किती केले जतन काहीच नाही उरत बाकी बा
अशी धास्ती पुन्हा की नेत आहे धोंड खाली बा
जिथे बघतो तिथे दिसते तफावत रूंद होणारी
तुझ्या स्वप्नातली दुनिया कुठे तामीर झाली बा
जुन्या गाद्या नवे मालक कुठे काही बदल होतो
अशी वळकट किती केल्या सरळ जी होत नाही बा
कुठे नेशील इतका द्वेष भय नाही तुला कसले
समज येईल हे लांछन उद्या माथी तुझ्याही बा
न समजावी तुला अथवा मला ही गोष्ट जन्माची
मुळातच बाब ही बनली न समजाव्यातलेली बा
—
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment