Wednesday, April 9, 2025

शॅनंडोआ नॅशनल पार्क




हे वरचे फोटो तसे जुने आहेत. व्हर्जिनियात राहात असताना जरा मोकळीक मिळाली की शॅनंडोआला जाणे हा माझा आवडीचा उपक्रम होता. हजारो एकर पसरलेलं जंगल, ब्लू रीज डोंगररांगा, स्कायलाईन ड्राईव्हचा पार्कच्या ऐन मध्यातून जाणारा रस्ता, जंगलातल्या पायवाटा हे सगळं काही मिथिकल आसल्यासारखं आहे. आठवड्याच्या मध्ये कधी जावं तर तिथे प्रचंड शांतता असते. खालच्य दरीतून येणारे विविध ध्वनी ऐकत तासंतास बसून राहणे, क्वचित सोबत वही असलीच तर काही खरडणे असा माझा वेळ जायचा. 

बरेचदा ( विशेषतः माणसांची फारशी वर्दळ नसल्यास ) हरणांची कुटुंबे बिनधास्त बाहेर, रस्त्यावर हिंडताना दिसून येतात. तशीही ही सगळी हरीण मंडळी संध्याकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. तुम्ही गाडीने संध्याकाळी खाली उतरून जात असाल तर अगदी जपून जावे लागते. 

बाकी हे खालचे फोटो अशातले आहेत. हिवाळा सरला असला तरी हिवाळ्याची चिन्हे पार्कमध्ये अजूनही सर्वत्र दिसताहेत.

 




पिनॅकल पिकनिक एरिया नावाचं एक सहलीचं ठिकाणं बनवलेलं आहे या पार्कात (अर्थात तिथे आणखी अशी बरीच ठिकाणं आहेत) . तिथल्या एका बाकावर जरावेळ पाठ सरळ करावी म्हणून पडलो आणि गंमत म्हणून हा फोटो काढला. नंतर बराच वेळ तिथली शांतता आणि संथ वाहणारी थंडसर हवा अनुभवली. झाडाझुडांच्या सावलीत जी झोप म्हणा अथवा ग्लानी येते ती काही भारीच मनोरम गोष्ट असते.

ह्या भागात अस्वलं असल्यानं कचराकुंड्यांवर जाड झाकणं बसवलेली आहेत. एकूण पार्कात काहीही खाल्लपिल्लं की त्यानंतर आपली जागा स्वच्छ करणे, झालेला कचरा कुंडीत टाकून देणे या गोष्टी पार्कात येणाऱ्याकडनं अपेक्षित आहेत. आणि विशेष हे की बहुतेक लोक हे सार्वजनिक शिस्तीचे संकेत आवर्जून पाळताना दिसून येतात. 


हा खालचा फोटो  एखाद्या ऍब्स्ट्रॅक्ट कवितेसारखा आहे:


थोडी कारागिरी केली, आणि ह्या फोटोतला हिवाळी एकांत अजूनच वाढला: 


मी तसा आळशी आहे - माझ्या प्रिय बायकोला आणि मुलाला मात्र फिरण्याची भारी हौस आहे. त्यांच्या सोबत मी देखील गेल्या काही वर्षात बऱ्यापैकी फिरू लागलो आहे :). 

शॅनंडोआ म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारची मेडिटेटिव्ह जागा आहे. तिथे जाऊन बसलं की काही एक ऊर्जा मिळते. रानावनातून चालताना अनेक कविता आठवतात, सुचतात हे देखील आहेच. हा पार्क बनवताना बरीच गावं विस्थापित झाली होती. ती पुढे कुठे वसवली गेली असतील वगैरे विचार देखील डोकावून जातात. त्यातली बहुतेक मंडळी व्हॅलीतल्या गावांमधे जाऊन राहिली होती असे अशात वाचल्याचे आठवते.


No comments: