१.
आहेत दोन
नाही-नाही, अनेक
उफाळून येणारे वर
आपल्या आतून
म्हणजे हे नाव-गाव ओळखपाळख
निव्वळ चकवा.
२.
किती मी आलेत
वर तवंगून
ह्या निरंकुश
मंथनातून.
३.
परिणमन आहे
हाताबाहेरचं, बुध्दीच्या कवेत न येणारं
हात वर करून
मोकळं होण्यातला पळपुटेपणा
तात्विक बनून खपवता येतो
पळपुटेपणाच्या कक्षेत बसवता
येण्याइतपत.
४.
माणसं अशीच होती
रामकृष्णांच्या काळात
किंबहुना त्या आधी
आणि
नंतरही.
५.
जुन्यांच्या चिंतनावर
हात मारून
निवांत मिशा पुसताहेत
तत्वचिंतक बोके
आपणही.
.
अनंत ढवळे