नवीन काहीच नाही. दिवस आपल्या गतीने निघून चाललेत. बरेचदा काही विचार येतात, आणि मी थबकतो. मग मी पुन्हा चालू लागतो. हे चालणं अथक आहे, अमर आहे, अजर आहे. चालण्याची प्रक्रिया किती जुनी आहे. चालताना वाटेत कोण कोण भेटून जातं. उंच उंच झाडे. काही पाने पायथ्याशी निश्चल पडलेली. सुबक रस्ते. रस्त्यांच्या दगडी किनार्यांवरून चालताना काही प्राचीन भास होतात. मला वाटतं मी अठराव्या शतकातल्या युरपियन देशात चालत आहे. मग मी विचार करतो की दोनशे वर्षांनंतर मी कुठे असेन वगैरे. पुन्हा आजचे शतक. हे भास तसे नवीन नाहीत. औरंगाबादेच्या जुन्या वास्तूंच्या सान्निध्यात मला हे जुनेपण नेहमीच जाणवलेलं. तिथे कुणीकुणी ओळखीचं भेटायचं. आपल्या एकंदरीत जुनेपणाच्या संदर्भात आणखी थोडीशी भर पडायची. वस्तूंच जुनेपण कधीकधी मोठं विलक्षण वाटू लागतं. या वाटा किती जुन्या असतील. इथून कोण कोण गेलं असेल. आपण याच परंपरेतलं एक सूत्र आहोत.
वाटा आणि परंपरा मला नेहमीच खुणावत असतात. एक लहानशी मातेरी वाट. हिरव्यागार गवतातून वर जाणारी. मध्ये एक दोनएकशे वर्षं जुना दगडी पुल. इतक्या वर्षांमध्ये काय काय जोडलं गेलं असेल. जन्म, मृत्यू, प्रेम, मैत्री, द्वेष, हिंसा,उन्माद. आणि प्रदीर्घ चालणं. माझ्या चालण्याशी मी अनेक गोष्टी ताडून बघतो. बदलत जाणार्या गावांप्रमाणे आपलं चालणं देखील बदललं आहे काय. की हे चालणं देखील आपल्या कुठंही जोडलं न जाण्यासारखं आहे..

एवढ्या वाटांवरुनी चाललो
लागली पायांस पण माती कुठे...
लागली पायांस पण माती कुठे...
संदर्भ येतात आणि जातात. गावं बदलतात. कदाचित देशही. मग आपलं गाव कुठलं. पंढरपुरात लोक विचारतात ' तुमचं गाव कुठलं?'. हा प्रश्न मोठा कठीण आहे. माझ्या मनात अनेक प्रश्न उत्पन्न होतात - भौ माझा नेमका गाव नाही. मला माझं म्हणावं असं नाव नाही. मला माझा धर्म माहीत नाही. माझी कुठेही जोडली जाण्याची इच्छा नाही. मी तुला काय सांगू ?
हे रस्ते बरे. अनुवंशहीन. निरीच्छ. उगम नाही - अंतही नाही. कुणी चालावं हा निर्बंधही नाही. (क्रमशः )
अनंत ढवळे
( टीप - प्रुफरीडिंग झालेले नाही...)
( टीप - प्रुफरीडिंग झालेले नाही...)