Sunday, January 10, 2021

ज्ञानमीमांसा आणि कलेतून होणारी निर्मीती

 कवितेची अथवा कुठ्ल्याही कलेची मीमांसा करण्याचे काम सरळसोट नाही. एरवी होणारे ज्ञानार्जन आणि कलेतून होणारी निर्मीती असे दोन तौलनिक बिंदू घेवून ह्या संदर्भात विचार करता येईल का हे बघणे ह्या लेखाचा काहीसा उद्देश्य आहे. एका लेखातून हे पूर्णपणे साध्य होणारे नाही ह्याची मला जाणीव आहे. प्रश्न आणि समस्या मुळातून ओळखणे, हे  त्यांची सोडवणूक करण्याइतपत अथवा त्याहूनही अधिक  महत्वाचे असते असे इतर शाखांमधील संशोधन सांगते. बीजरूपाने काही महत्वाच्या संदर्भांची चर्चा करणे, महत्वाचे प्रश्न ओळखणे आणि त्यातून काही  उत्तरांच्या शक्यता शोधता येतील का हे बघणे असे काहीसा हा प्रयत्न आहे. 

गझलेसारख्या विचारानुगामी साहित्यविधेच्या बाबतीत हे काम अधिकच जटील बनते. इथे रचना हा एक अधिकचा घटक बनून उभा राहतो.  गझलेच्या रीती बघताना, गझलेचे भौतिक, ठाशीव घटक आणि शब्दांमागची वैचारिक साधने असा दोन्ही अंगानी विचार करावा लागतो. गझलेची  भाषिक, आकारिक साधने गझलेची 'रीती'  घडवताना दिसून येतात; तर वैचारिक साधने ह्या रीतीच्या साच्यामधून कलेचे रसायन ओतून  नवनिर्मीतीचे , सर्जनाचे  काम करत असतात.  इथे अनेक गोष्टी आहेत - राग,लोभ, आवड , उन, सावली  ह्यांसारखी  संश्लेषणात्मक ( सिंथेटिक)  वेदने  (पर्सेप्शन्स) आहेत. या वेदनांमधून निर्माण होणार्‍या भावना आहेत, त्याहूनही आधिक जटिल असे विश्लेषणात्मक ( अनालिटीकल)  विचार आहेत. एकूण इंद्रियाना जाणवणारे अनुभव आणि त्या अनुभवांचे सातत्याने होत जाणारे वैचारिक संकलन अशी ही  संमीश्रतेची जमीन आहे.  गोष्टींचा  इंद्रिय गोचर अनुभव येणे, त्या गोष्टी  समजणे, आणि त्याही पलीकडे जावून गोष्टींमागचा अन्वयार्थ जाणवणे या तीनही प्रक्रिया सात्यत्याने अथवा खंडीत स्वरुपात होत असतात असे मला वाटते.  वरकरणी 'लक्षात येणे ' ह्या  एकाच घटनेसाठी या वेगवेगळ्या शब्दांची भाषेत योजना होण्या मागचे हे एक महत्वाचे कारण असावे.           

--

अनंत ढवळे



( समकालीन गझलसाठीच्या निर्माणाधीन लेखातून) 


No comments:

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...