Saturday, December 18, 2010

पाहे तिकडे दिशा ओस...

पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे
मनीचे साच होईल कईं । प्रेम देई भेटोनी
( तुकाराम )

मी जिकडे पाहतो तिकडे दिशा ओस पडून आहेत.. माझी आस तुझ्या पायांशी लागली आहे.. माझ्या मनातली भावना कधी खरी होईल ? एकदा मला भेट, तुझे प्रेम मिळू दे...

Monday, December 13, 2010

या झाडावर हा कुठला रोग पडलाय

या झाडावर हा कुठला रोग पडलाय
की हिरमुसून गेलंय सगळं जंगल

मला असं वाटतं की ही जुनी झाडं
जगली पाहिजेत खूप दीर्घ काळ
डोळ्यांमधले चंद्र दुधाळेपर्यंत
म्हणजे मला कल्पिता येतील
या झाडांसमेत
इतिहासातली पात्रे

आज संध्याकाळपासून
खूप जोराचा वारा वाहतो आहे
आणि मला या भिरभिरणाऱ्या पाचोळ्याकडे पाहून
ढीगभर रडावंसं वाटत आहे.

अनंत ढवळे

Sunday, November 28, 2010

दुर्दिन

दुर्दिन

एव्हाना
विरघळून गेलेले असते
आत्मकथेतील अक्षर न अक्षर
दाराशी कुणी उभा असतो
वैकल्याची बखर घेऊन
ती वाचायची

कुणीतरी मागत असतो हिशेब
प्रलयाचा दिवस उजाडल्यासारखा
त्याला काहीबाही सांगून टाळायचं

गवाक्षापलीकडच्या पोकळीत
उगाच चमचमत असते खूप आधी निसटून गेलेल्या मोत्यांची माळ
तिच्या समोर आडवी धरायची आपली सावली

काही लोक धावून येतात पेटते पलिते घेऊन
किंचाळत
त्यातला एकेक चेहरा निरखून पाहायचा

डोंगर दऱ्या झाडे पुस्तके
फडफडू लागतील अंतिमाच्या वाऱ्यावर
पुनः पुनः घोंगावू लागतील
आपणच लिहिलेल्या ओळी

दोन हजार वर्षांमध्ये
क्वचितच येतो असा दुर्दिन
कुणी महर्षी बोलला होता

अनंत ढवळे
2006

निमग्नाच्या खिडकीशी..

क्षुब्धाळल्या पाण्यात उठलाय एक पोरका स्वर
विजनातली पावले कधीच परतून आलेली इथवर

कुण्या जन्माचा संबंध, वाजत गाजत जातोय पश्चिमेस
अनाथ घोगर घंटांचा धुराळला कबंध

सोडवत नाही म्हणतोस गाव मिटवत नाही म्हणतोस खूण
रक्ताळल्या शतकाच्या वेशीवरील माळवदाचा खण

नाही नाही नाही हा भास गेला नाही दूरवर
स्वरमंडळाची ही थरथर हलक्याशा स्पर्शाने

लिहिशील लिहिशील लिहितं जाशील हिरण्याच्या अपवर्तनांवर
तुझ्या डोळ्यांचे अनावर पाझर, निमग्नाच्या खिडकीत बसून एकट्याने

विरघळली वितळली ही घटिका घड्याळाच्या काट्यांतून
आर्तावलेली रामधून, चिरत गेली हिमार्णवाचा ऊर

किती आत धुमसली होती या औदासीन्याची तान
कुणी रडत गेला सुनसान शून्याच्या व्यासावर

मी ऐकत गेलो ऐकत गेलो खूप दूरवर
पायाशी एव्हाना वादळी गरगर पाचोळ्याची

निमग्नाच्या खिडकीशी घुमतोय किरमिजी डोळ्यांचा थवा
लाऊन येशील एक दिवा मंदिरात

अनंत ढवळे..
2006

रात्रीच्या या संदिग्ध प्रहरात...

रात्रीच्या या संदिग्ध प्रहरात
कुणाला बोलावताहेत
झाडांच्या निश्चल सावल्या..?

अनंत ढवळे

सापडता सापडत नाही...

सापडता सापडत नाही
या वेदनेचे दुसरे टोक
या जन्माचे अन्य नाव


अनंत ढवळे..

प्रतीक्षा...

प्रतीक्षा...


बाहेर
एव्हाना थांबली असेल
क्षणांची रहदारी
रुतला असेल काळ
कोपऱ्यावरच्या चिखलात
बाहेर
एव्हाना सुटली असेल
हवेची पंचवीस घोड्यांची वरात
शून्याकडे, थांबली असती जर याचवेळी ही धडधड
तर तिने वाचलेही असते मृत्यूचे सूत्र
आणि घरंगळत गेलो असतो मी ही
शून्याच्या कुक्ष्यारण्यात
बाहेर
एव्हाना साचले असेल चंद्र तारकांचे तळे
तरळत असतील प्रकाशाचे दूत
लहानशा तळ्यांत
किती खोलवर चिरत जातेय
नीरवतेच्या किड्यांची ही किरकिर
आणि मी
तुझ्या एका शब्दावर
वाट बघत बसलोय उजाडण्याची
ही रात्र संपता संपत नाही
किती खोटा आहे तुझा दिलासा...
अनंत ढवळे
(पूर्व प्रसिध्दी - कविता रती / मूळ कविता आज पोस्ट करताना काहिशी संपादित केली आहे )