Saturday, January 2, 2021

तरंग आणि कणाचे द्वैत ( Wave and Particle Duality )

 वास्तवाचे एकच एक वर्णन होऊ शकत नाही मग ते निव्वळ वैयक्तिक स्तरावरचे वास्तव असो किंवा संभावनांचा (शक्यतांचा) अमर्याद भूमीपट. 

भौतिकशास्त्राचे नियम असोत किंवा तत्वचिंतनातले सिध्दांत, काळ आणि अवकाश याना समजून घेण्याचे हे मानवी प्रतिभेचे विविध प्रयास आहेत. कवितेचा प्रयत्न देखील असाच काही आहे , पण त्याला मानुषी आयाम जोडले गेलेले दिसून येतात. भाषा ही अर्थातच ह्या व्यवस्थांची आधारभूत व्यवस्था (सिस्टम ऑफ सिस्टम्स) असल्याने या तीनही शाखांमधे मला अनेक ठिकाणी साधर्म्य आणि समानता दिसून येते. अर्थातच रीतीच्या पातळीवर विद्याशाखांमध्ये जे हजारो भेद दिसून येतात ते इथेही आहेतच. महायान बौध्दांचे निर्भर अस्तित्व,  द्वैतवाद्यांचे द्वैत, आरिस्टॉटल आणि  डिमोक्रेटस ह्यांची प्रकाश आणि कणांविषयीची मते आधुनिक भौतिकशास्त्रातल्या डूआलिटी आणि इंटर-कनेक्टेड  स्पेस ह्या सारख्या संज्ञांशी जवळीक दाखवतात.  आईनस्टाईन ह्या द्वैतासंबंधी काय म्हणतो हे  बघणे उद्बोधक  ठरेल : 

".....असे वाटते की आपण कधी कधी एकच सिद्धान्त वापरला पाहिजे, तर कधी दुसरा एखादा.  ह्यातून एक नवी अडचण उभी राहते  - ती म्हणजे वास्तवाची दोन परस्परविरोधी चित्रे ;  आणि ह्यापैकी कुठलेही एकट्याने (निव्वळ स्वबळावर) प्रकाशाची घटना पूर्णपणे समजावून सांगू शकत नाही;  एकत्रितपणे मात्र ह्या घटनेची संगती लावता येते. " 

तरंग आणि कणाचे द्वैत ( वेव्ह अँड पार्टिकल ड्युआलिटी) हा भौतिकशास्र्त्रातला सिध्दांत ह्या संदर्भात उद्बोधक आहे.  पदार्थांमध्ये कण आणि लाट ( तरंग) ह्या दोन्हींची वैशिष्ट्ये असतात.  प्रकाश काही वेळा कणस्वरूप भासतो तर काही वेळा एखाद्या लाटेसारखा.  ह्या घटनेला वैशेषिक दर्शनातले अनध्यवसाय म्हणजे 'अनिश्चयात्मक ज्ञान' असे ही म्हणता येईल. 

--

अनंत ढवळे

(लेख अजून कच्चा आणि अपूर्ण आहे...)


   

Thursday, December 31, 2020

2

वाचणे व्यथित होणे हे तितक्यापुरते

मग उरते जगणे रुटीन रहाटघाई 

अनंत ढवळे 

1

 हा बोध म्हणू की निव्वळ बेपर्वाई 

आश्चर्य मला कसलेही वाटत नाही .. 

अनंत ढवळे 

Monday, December 7, 2020

समकालीनमधल्या येत्या लेखामधून

समकालीनमधल्या  येत्या लेखामधून. हा लेख  व्यापक वळणाने जातो आहे - एकूण विचाराचे आणि कवितेचे स्वरुप असे काही :


विचार हे एक गतिमान संघटन आहे. मनाच्या अवस्थांचे  घडाई आणि संचलन अशी दोन्ही रूपे विचाराच्या संदर्भात दिसून येतात. भौतिक अवस्थेमुळे येणारे विशिष्ट विचार आणि विचारांमधल्या गडदतेचा व्यक्तिपुरत्या भवतालावर होणारा परिणाम या दोन्हीही घटना (स्वतंत्रपणे अथवा समांतर)घडून येताना दिसून येतात. मग विचार अनुभवांचे कार्यस्वरूप प्रकटन आहे अथवा मूलभूत कारण असा प्रश्न उपस्थित होतो.  चेतना आणि कार्य ह्यांचे एकत्व लक्षात घेतल्यास ( सर्गेई रुबीनस्टाईन), विचार हा चेतनेचा वाहक  ह्या नात्याने कार्य स्वरूप प्रकटन ठरतो असे म्हणावे  लागेल. या प्रश्नाची  अधिकाधिक उकल कवितेच्या उलगडण्यातून होत जाते, किंवा कवीचा तसा प्रयत्न निश्चीत असतो. विचार ही जाणीव, भावना, गरज , इच्छा  इत्यादिंपेक्षा निश्चीत अधिक ठाशीव गोष्ट आहे.  विचाराच्या रचनेत पडणारा कच्चा माल म्हणून या मूलभूत आणि अमूर्त गोष्टींकडे बघता येईल. भाषा, चिन्हे आणि विचारांच्या अभावात ह्यांचे अस्तित्व निश्चीत असले,  तरी असंप्रेषणीय आहे.


--
अंनत ढवळे 

2

 निबिड भानातले माध्यान्ह वाचत 

कवी गेलेत कविता राहिलेल्या 

-

अनंत  ढवळे 

1

मरण नसतोच शेवट मान्य हे पण 

मरण व्यापून दुविधा राहिलेल्या 

-

अनंत  ढवळे 

Thursday, July 16, 2020

चित्र

चित्र उभे केले रंगवले, अजरामरही झाले
माणुसपण सरले कोठे पण, जगणे उरले मागे..
-
अनंत ढवळे