Sunday, February 2, 2020

1

काही तुमच्या झाल्या काही माझ्या झाल्या
काळासोबत भल्या-बुर्‍या आवृत्त्या झाल्या

बदलत गेलो आपण दुनिया बदलत गेली
नाव - गाव जन्माच्या बाबी उपर्‍या झाल्या 

न्याय द्यायला उतावीळ झालेला जो तो
प्रत्येकाच्या  आपआपल्या व्याख्या झाल्या

काय तुझ्या ह्या रसाळ गोष्टींची नवलाई
हातोहात पसरल्या ह्याच्या-त्याच्या झाल्या

बोलत बसलो, किती तरी दिवसांचे साचण
कलू लागले  ऊन सावल्या मोठ्या झाल्या

--

अनंत ढवळे

Saturday, January 4, 2020

अनुकरणांचे प्रमाण

गझलेत अनुकरणांचे प्रमाण खूपच आहे -  फेसबुक सारख्या माध्यमांमुळे ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते . निदान श्रेय देण्याइतपत सौजन्य तरी असावे. पण तेही नाही.  बर हे गझलांपुरतं मर्यादित आहे असही नाही - लेखांमधले मुद्देदेखील  विनासं दर्भ उचलले जातात. एकंदर गझल क्षेत्रात अजून परिपक्व साहित्य संस्कॄती उदयाला आलेली नाही असे म्हणता येईल.  

Tuesday, December 31, 2019

तुरळक


आवर्त किती उठलेत तुझ्या बघण्याने
असतेस पाहिले जर का आधी थोडे


-

अनंत ढवळे

तुरळक

सद्भावना, अवहेलना, काही नको काही नको
आहे बरी ही धारणा, काही नको, काही नको

-

अनंत ढवळे

Tuesday, December 3, 2019

तुरळक शेर - २

बोलत बसलो किती तरी दिवसांचे साचण
कलू लागले उन्ह, सावल्या मोठ्या झाल्या..



--

अनंत ढवळे

तुरळक शेर - १

जगण्याचे स्तर इतके सगळे
एका जन्मी कळणार किती..



--

अनंत ढवळे

Monday, August 19, 2019

गझल

माझ्यासाठी इतके कर
हे सगळे राडे निस्तर

मी उगाच आशाळभूत
पानांची नुसती थरथर

जगलो मेलो ठीक - ठीक
पालूपद आता आवर

पब्लिकने केल्या नकला
नकलांचे इमले सुंदर

उरल्या सुरल्या ह्या गोष्टी
काळावर आप्ली मोहर

दूर- दूर वाजत जाते
कोणाची लोभस झांजर



अनंत ढवळे