे प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अत्यंताभाव आणि अन्योन्याभाव हे भेद आहेत. एखाद्या वस्तूचे नसणे, म्हणजे अभाव होय. कार्य उत्पन्न होण्याआधीचा अभाव म्हणजे प्राग-अभाव, कार्य नष्ट झाल्यानंतरचा अभाव म्हणजे प्रध्वंसाभाव, तीनही काळात सवर्था अभाव सणारे कार्य म्हणजे अत्यंताभाव; तर एका प्रकारच्या वस्तू मध्ये दुसर्या प्रकारच्या वस्तूचा अभाव म्हणजे अन्योन्याभाव. हा लेख मुळात कवितेसंबंधी असल्याने दर्शनांसंबंधी अधिक बोलणे उचित ठरणार नाही, पण वैशेषिक दर्शनांमधली वैज्ञानिक दृष्टी विलक्षण थक्क करून सोडणारी आहे. वैशेषिक मतांचा उहापोह करण्यासाठी स्वतंत्र लेख लिहावा लागेल.
एकूण मानवी बुद्धीस ज्ञान कसे होते ह्यासंदर्भात मीमांसकानी सखोल चिंतन केल्याचे दिसून येते. कवितेतून अथवा इतर ललित कलांमधून ज्ञान होण्याची प्रक्रिया मात्र कमालीची मुक्त आहे. ह्यात कुठलीही विशिष्ट रचना दिसून येत नाही - उलटपक्षी अशा रचनांच्या चौकटी मोडण्याकडेच कवींचा कल दिसून येतो. कवितेतला अर्थबोध, कवीचा निर्मिती- विषय आणि विचारांचा एकूण पट अतिशय विशाल असतो. विचारांच्या गतीने कवितेतल्या विधेयांचा प्रवास सुरू असतो. मनातील आंदोलने, शुद्ध बुद्धी (प्यूर रिझन) आणि व्यावहारिक बुद्धीमधला (प्रॅक्टिकल रिझन) संघर्ष, शब्दांची संहती - विरलता, संदर्भांचे, प्रतिमांचे बांधकाम, आठवणी, अनुभव, परानुभव अशा अनेक गोष्टी सांगता येतील. इंद्रियाना आलेले अनुभव आणि बुद्धीग्राह्य ज्ञान ह्या पलिकडचे काही ज्ञान अथवा बोध, हा कलांच्या निर्मितीमागचा मूळ स्त्रोत असावा असे म्हणावेसे वाटते. कांटच्या पुर्वानुभवीय आणि पश्चातनुभवीय ज्ञानांसोबत मला सर्जन ज्ञान (क्रियेटिव कॉग्निझंस) असा तिसरा घटक जोडावासा वाटतो. हे सर्जन ज्ञान वेगळे नसून बुध्दीग्राह्य अप्रियोरी (अनुभव येण्याआधीचे सहज ज्ञान) ज्ञानच आहे असा ह्यावर प्रतिवाद केला जावू शकतो, पण शुध्द बुध्दीची विचार करण्याची तर्कसंगत पद्धत आणि कलेच्या रीतींमध्ये मूलभूत फरक दिसून येतो. प्रातिभिक उत्कर्ष ही या सर्जन ज्ञानाची पुढची अवस्था मानता येईल. कांटचे मत मात्र वेगळे आहे. तो सौंदर्य आणि कला यांना बोध न मानता अभिरुचीचा निर्णय मानतो. कल्पना आणि आकलन ह्यांमध्ये एकत्व साधणारी शक्ती म्हणजे त्याच्या मते प्रतिभा होय.
आपले सर्व अनुभव हे स्थल (स्पेस) आणि काल (टाईम) या दोन आकारांमध्ये घडून येत असतात असे अनुभववाद सांगतो. कविता मात्र स्थल आणि काल या दोनही आकारांना छेदून पुढे जाताना दिसून येतात. निर्मितीच्या अवस्थेतले हे सर्जन ज्ञान नेमके कसे कार्य करते हे सांगणे कठीण आहे, मात्र, निर्मित कलेचा अभ्यास करून त्या संदर्भात काही आडाखे बांधता येणे शक्य आहे. एकंदर सापडण्याआधी हरवण्यासारखी ही काहीशी प्रक्रिया आहे.
कोई देखे इस जुस्तजू की तरफ
लिहिणार्याचा विलय ही एक विलक्षण अवस्था आहे. या अवस्थेला शब्दबद्ध करण्यासाठी वेड, जुनून, बेखुदी, शौक, बेखबरी, ट्रांस, भान (अथवा भानाचा अभाव) असे विविध भाषांमधले बंध कवींनी योजले आहेत. व्यावहारिक बुध्दीला न समजणार्या, न जमणार्या असीम कल्पना कवीच्या ह्या प्रातिभिक विलयातून जन्म घेत असतात. विलयातून आकार निर्माण होण्याची ही घटना मोठी मनोरम आणि तितकीच आश्चर्यकारक असते.