पडोत जितके पडायचे काळाचे घण
माझ्यामधले उरो जरासे चांगुलपण
इतके साधे सोपे हे संबंध जसे
पानांना दवबिंदूंचे की आकर्षण
वेळ घालवत बसण्याची ही अजब तऱ्हा
मोजत बसलो आहे माळवदाचे खण
काय आपल्या सफरींचे कौतूक तरी
ह्या रस्त्याने आले गेले कितीक जण
कशास इतकी स्पष्टीकरणे, कबूल कर
ताळतंत्र सुटलेले होते, झाले म्हण
जागोजागी रेलचेल पाणवठयांची
तहान माझी भागवणारा कोठे पण
तहान त्याची इतकी मोठी आहे की
समुद्र करतॊ आहे बिंदू पाचारण
-
अनंत ढवळे