वरवर दिसणारे, बोचणारे वास्तव आणि मनातल्या संकल्पनांचे (आयडियाज) जग, या दोन अक्षांच्या भोवती विचारांची आवर्तने सुरू असतात. मात्र या वास्तवाचे देखील एकच एक वर्णन होऊ शकत नाही. मग ते निव्वळ वैयक्तिक स्तरावरचे वास्तव असो किंवा मानवी मनोव्यापाराच्या संभावनांचा (शक्यतांचा) अमर्याद भूमीपट. वास्तव काय आहे? ज्ञान कसे होते? विश्वाच्या व्यवस्थेमागे कोणती मूलभूत तत्वे आहेत? यांसारखे अनेक प्रश्न हजारो वर्षांपासून माणसाला पडत आलेले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या प्रयत्नातून दर्शनांचा आणि विद्याशाखांचा जन्म झालेला दिसून येतो. भौतिकशास्त्राचे नियम असोत किंवा तत्वचिंतनातले सिध्दांत, काळ आणि अवकाश यांना समजून घेण्याचे हे मानवी प्रतिभेचे विविध प्रयास आहेत. कवितेचा प्रयत्न देखील असाच काही आहे, पण त्याला मानुषी आयाम जोडले गेलेले दिसून येतात. (किंबहुना याही पुढे जावून, इतर शास्त्रे विकसित होण्याआधी कविता हा मानवी ज्ञानाचा स्त्रोत होता असे म्हणण्यास भरपूर वाव आहे. होमरच्या इलियड आणि ऑडिसी या दोन महाकाव्यांना ग्रीकमधल्या अनेक शास्त्रांचा आधार मानले जात होते.) भाषा ही अर्थातच ह्या व्यवस्थांची आधारभूत व्यवस्था (सिस्टम ऑफ सिस्टम्स) असल्याने या तीनही शाखांमधे मला अनेक ठिकाणी साधर्म्य आणि समानता दिसून येते. अर्थातच रीतीच्या पातळीवर विद्याशाखांमध्ये जे हजारो भेद दिसून येतात ते इथेही आहेतच. महायान बौद्धांचे निर्भर अस्तित्व, द्वैतवाद्यांचे द्वैत, आरिस्टॉटल आणि डिमोक्रेटस ह्यांची प्रकाश आणि कणांविषयीची मते, आधुनिक भौतिकशास्त्रातल्या डूआलिटी आणि इंटर-कनेक्टेड स्पेस ह्या संज्ञांशी जवळीक दाखवतात.
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment