Friday, January 14, 2011

मला फारसं वाईट वाटलं नाही..

मला फारसं वाईट वाटलं नाही 
याचं फार वाईट वाटून घेऊ नकोस

अनेकदा आपला ताबा नसतो
गोष्टींवर

तू रडू नकोस या भिरभिरणाऱ्या पाचोळ्याकडे पाहून 
- की एक दिवस गोष्टीतला साधू म्हणाला होता त्याप्रमाणे 
हे ही संपून जाईल 
दिवस बदलत जातात 
आपल्या वयासोबत वाढत जातं आपलं न वाईट वाटलेपण

मला आनंद होतो निरागस हसणारी मुलं पाहून
एखादं हिरवंगार झाड पाहून 
खिडकीत बसलेला पारवा पाहून
मला असं सतत वाटत राहतं की 
एवढं नक्कीच पुरेसं असावं
एक जन्म काढण्यासाठी.

अनंत ढवळे

Saturday, January 8, 2011

किंचित

किंचित..

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा

तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा

उगाच क्षणभर सळसळली हिरमुसली झाडे
धुळारल्या पानांवर पडला तारा बहुधा

ही नात्यांची गजबज, हा पाला पाचोळा
मरण असावे निर्जनतेचा वारा बहुधा

दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा

अनंत ढवळे

Thursday, January 6, 2011

पिवळसर तावदानांवर वयाच्या ..

1.

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली

तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...

अनंत ढवळे..

2.


एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली

कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली

जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली

कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली

फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........

अनंत ढवळे..

( दुसरी गझल  मूक अरण्यातली पानगळ  ह्या माझ्या गझल संग्रहातून)

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...