Friday, April 17, 2026

1

रोचक अनुभवासाठी
केलेला विक्षिप्तपणा

देखील त्रासदायक 
प्रकार आहे जगून 

बघण्यातला. एखादा
काट्याकुट्यांचा चढ 

घेऊन जावा मोकळ्या
ढाकळ्या दृश्यापर्यंत

तसे काहीसे - पण ह्यात 
सामील असतेच आपल्यातले

बिलंदर पोर

अनुभवाला चोळामोळा 
करून भिरकावून 

देणारे.
..

अनंत ढवळे

Thursday, April 16, 2026

1

ठराविक काळातले 
अमुक बिंदू 
ह्यापेक्षा अधिक 

नाही या कथेचे महत्व
आधीचे बिंदू लोप

पावलेत निसर्गक्रमानुसार 
भवताल उभे करून जमतील 

तसे. किती वेळ जातो आपला 
आधीच्यांचे भवताल धुंडाळून 

बघण्यात. आणखी किती जाईल
अशा अवकाशी स्तूपांचे बांधकाम 

करण्यात.


--
अनंत ढवळे 

 

Monday, April 6, 2026

1

चालली दूर गलबते कोठे

सांग असतात आसरे कोठे


रंग पडतील हे फिके मितवा

राहते काय राहते कोठे


काय भरतेय पोकळ्या साऱ्या

चालले रास दंगणे कोठे 


पाहिली चार दोन अंगांगे

पूर्ण डोळ्यात मावले कोठे 


एकरंगी बनून गेलो पण

दोघुलेपण निनादते कोठे



..

अनंत ढवळे