Saturday, December 22, 2012

किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही ..


गझल

तुला समजेल तर समजेल काही
तुला आनंद नाही दु:ख नाही
जिथे जातो तिथे बघतो तुला मी
किती विस्तीर्ण हा गोंधळ तुझाही
तुला का दु:ख व्हावे विप्लवाचे
तुझा साचा कुठे बनला तसाही
किनार्‍यावर उभे हे लोक सारे
घरे वाहून गेलेली प्रवाही
तुझ्या डोळ्यांमधे सरल्यात वाटा
कळेना चाललो कोठे मलाही
मने झुरतात इतक्या संयमाने
जरासा धीर सुटतो, फार नाही....
अनंत ढवळे
22/12/12
(Milton Keynes)

Friday, December 14, 2012

गझल


१.

परंपरा जपणारे आपण
जुनी घरे विकणारे आपण

एकांती रुळणारे आपण
झुंडींचे हाकारे आपण

सभोवती आखीव व्यवस्था
उगाच विस्कळणारे आपण

किती दिशांना प्रयत्न गेले
इथे तिथे दिसणारे आपण

असेल ती पायवाट धूसर
किंवा भरकटणारे आपण

आपलेच मौन सागराला
लाटांमधले वारे आपण

अनंत ढवळे

December-12
Milton Keynes..

Wednesday, December 5, 2012

खंड


गोष्टींचे महत्त्व गोष्टींपुरतेच;


त्यापलीकडे राहून जातात
अवकाश, आणि गोष्टी निभावून नेण्यातली गंमत
ऋतूंच्या बदलत जाण्याची निरीक्षणे-मोठी मनोरम
शेवटी हे कथलाचे साचेच; पण
धातू वितळवून ओतणारा
आणि आकार बदलत जाताना पाहणारा,
थंड बेटांवरील निर्जन रात्रींत जागा राहणारा
दिवसांची शस्त्रे आणि रात्रींचे हिंसक जमाव
थोपवून धरणारा,
किल्ल्यांच्या भग्नावशेषांमधून
पलीकडच्या निळ्याशार समुद्रात डोकावणारा
साच्यांमधून गोठत जाणारी गावे, जनपदे, बेटे
बेटांना आणि द्वीपकल्पांना
सुनिश्चित करणार्‍या हद्दींमध्ये
सुखासीन पहुडलेल्या वसाहती
किल्ले आणि समुद्रांचे दोहन करून
जगणारे समुदाय
दिवस आणि रात्रींच्या कड्यांवर निश्चिंत उभ्या
समुदाय पोषक व्यवस्था
गोष्टींच्या दोन किनार्‍यांवर जिवंत आहेत दोघे;
मधल्या अवकाशात खंडव्यापी गोळाबेरीज पसरून असलेली
अनंत ढवळे

Dec 12
(Milton Keynes)

Friday, November 9, 2012

संवाद-१




 तिला म्हणालो की मी वैतागलो आहे.एकंदरीत जगण्याची वीण आणि आपल्या गुणसूत्रांची विशिष्ट रचना - ह्याचा काही मेळ बसताना दिसत नाहीए ती म्हणाली की तू अनेकदा अनेक गोष्टींचा विचार करतोस आणि व्यथित होतोस. माणसाला आपल्या विचारांवर ताबा मिळवता आला पाहिजे.
मी म्हणालो की याचा अर्थ समोर जे दिसतंय त्याचा विचार करायचा नाही. आधी जे बघितलंय त्याचा विचार करायचा नाही. पुढे काय करायचंय.गतकाळात घडून गेलेल्या गोष्टी. यात सगळं काही आलं. बरे वाईट अनुभव. आपले लहानसहान जय पराजय. प्रेम. शरीराच्या शेवटच्या सीमा गाठेतो केलेला संभोग.स्त्री शरीराचे उपजत आकर्षण.या आकर्षणापोटी आपल्या आसपासच्या स्त्रियांविषयक केलेल्या कल्पना. शरीरसंभोगाइतकी गुंगवून- हरखून टाकणारी जबरदस्त शक्ती इतर कुठली असावी हा विचार. बहुतेक शारीरिक वेदना. शारीर वेदनेइतके धडधडीत खरे काहीच नाही. मला या क्षणी जी गुडघ्यातनं निघणारी जबरदस्त कळ हैराण करते आहे, तिच्या इतका इतर कुठलाही सिध्दान्त मला खरा वाटत नाहीए. काल ट्रिनीटी चौकात काही पुस्तकं पाहिली. तत्वचिंतनाची केम्ब्रिजी चमक आणि पुरातन इमारतींच्या जबरदस्त सावल्या या विरोधाभासात ती पुस्तकं कशी सुंदर दिसत होती. नैतिकता - अमुक अमुक. स्वभावाची पाळेमुळे - अमुक अमुक; ग्रीक शोकांतिकेचे आकलन- क्षयज्ञ. आहा. असे काहीतरी काम केले पाहिजे. आपले साले दिवस व्यर्थच निघून चालले आहेत. पण एवढयाने काही होत नाही. काहीच होत नाही. या शोकांतिकांमधून तरी काय निष्पन्न झाले आहे. अहंकार- स्वविषयक जाणीव, भूमिका आणि विशिष्ट कल्पना. मग या कल्पनेशी आणि त्या कल्पनेतल्या आपल्या आकृतीशी इतरांचे वर्तन ताडून बघणे. अमूक मला असे बोलला, त्यावर मी हे बोललो. कदाचित नीट उत्तर दिले नाही. या लोकाना वेळचेवेळी सरळ केले नाही तर साले डोक्यावर चढतील. आणि इतरांचा देखील अहंकार. लोक खोटे बोलतात. इतरांबद्दल वाईट विचार करतात .आपण किती बरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात.
देश, प्रांत, भाषा. खरेतर आपल्या ओळखीच्या गोष्टी. म्हणजे लहानपणापासून पाहिलेले विशिष्ट चेहरेपट्टीचे लोक. या लोकांच्या बोलण्या-खाण्यापिण्याच्या लकबी. आपल्या घराजवळचा आणि शालेय पुस्तकांतून भेटलेला परीसर. घरीदारी बोलली जाणारी भाषा. जगण्याची पध्दत- जिचे उदात्तीकरण स्वरूप - धर्म.
मी तिला म्हणालो, तू कोण आहेस. आणि आपण जे बोलतो आहोत या संवादाचे स्वरूप काय आहे.
यावर ती म्हणाली की मी कोण आहे - हा मोठा गूढ प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर समजू नये म्हणून गोष्टींची रचना झालेली आहे. गोष्टींचे बनणे, वाढणे आणि लयास जाणे हा या प्रश्नाच्या वेटोळ्याचा एक भाग आहे. या वेटोळ्यातून निघणार्या सुत्राच्या एका टोकास मी, एका टोकास तू आहेस असं समज. माझी अवस्था तुझ्याहून वेगळी नाही.माझे दु:ख तुझ्याहून वेगळे नाही
अनंत ढवळे

Sunday, November 4, 2012

एलेजी


कधी काळ आपला नाही म्हणून
कधी
लोक आपले नाहीत म्हणून

कधी रस्ते ओळखीचे नाहीत म्हणून
कधी
आधार सापडले नाहीत म्हणून

कधी व्यवस्था आपली नाही म्हणून
कधी
आपली व्यवस्था उभारता आली नाही म्हणून

कधी भूमिका फसल्यात म्हणून
कधी
बाजू ठरवताच आल्या नाहीत म्हणून

कधी भोगवादाचा चीड आली म्हणून
कधी
वस्तूंच्या झगमगाटात हरऊन गेलोत म्हणून

कधी आदर्श सापडले नाहीत म्हणून
कधी
वाटा पाडता आल्या नाहीत म्हणून

कधी इतिहास समजला नाही म्हणून
कधी
वारसा खोटाय हे समजलं म्हणून

कधी नाकारलो गेलोत म्हणून
कधी तग धरू शकलो नाहीत म्हणून

कधी संतापण्याच्या सर्व शक्यता मावळल्याहेत म्हणून 
कधी
आरामात जगण्याची सवय झाली आहे म्हणून

मी विचार करतो की आपण सगळे
असे
रस्त्याकाठी हतबल उभे आहोत का म्हणून -

अनंत ढवळे
November 12
(Milton Keynes)

Saturday, August 18, 2012

बरड ...


नवीन काहीच नाही. दिवस आपल्या गतीने निघून चाललेत. बरेचदा काही विचार येतात, आणि मी थबकतो. मग मी पुन्हा चालू लागतो. हे चालणं अथक आहे, अमर आहे, अजर आहे. चालण्याची प्रक्रिया किती जुनी आहे. चालताना वाटेत कोण कोण भेटून जातं. उंच उंच झाडे. काही पाने पायथ्याशी निश्चल पडलेली. सुबक रस्ते. रस्त्यांच्या दगडी किनार्‍यांवरून चालताना काही प्राचीन भास होतात. मला वाटतं मी अठराव्या शतकातल्या युरपियन देशात चालत आहे. मग मी विचार करतो की दोनशे वर्षांनंतर मी कुठे असेन वगैरे. पुन्हा आजचे शतक. हे भास तसे नवीन नाहीत. औरंगाबादेच्या जुन्या वास्तूंच्या सान्निध्यात मला हे जुनेपण नेहमीच जाणवलेलं. तिथे कुणीकुणी ओळखीचं भेटायचं. आपल्या एकंदरीत जुनेपणाच्या संदर्भात आणखी थोडीशी भर पडायची. वस्तूंच जुनेपण कधीकधी मोठं विलक्षण वाटू लागतं. या वाटा किती जुन्या असतील. इथून कोण कोण गेलं असेल. आपण याच परंपरेतलं एक सूत्र आहोत.
वाटा आणि परंपरा मला नेहमीच खुणावत असतात. एक लहानशी मातेरी वाट. हिरव्यागार गवतातून वर जाणारी. मध्ये एक दोनएकशे वर्षं जुना दगडी पुल. इतक्या वर्षांमध्ये काय काय जोडलं गेलं असेल. जन्म, मृत्यू, प्रेम, मैत्री, द्वेष, हिंसा,उन्माद. आणि प्रदीर्घ चालणं. माझ्या चालण्याशी मी अनेक गोष्टी ताडून बघतो. बदलत जाणार्‍या गावांप्रमाणे आपलं चालणं देखील बदललं आहे काय. की हे चालणं देखील आपल्या कुठंही जोडलं न जाण्यासारखं आहे..
एवढ्या वाटांवरुनी चाललो
लागली पायांस पण माती कुठे...
संदर्भ येतात आणि जातात. गावं बदलतात. कदाचित देशही. मग आपलं गाव कुठलं. पंढरपुरात लोक विचारतात ' तुमचं गाव कुठलं?'. हा प्रश्न मोठा कठीण आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतात - भौ माझा नेमका गाव नाही. मला माझं म्हणावं असं नाव नाही. मला माझा धर्म माहीत नाही. माझी कुठेही जोडली जाण्याची इच्छा नाही. मी तुला काय सांगू ?
हे रस्ते बरे. अनुवंशहीन. निरीच्छ. उगम नाही - अंतही नाही. कुणी चालावं हा निर्बंधही नाही. (क्रमशः )
अनंत ढवळे
( टीप - प्रुफरीडिंग झालेले नाही...)

Friday, March 9, 2012

दायभाग

आपली थरथरणारी चरित्रे फेकून देऊयात 
या पश्चिमेच्या वार्‍यात 
वाळू वाहते आहे तशी वाहत राहील
आपल्या कस्पटांसह विरून जातील 
आपले स्पर्श या वाळूवर उमटलेले ;
एरवी हा इतिहासदेखील दखल घेत नाही  कुणाची

घरांचे रस्ते पुन्हा एकदा पडताळून पाहावेत
वाटेवरच्या खुणा पक्क्या करून ठेवाव्यात ; घरे वाट बघत बसलीएत देवच जाणे कुणाची
भिंतींवर अपेक्षांचे जुनाट रंग थिजून राहिलेले 


हे अनुक्रमहीन प्रवास कुठेतरी संपवले पाहिजेत;
उमजू आले पाहिजेत अर्थे

यदृच्छया रुतून बसल्यात प्रतीक्षा रस्तोरस्ती  - एक तर देऊन झालेत आपापले दायभाग किंवा हे, 
की काही नव्हतेच देण्याजोगे... 

अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...