सध्याचं न्युअर्क
पोरट्यूगीज आहे
असं मला सांगत होता एक
एक्स कॉप
म्हणजे रिटायर्ड पोलिस
+
लिनापे लोक रहात होते आधी
आज जिथे उभं आहे न्यूयॉर्क
आणि जर्सी
इथल्या उंच उंच इमारतींमधून
जाणवत जातं
लिनापेंचं
प्राचीन मुक्त अस्तित्व
+
पसेयक
म्हणजे भूमीभेद
म्हणजे हजारो वर्ष जुनी नदी
आजची पसेयक वाहते आहे
पाऱ्याचे प्रदूषण घेवून
नदी म्हणजे संस्कृती
संस्कृती म्हणजे नदी
जेंव्हा आपण संपवतो एक नदी
आपण संपवत असतो एक उभी संस्कृती
+
न्यूयॉर्क मधली लोकांची सरमिसळ
विलक्षण आहे
प्रत्येकाला सामावून विस्तारत जातो आहे
ह्या महानगराचा
महासागर
+
खूपच वेगळी आहे
उर्वरित अमेरिका
खूपच.
+
विलियम कार्लोस विल्यम्सला
शब्दात पकडायची होती
पक्की अमेरिकन बोली
मंडेन आणि कदाचित जराशी
थेट
गेल्या आठवड्यात मी वाचून आलो
रुदरफर्डमध्ये माझ्या कविता
विलियम कार्लोस विलियम ऐकत असावा शांतपणे
ह्या भ्रमात.
+
मोठ्या शहरातली बकाली
एकच एक आहे
न्यूयॉर्कमधून फिरताना
उगाच आठवून गेली
मुंबईची बकाल समृद्धी
तर नवल ते काय
_
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment