Sunday, May 16, 2010

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा....

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा

तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा

दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा

अनंत ढवळे

Friday, May 14, 2010

मदत

एक नवा शेर.

तशी फारशी मदत कुणाची झाली नाही
फार कुणाच्या कामा आलो असेहि नाही.....

अनंत ढवळे

Thursday, May 13, 2010

आहिस्ता आहिस्ता

आहिस्ता आहिस्ता ही गझल अनेकांनी ऐकली असेल...आमिर मीनाई ने ही जमीन वली कडून घेतली आहे...

सजन तुम मुख सिती उलटो निकाब आहिस्ता आहिस्ता
के ज्यूं गुल से निकसती है गुलाब आहिस्ता आहिस्ता...
वली दकनी

( निकसती =निकलती / उमलणे या अर्थाने )

anantdhavale@gamil.com
098230 89674

आहिस्ता आहिस्ता

आहिस्ता आहिस्ता ही गझल अनेकांनी ऐकली असेल...आमिर मीनाई ने ही जमीन वली कडून घेतली आहे...

सजन तुम मुख सिती उलटो निकाब आहिस्ता आहिस्ता
के ज्यूं गुल से निकसती है गुलाब आहिस्ता आहिस्ता...
वली दकनी

( निकसती =निकलती / उमलणे या अर्थाने )

Marathi Mandali!
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator

Tuesday, May 11, 2010

Gazal

आपली भरते तरी झोळी कुठे
तेवढे आभाळ ही दानी कुठे

एवढ्या वाटांवरुनी चाललो
लागली पायांस पण माती कुठे

पाहतो दु:खास दु:खासारखे
आमची सम्यक तशी दिठ्ठी कुठे

अनंत ढवळे..

Saturday, May 8, 2010

यक्षगान..

अनंत ढवळे

कितीदा म्हणालो | विसरेन सारे
करेन ही दारे | सारी बंद

एकदा तुलाही | दुरून पाहेन
आणि म्हणेन | पुन्हा तेच

कुणी दिले तुला | पावसाचे डोळे
आणि हे हिवाळे | सोबतीला

कुणी उधळिला | दारी पारिजात
कुणाचे हे हात | मोसमांचे

मिटू देत सार्‍या | क्षणांच्या रांगोळ्या
आपल्या ओंजळा | सुटू देत

आपल्या सभोती | दिशांचा गराडा
आणि एक तडा | संभ्रमाचा

कशासाठी चाले | तुझी घालमेल
उगाच पडेल | पुन्हा पेच

हातांवरी माझ्या | वाळलेले रक्त
की जसे आसक्त | हाडमांस

एवढी तहान | पुढे मरूस्थळ
छातीत घायाळ | एक पक्षी

किती गोड हासे | लहानसे मूल
कुणाशी बांधील | सुख बाबा

तुझी माझी कथा | एवढीच फक्त
जराशी आरक्त | जशी संध्या

उतरून आले | पुढ्यात आभाळ
जीवाचा सांभाळ | करीजो बा

दारावरी उभे | आकाशाचे दूत
कुणास माहीत | कशासाठी

आपापल्या अटी | आपापली खंत
जराशी उसंत | नाही कोणा

जरासे वाईट | वाटेल मनाला
आणिक कुणाला | काय खेद

नेहमीच व्हावा | असा कडेलोट
फुटावेत कोट | संयमाचे

दिनरात सरो | सरो हे चरित्र
आपले विचित्र | जन्म याग

म्हणालो असेन | असेही तसेही
आणिक प्रवाही | गेलो गेलो

वाहून गेलेले | पावसाचे पाणी
दाटलीत गाणी | बोटांवर

रात्रिच्या गर्भात | आपला प्रवास
ऐकू येतो श्वास | मनोमन

अनोळखी दु:ख | ओळखीचा पोत
गवताची पात | हिरवाळी

उगाच वाटते | जाहला उशीर
पावसाचा जोर | वाढलेला

किती धूळ झाली | किती हा धुराळा
पाचोळा पाचोळा | हे चरित्र

आकाशी उडाले | उजेडाचे पक्षी
किरणांची नक्षी फडफडे

निखार्‍यांची दरी | क्षणांचा प्रवाह
शतकांचा डोह | किंवा काही

इतिहास लिहू | किंवा हे मिथक
काळाचे जातक | अनाहत

किती वेळ झाला | किती लोक आले
किती लोक गेले | या इथून

मोजून थकलो | सरेनाच गाथा
डोंगराचा माथा | सापडेना

कितीदा थांबलो | नदीतटावर
आणिक प्रहर | मोजलेले

रेघोट्या ओढल्या | किती रात्रंदिन
तरी रितेपण | राहिलेच

कितीदा थांबलो | तुझ्या सावलीला
तरी निववेना | अगा दाह

आपलाच देह | आपलेच मन
तरी राहिलो गा | उपराच

संपोनिया गेलो | मागेच कुठे मी
सरता सरेना | हा प्रवास

भेटण्याची ओढ | बोलण्याचे लाड
बंधनांची चाड | उडो गेली

असे स्मित यावे | उंच नभातून
पडावे तुटून | सारे पाश

जीभेवरी माझ्या | उधारीचा शब्द
कुणाचे प्रारब्ध | कुणापाशी

आपुलिया पंथे | चाललो अनंत
आम्हा नाही खंत कशाचीही...

अनंत ढवळे
शेर पहा :

इस रात अंधारी में मत भूल पडू तुस्सूं
तू पांव के झांजे की झनकार सुनाती जा ...!

( सिम्प्लिफाईड : इस रात अंधेरी में, मत भूल पडूं रस्ता
तू पांव के पायल की , झनकार सुनाती जा )

वली दकनी'चा शेर आहे. हे लिखाण गझलेच्या अगदी प्रारंभिक काळातले आहे. या वेळी उर्दू गझल्च नव्हे तर उर्दू भाषा देखील आपल्या बाल्यावस्थेत होती. तुस्सूं ( तुम्हे - तुला, झांजा - पायल ) इ शब्द दखनी वळणाचे आहेत.

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...