Wednesday, October 14, 2026

दीर्घ

ओलांडत जाते पाणी
दृष्टीची खोल सराई   

क्षणभर घुटमळते पाई
वाहण्यातली अगतिकता

गुरफटते दव जगण्यातच
विस्मरते विरून जाणे 

 

.अनंत ढवळे 


(लिहितो आहे ) 


Monday, October 5, 2026

लिरिक

जगण्याची रीत उमगली
पण जगणे कळले नाही 

साधने किती भवताली
गर्दीत हरवलो आहे 

आता हे शोधत फिरणे
अडखळणे वा भिरभिरणे

चौफेर खिन्नसे काही
ओथंबून आले आहे 

मिणमिणली वात उगाचच
अंधार गडदला आणि  


.अनंत ढवळे 

Saturday, September 19, 2026

बघ

चिंतक म्हणेल फक्त बघत राहा
प्रतिक्रिया देणे व्यर्थ आहे, नपेक्षा

व्याख्या कर आणि त्या 
हस्तमैथुनी आनंदात वाहावत जा काही 

क्षण.



.अनंत ढवळे

भाषा

 १.

आधी येते 

जीवनयापन 

नंतर येते भाषा 

मग खूप नंतर कधीतरी

संघटित धर्म


२.


भाषा धर्माहून जुनी आहे 

म्हणजे 

आपले धर्माधारित भाषाभिनिवेश देखील 

नवेच आहेत.


३.


भाषा म्हणजेच जाणीव 

किंवा चेतना 

किंवा चेतनेचा 

दस्तऐवज 

असे गृहित धरणे 

ठीकच आहे 


भाषेला धरून 

तुम्ही पोचू शकता 

थेट ज्ञात उगमापर्यंत.


४.


इतिहास लिहून घेतला जातो 

मिथके बनत जातात


एरवी ही गुंतागुंत ना सोडवणारी 

पण दोन्हींचे पुरावे सापडतात 

भाषेच्या धूळ भरल्या 

दप्तरांतून.


5.


प्रत्येक माणूस बनवत जातो 

आपापली भाषा 


आधीचे घेऊन 

काही नवे जोडून 

पण मुख्यत: बरेचसे त्यागून 


एका अर्थी प्रत्येकातच दडलेला असतो 

वेरूळचे लेणे खोदणारा  

अनाम मूर्तिकार.



.अनंत ढवळे 

Tuesday, August 25, 2026

1

स्वस्थ बसणे खरी कला मित्रा
एरवी मार्ग हा खुला मित्रा

रंग सारेच खूप बेढंगी
तू विसरशील कुंचला मित्रा

चित्त थाऱ्यावरी तुझे नाही
छंद वाईट लागला मित्रा

आपले मन उदास असले की
स्वच्छ आकाशाही बला मित्रा

साल हेही निघून गेलेले
काळ वाहून चालला मित्रा 

रोजचा सूर्यही जुना होतो
सूर बनतात खोकला मित्रा

..

अनंत ढवळे 

Sunday, August 9, 2026

2

हे जे निघून गेले
डोळ्यांपुढून सारे
काय त्याचे 

हा जो प्रवास झाला
काय त्याचे

जगताना जे क्षरले
झिजले
आणि हरवले 

आणि मग कधीतरी
मोजत असताना जे
आठवलेही नाही
काय त्याचे 

ते जगणारे आपणच होतो
जे क्षरले
विस्मरणात गेले

तेही आपणच 

हजारदा धूळ झटकून
पुन्हा उभे राहणारे देखील
आपणच

काय त्याचे ? 


. अनंत ढवळे

लिरिक २

हे जे निघून गेले
डोळ्यांपुढून जीवन
काय त्याचे 

हा जो प्रवास होता
काय त्याचे

जगताना जे क्षरले
झिजले
आणि हरवले
काय त्याचे 

मग मोजत असताना जे
आठवले ही नाही
काय त्याचे 

ते जगणारे आपणच होतो
जे क्षरलो ते देखील

काय त्याचे ? 


— अनंत ढवळे