Sunday, August 22, 2010

जीभेवरी माझ्या | उधारीचा शब्द

यक्षगान..

अनंत ढवळे

कितीदा म्हणालो | विसरेन सारे
करेन ही दारे | सारी बंद

एकदा तुलाही | दुरून पाहेन
आणि म्हणेन | पुन्हा तेच

कुणी दिले तुला | पावसाचे डोळे
आणि हे हिवाळे | सोबतीला

कुणी उधळिला | दारी पारिजात
कुणाचे हे हात | मोसमांचे

मिटू देत सार्‍या | क्षणांच्या रांगोळ्या
आपल्या ओंजळा | सुटू देत

आपल्या सभोती | दिशांचा गराडा
आणि एक तडा | संभ्रमाचा

कशासाठी चाले | तुझी घालमेल
उगाच पडेल | पुन्हा पेच

हातांवरी माझ्या | वाळलेले रक्त
की जसे आसक्त | हाडमांस

एवढी तहान | पुढे मरूस्थळ
छातीत घायाळ | एक पक्षी

किती गोड हासे | लहानसे मूल
कुणाशी बांधील | सुख बाबा

तुझी माझी कथा | एवढीच फक्त
जराशी आरक्त | जशी संध्या

उतरून आले | पुढ्यात आभाळ
जीवाचा सांभाळ | करीजो बा

दारावरी उभे | आकाशाचे दूत
कुणास माहीत | कशासाठी

आपापल्या अटी | आपापली खंत
जराशी उसंत | नाही कोणा

जरासे वाईट | वाटेल मनाला
आणिक कुणाला | काय खेद

नेहमीच व्हावा | असा कडेलोट
फुटावेत कोट | संयमाचे

दिनरात सरो | सरो हे चरित्र
आपले विचित्र | जन्म याग

म्हणालो असेन | असेही तसेही
आणिक प्रवाही | गेलो गेलो

वाहून गेलेले | पावसाचे पाणी
दाटलीत गाणी | बोटांवर

रात्रिच्या गर्भात | आपला प्रवास
ऐकू येतो श्वास | मनोमन

अनोळखी दु:ख | ओळखीचा पोत
गवताची पात | हिरवाळी

उगाच वाटते | जाहला उशीर
पावसाचा जोर | वाढलेला

किती धूळ झाली | किती हा धुराळा
पाचोळा पाचोळा | हे चरित्र

आकाशी उडाले | उजेडाचे पक्षी
किरणांची नक्षी फडफडे

निखार्‍यांची दरी | क्षणांचा प्रवाह
शतकांचा डोह | किंवा काही

इतिहास लिहू | किंवा हे मिथक
काळाचे जातक | अनाहत

किती वेळ झाला | किती लोक आले
किती लोक गेले | या इथून

मोजून थकलो | सरेनाच गाथा
डोंगराचा माथा | सापडेना

कितीदा थांबलो | नदीतटावर
आणिक प्रहर | मोजलेले

रेघोट्या ओढल्या | किती रात्रंदिन
तरी रितेपण | राहिलेच

कितीदा थांबलो | तुझ्या सावलीला
तरी निववेना | अगा दाह

आपलाच देह | आपलेच मन
तरी राहिलो गा | उपराच

संपोनिया गेलो | मागेच कुठे मी
सरता सरेना | हा प्रवास

भेटण्याची ओढ | बोलण्याचे लाड
बंधनांची चाड | उडो गेली

असे स्मित यावे | उंच नभातून
पडावे तुटून | सारे पाश

जीभेवरी माझ्या | उधारीचा शब्द
कुणाचे प्रारब्ध | कुणापाशी

आपुलिया पंथे | चाललो अनंत
आम्हा नाही खंत कशाचीही...

अनंत ढवळे

Saturday, August 21, 2010

पिवळसर तावदानांवर वयाच्या

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली

तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...

अनंत ढवळे..

8.


एक प्रार्थना ओठांमधुनी निघत राहिली
काल रात्रभर तुझी वेदना जळत राहिली

कळूनही त्या सरोवराचे गूढ न कळले
प्रतिबिंबांची वलये नुसती हलत राहिली

जुन्या ऋतूंची साद घेउनी पाउस आला
गेली वर्षे नभातुनी मग गळत राहिली

कुणा न दिसली मूक अरण्यातली पानगळ
त्या दु:खाची गाज दूरवर घुमत राहिली

फुटत राहिल्या आयुष्याच्या बिलोर काचा
दिवस मास वर्षांची शकले पडत राहिली.........

Sunday, August 15, 2010

किंचित

मी इतिहासाचा एखादा सांधा बहुधा
माझ्यावरती गतकाळाचा ताबा बहुधा

तुझियासाठी किंचित रडलो आणि वाटले
या ही कर्तव्यातुन झाली सुटका बहुधा

उगाच क्षणभर सळसळली हिरमुसली झाडे
धुळारल्या पानांवर पडला तारा बहुधा

ही नात्यांची गजबज, हा पाला पाचोळा
मरण असावे निर्जनतेचा वारा बहुधा

दुनियेचा व्यापार पहावा, स्वस्थ बसावे
माझ्यासाठी एकच रस्ता उरला बहुधा

अनंत ढवळे

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...