Thursday, December 31, 2020

2

वाचणे व्यथित होणे हे तितक्यापुरते

मग उरते जगणे रुटीन रहाटघाई 

अनंत ढवळे 

1

 हा बोध म्हणू की निव्वळ बेपर्वाई 

आश्चर्य मला कसलेही वाटत नाही .. 

अनंत ढवळे 

Monday, December 7, 2020

समकालीनमधल्या येत्या लेखामधून

समकालीनमधल्या  येत्या लेखामधून. हा लेख  व्यापक वळणाने जातो आहे - एकूण विचाराचे आणि कवितेचे स्वरुप असे काही :


विचार हे एक गतिमान संघटन आहे. मनाच्या अवस्थांचे  घडाई आणि संचलन अशी दोन्ही रूपे विचाराच्या संदर्भात दिसून येतात. भौतिक अवस्थेमुळे येणारे विशिष्ट विचार आणि विचारांमधल्या गडदतेचा व्यक्तिपुरत्या भवतालावर होणारा परिणाम या दोन्हीही घटना (स्वतंत्रपणे अथवा समांतर)घडून येताना दिसून येतात. मग विचार अनुभवांचे कार्यस्वरूप प्रकटन आहे अथवा मूलभूत कारण असा प्रश्न उपस्थित होतो.  चेतना आणि कार्य ह्यांचे एकत्व लक्षात घेतल्यास ( सर्गेई रुबीनस्टाईन), विचार हा चेतनेचा वाहक  ह्या नात्याने कार्य स्वरूप प्रकटन ठरतो असे म्हणावे  लागेल. या प्रश्नाची  अधिकाधिक उकल कवितेच्या उलगडण्यातून होत जाते, किंवा कवीचा तसा प्रयत्न निश्चीत असतो. विचार ही जाणीव, भावना, गरज , इच्छा  इत्यादिंपेक्षा निश्चीत अधिक ठाशीव गोष्ट आहे.  विचाराच्या रचनेत पडणारा कच्चा माल म्हणून या मूलभूत आणि अमूर्त गोष्टींकडे बघता येईल. भाषा, चिन्हे आणि विचारांच्या अभावात ह्यांचे अस्तित्व निश्चीत असले,  तरी असंप्रेषणीय आहे.


--
अंनत ढवळे 

2

 निबिड भानातले माध्यान्ह वाचत 

कवी गेलेत कविता राहिलेल्या 

-

अनंत  ढवळे 

1

मरण नसतोच शेवट मान्य हे पण 

मरण व्यापून दुविधा राहिलेल्या 

-

अनंत  ढवळे 

Thursday, July 16, 2020

चित्र

चित्र उभे केले रंगवले, अजरामरही झाले
माणुसपण सरले कोठे पण, जगणे उरले मागे..
-
अनंत ढवळे

Thursday, June 25, 2020

मोहेंजोदारो

जंगले, जमीनी अनासक्त आहेत 
आणि मृत्यू एक प्रश्नचिन्ह
ह्या दोहोंमधून वाहत जाणारे
लालसा,  उत्पात आणि हिंसेचे इतिहास

माणसे नेहमीच इतकी वाईट होती
किंवा इतकीच बरी - पण
जंगले,  जमीनी अनभिज्ञ नाहीत
आणि कोरला जातो आहे
सर्वकालीन निरपेक्ष इतिहास
बुलंद वसाहतींच्या
मोहेंजोदारो बनत जाण्याचा


-
अनंत ढवळे

Thursday, May 28, 2020

आवर्त

गेल्या काही दिवसांपासून कवितेच्या एका फॉर्मवर विचार करतो आहे. न संपणारा, केंद्रवर्ती विचार आणि त्या भोवती फिरणारी आकलने (विखंडित कडवी) - म्हणून आवर्त्त हे नाव दिले आहे तात्पुरते. विचाराची अंगभूत लय सर्वतः व्यक्त होण्यासाठी गझलेचा साचा कधी-कधी रिजीड होतो. तर अभंग आणि अष्टाक्षरीची वळणे बरेचदा विचार भलतीकडेच नेतात. म्हणून हा खटाटोप. बाकी लयीचा हट्ट का हा प्रश्न निरर्थक आहे. लय हे पौर्वात्य जाणीवेचे आणि कवितेचे मूलभूत रूप आहे.
आवर्त – १
जातेय मिळत ह्या एकांताला सगळे

आवाज भटकले, कितीतरी कोसांवर
जावून थडकले

परतून पुन्हा आलेले, इतके काही
निष्कारण ओढे

रात्रीस थबकल्या निर्जन झाडांवरती
थेंबांचे पडणे

जातेय मिळत ह्या एकांताला सगळे
लाटांचे बनणे फुटणे पाहत बसलो
भासांची दुनिया

सापडली होती वर्षांमधली दारे
थोडीशी उघडी

काळाची ओबड धोबड चित्रे आली
काढाया रेघा

जातेय मिळत ह्या एकांताला सगळे

निर्धोक भटकली इच्छा येथे-तेथे
येवून थबकली

हे किल्मिष तोडू बघते बांध तरीही
धादांत घसरणे

रस्त्यात थांबणे झाले जर का थोडे
समजेल कदाचित

जातेय मिळत ह्या एकांताला सगळे

- अनंत ढवळे

Thursday, April 23, 2020

3

अनिकेत भटकणार्‍याना गुंतवणारा
का मौज पाहतो आहे अडकवणारा

वैयक्तिक पडझड कोण मोजतो येथे
हा प्रलय पिढ्यांची छाती दडपवणारा

क्षणभर जे होते सत्य, काय वय त्याचे
माझ्यात उतरला क्षणेक संपवणारा

सापडेल का बघ सापडल्यावर बघता
निर्वैर नद्यांचे पाणी पेटवणारा

थांबवेल कुठली भीती फुलणार्‍याना
 रस्ताभर नुसता सुवास मोहवणारा..


अनंत ढवळे



Monday, March 16, 2020

A three language poem


A poem in three languages


(Marathi, English, Urdu)



.



अंधारून आलेल्या दिवसांमध्ये

मी विचार करत बसलो आहे

हजारो गोष्टींचा

बदलत  जाते आहे जडणघडण दुनियेची

एवढी अपरंपार जमीन

ही इतकी माणसं

तरी पुरू नयेत

काळाच्या बेगमीसाठी बिंदू



जमीन बहुतेक खचत जाते आहे

माणसांचे वैयर्थ्य कदाचित

तिच्याही लक्षात येवून गेलेले





भीतीची पराकाष्ठा झालेली

दिसत आहे

एरवी  भय

हे माणसाची सतत सोबत करणारं तत्व

अशात चालू  लागल आहे

समुदायांच्या पुढ्यात





माणसे चालू लागली आहेत

मागे-मागे




3.

night falls atop urbania

a subterfuge

scatters all along

the streets



walls close in





fin del camino

a bird sings

all alone.





4







درختوں پر خموشی

جھومتی ہے



کنارے سیاہ نیلی

سوچ میں گم



ہوا مایوس بیٹھی

کوہے غم  کی 

وادیوں میں



میں بیٹھا سوچتا ہوں

کیا ہوا ہے

یہ کسنے رات کی

ٹہنی جھنجوڈی

ہماری نیند ہمسے

چین لی ہے









Anant Dhavale




Sunday, March 8, 2020

1

उरलेला आवाज हरवतो जगताना
वाणीचा बडिवार निसटतो जगताना

चिंतक असतो, अजून कोणी असतो मी
निव्वळ प्रवृत्तीपर असतो जगताना

वर्तुळ आहे , न्याय खूप सोपा ह्याचा
बहुतांचा उन्माद उतरतो जगताना

गवताच्या पात्यांवर जमलेले बिंदू
जन्माचा सारांश उमगतो जगताना

**

अनंत ढवळे 

Monday, February 24, 2020

1

एक लाईट गझल

--

उगा रेंगाळण्याची मौज होती
अहेतुक बोलण्याची मौज होती

जुने संदर्भ, दरवाजे, कमानी
शहर धुंडाळण्याची मौज होती

कधी सरसावुनी बाह्या जराशा
धमक अजमावण्याची मौज होती

उन्हातान्हात मिरवत स्वस्त गॉगल
दिवस थंडावण्याची मौज होती

तसे कारण खरे काहीच नव्हते
जुने धुडकावण्याची मौज होती

कसे लक्षात इतके राहिलेले ?
खुणा सांभाळण्याची मौज होती



--
अनंत ढवळे

Sunday, February 2, 2020

1

काही तुमच्या झाल्या काही माझ्या झाल्या
काळासोबत भल्या-बुर्‍या आवृत्त्या झाल्या

बदलत गेलो आपण दुनिया बदलत गेली
नाव - गाव जन्माच्या बाबी उपर्‍या झाल्या 

न्याय द्यायला उतावीळ झालेला जो तो
प्रत्येकाच्या  आपआपल्या व्याख्या झाल्या

काय तुझ्या ह्या रसाळ गोष्टींची नवलाई
हातोहात पसरल्या ह्याच्या-त्याच्या झाल्या

बोलत बसलो, किती तरी दिवसांचे साचण
कलू लागले  ऊन सावल्या मोठ्या झाल्या

--

अनंत ढवळे

Saturday, January 4, 2020

अनुकरणांचे प्रमाण

गझलेत अनुकरणांचे प्रमाण खूपच आहे -  फेसबुक सारख्या माध्यमांमुळे ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते . निदान श्रेय देण्याइतपत सौजन्य तरी असावे. पण तेही नाही.  बर हे गझलांपुरतं मर्यादित आहे असही नाही - लेखांमधले मुद्देदेखील  विनासं दर्भ उचलले जातात. एकंदर गझल क्षेत्रात अजून परिपक्व साहित्य संस्कॄती उदयाला आलेली नाही असे म्हणता येईल.  

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...