गेली अनेक वर्षं मी नव्या गझलेबद्दल बोलतो आहे , नवी गझल लिहीतो आहे. हे सगळं एकत्र नोंदींच्या स्वरूपात मांडावं म्हणून हा उपक्रम. मी वृत्तांबद्दल बोलणार नाही - वृत्तात लिहीणं अतिशय सोपं आहे. गझलेचे विषय, भाषा, व्याप्ती, शेर सांगण्याच्या तर्हा इ.बद्दल संक्षेपाने लिहीण्याचा विचार आहे. सध्या उदाहरणं म्हणून माझेच शेर घेतो आहे - हे तितकसं योग्य नसलं तरीही.
१.
गझल ही मुळात वैचारिक कविता आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. विषय कुठलाही असो - त्या विषयाचे ( जाणिवेचे म्हणा हवे तर) विविध पैलू साकल्याने उलगडून दाखवणे हे गझलेच्या शेराचे उद्दिष्ट असते. गझलेचा प्रत्येक शेर एक स्वतंत्र विचारसंकुल बनून समोर आला पाहिजे. गझलेचा स्वर संयत असतो; पाण्याचा एखादा प्रवाह संथ वाहत जावा - एकसंध गतीने , तशी गझल आपल्या विचारांसहित पुढे जात असते. जिथे जाणिवा येतात - तिथे गोंधळ असतोच. हा गोंधळ देखील एका 'एकसंधत्वात' आणि एका प्रतलात गझलेतून उमटताना दिसून येतो. एकीकडे विचारांचा, जाणिवांचा हा गोंधळ, आणि दुसरीकडे गझलेची संथ लय - हा समतोल साधणं कठीण असलं, तरी अशक्य नक्कीच नाही. हे विचारांच्या कोलाहलातून एकजीव लय शोधून आणण्यासारखं आहे. प्रत्येक विचारामध्ये एक अंगभूत प्रक्रिया असते - ही प्रक्रिया बरेचदा कालसातत्य घेवून येते. एखादी घटना घडून गेल्यापेक्षा - ती घटना सतत घडत राहाणं, तिचा प्रत्यय सतत येत राहाणं हा अनुभव , विचारातल्या , किंबहुना संवेदनेतल्या त्या प्रक्रियेकडे इशारा करतो :
हे कुठले जंगल तुडवू जातो आपण
पदोपदी आशंकांचे निपजू येणे..
*
कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली
२.
विचारांचा कोलाहल, गुंतागुंत शब्दांतून व्यक्त करताना अनेक प्रतिमा पुढे येत जातात. वैचारिक गझल लिहू पाहणाराला प्रतिमांचे वावडे नसावे. सामाजिक कविता आपले 'बखान' करताना प्रतिमांऐवजी सरळ/ रोखठोक बोलणं पसंत करते. सुरुवातीच्या काळातील मराठी गझलेचा स्वर हा बरेचदा सामाजिक असल्याने , ही गझल अनेकदा प्रतिमा टाळीत पुढे जाताना दिसून येते. नव्या गझलेचे मैदान मात्र काळानुरूप अनेक विषयाना व्याप्त करत, विस्तारत जाते आहे. तेंव्हा ह्या नव्या विषयाना, नव्या जाणिवांना व्यकत करताना विविध प्रतिमांचा वापर करणे आवश्यकच आहे. गझल रोखठोक बोलणारी हवी असं म्हणणं अयोग्यच नव्हे, तर ह्या विधेला मर्यादेत बांधण्यासारखं देखील आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. ती कधी स्पष्ट बोलेल, तर कधी प्रतिमांच्या भाषेतून.
ही नात्यांची गजबज, हा पालापाचोळा
मरण असावे निर्जनतेचा वारा बहुधा
अनंत ढवळे
पुणे १३/१२/१४