Sunday, March 13, 2022

2

 शेरात सर्वनामांचा अतिरेक झाला की कवीची वृत्तपूर्तीसाठी धडपड सुरू आहे हे सहज लक्षात येते. विशेषत: अक्षरगणांमध्ये हे होताना दिसते. 


ही गोष्ट शब्दयोगी / उभयान्वयी अव्ययांच्या बाबतीतही लागू होते. एकाच शेरात अनेक अव्यये घुसडली की शेर निर्रथक वाटू लागतो.

हा क्राफ्टचा भाग आहे, बारिक मुद्दा आहे - आणि ह्यात बरेच प्रसिघ्द कवी फसलेले मी पाहिले आहेत. अशा गझलाना मी गमतीने सर्वनामी गझला म्हणतो 🙂.

सर्वनाम म्हणजे काय, अव्यये काय आहेत हे बघितल पाहिजे. शिवाय शब्दांशी विशेष जवळीक असलेली बरी..जुने शब्द कुठले होते, काय वेगवेगळ्या अर्थच्छटा निघून येतात हे बघण चांगल्या कवीच्या मशागतीचा भाग असतो.

अमूक शब्दाची व्याकरणातली संज्ञा काय आहे हे माहिती असावेच असा नियम नाही, पण आशय मांडताना शब्दांची गफलत होते आहे हे लक्षात येण तेवढ कठीण नाही.

मीर आणि गालिब जेवढे मोठे कवी होते, तितकेच ते भाषेचे अभ्यासक देखील होते, शेरांचा अनेक अंगाने विचार करणारे होते. 

एकूण चांगले शेर आकाशातून पडत नाहीत, ते लिहावे लागतात ! 

(ह्या नोंदीचा टोन उपदेशात्मक वाटल्यास क्षमस्व.)

ता. क. - व्याकरणाचे काम नुसते नियम बनवण्याचे नसून संज्ञा ठरवण्याचे, दिशा दाखवण्याचे देखील आहे. बोलीभाषेला देखील स्वत:चे असे अलिखित व्याकरण असतेच. व्याकरण हे साधन (means to an end) आहे, त्याचा द्वेष नको. तिथल्या नको त्या गोष्टी दूर करता येवू शकतात - उदाहरणार्थ नको तिथ अनावश्यक अनुस्वार देण मला योग्य वाटत नाही आणि माझ्यापुरत ते मी बंद केलेल आहे. 

__

अनंत ढवळे

Tuesday, February 8, 2022

गझल

 संथसर दोघांमधे आभाळ किंवा

बारमधली म्लान संध्याकाळ किंवा


लांबलेली जॅझची जादू तलमसर

थंड रस्त्यांवर थबकला काळ किंवा


विसरलो नाही विसरणे कठिण होते

आपल्याला साधला सांभाळ किंवा


बदल ह्वावा ही खरोखर निकड होती 

उडवली होती उगाचच राळ किंवा


बदलतो कोठे महाराष्ट्री स्वभावो ?

आपले गुणसूत्रही खडकाळ किंवा 


अनंत ढवळे 

Thursday, December 23, 2021

1

आज वहीची पाने चाळताना हे शेर सापडले:


-


तू स्वस्थ असे बसणार किती 

चढते पाणी बघणार किती 


इतिहास तुला पुरणार किती 

उलटी गणना करणार किती 


हा तोच चिखल फसलोत जिथे

ह्या रस्त्यांवर भुलणार किती 


एके दिवशी म्हटले दादा*

उलटे धंदे करणार किती


ये जमिनीवर सोडव गुंते

नुसती स्वप्ने विकणार किती 


फसलात कितीदा हे मोजा

झोपेत तुम्ही रमणार किती ? 


-


अनंत ढवळे


* आम्ही भावंडं वडलाना दादा म्हणायचो

- असा/ असे

Tuesday, December 21, 2021

Short poems

 1.


We are what the tornado 

Has left behind


                        Broken walls 

Shaken homes


Not a glimmer of light



2.


What brings us closer 

In this nippy, windy night

                Love, 

                fear, 

                a guilt ? 


3.


These woods I traverse 

                    A lonesomeness moves

A twig snaps


4.


Stars are meek

The sky, a sullen canvas 

Autumn spreads        open

                Her arms 




Anant Dhavale

Monday, November 15, 2021

 काढू नकोस निष्कर्ष असे बसल्या बसल्या 

माझ्यापुरता इतिहास जाणला आहे मी

-

अनंत ढवळे

काही

 पहिल्या बर्फावर पडली सुप्ती कोणाची

ठोसरपण काचेवर झालेले जमा किती


निब्बान निसटले बोटांतुन मिळता मिळता

ओंजळ खुलल्यावर कळले ही निव्वळ धुंदी


-

अनंत ढवळे 


Saturday, November 6, 2021

1

 खिडकीतुन डोकावुन बघणाऱ्याची शंका

निर्धास्त आत पडलेल्यांच्या स्वप्नी शंका


मरणारा भिऊन पडलेला कल्पांतच हा

वाचूत कसे उरलेल्याना पडली शंका 


तू शस्त्र उभा घेऊन जरी हाती भारी

चालवले जर नाही तर काय मनी शंका 

 

भलताच गोड हा गोलमोल बोलत आहे

पण एकालाही आलेली नाही शंका 


वैताग नव्हे ह्याचा की तोंडावर पडलो 

इतक्यांदा का पडलो ही पडलेली शंका



अनंत ढवळे