Thursday, April 1, 2010

गझलेबद्दल बरेचदा उलट सुलट चर्चा सुरू असते. गझल म्हणजे वॄत्त नसून वॄत्ती आहे, गझल म्हणजे हॄदयाचा हुंकार आहे यासारखी पोरकट विधानेही सर्रास ऐकू येतात. फारसी, उर्दू आणि आता मराठी आणि गुजराती सारख्या सम्मॄध्द भाषांमधून प्राचुर्याने लिहील्या गेलेल्या, किमान सहा शतकांचा इतिहास असलेल्या एका साहित्य विधेची अशी मर्यादित आणि संकुचित व्याख्या करण्याचा प्रयत्न करणे वैचारिक अपरिपक्वतेचे लक्षण आहे. असाच काहीसा प्रकार यमक आणि व्याकरणाच्या बाबतही आहे. स्वर यमक चालणार नाही, गझलेत किमान पाच शेर असलेच पाहिजेत, शेवटच्या द्वैपदीत कवीचे नाव असलेच पाहिजे, शेरांमध्ये झटका असला पाहिजे ,गझलेत समाजाला शिवीगाळ केलीच पाहिजे ई गैरसमज " नियम " म्हणून रूढ करण्याचा प्रयत्न वर्षानुवर्षे केला गेला. हा प्रकार पाहून मराठीतले चांगले कवी गझलपासून दूर न राहते तर नवलच! शिवाय वैचारिकतेशी आमच्या गझल'कार' ( हा ही आमच्या मंडळींचा आवडता शब्द ) मित्रांचे हाडवैर असल्याने वर्षानुवर्षे उथळ, अपरिपक्व आणि भडक गझला पाडल्या गेल्या. साहित्येतर क्षेत्रातील मंडळींनी चालविलेल्या तथाकथित चळवळीमधून हे गैरसमज आणखीनच फोफावत गेले.

गझलेमध्ये आणि कवितेमध्ये फरक काय आहे असा एक मुद्दा नेहमी उपस्थित केला जातो. कवितेमध्ये एकच विचार खुलवत नेला जातो, तर गझलेमध्ये अनेकविध विचार असू शकतात्.असलेच पाहिजेत असे नाही. मागे एका लोकप्रिय उर्दू कवीच्या ' आई ' या एकाच विषयावर लिहिलेल्या गझलेवर, ती गझल नसून गझल सदृष कविता आहे असा आरोप झाला होता. वास्तविक हा एक अयोग्य आक्षेप आहे. गझलेच्या शेरांमधून अनेकदा विविध विचारांचे वर्णन होत असले, तरी प्रत्येक काळात एकाच विचाराला अनुसरून लिहिलेल्या, एकाच मनोभौमिक अवस्थेचे चित्रण करणार्‍या गझला बाहुल्याने लिहिल्या गेल्या आहेत. एक अगदी जुने उदाहरण पाहुयात. सिराज औरंगाबादी या सोळाव्या शतकातल्या कवीची एक अप्रतिम गझल आहे :

खबरे तहैय्युरे इश्क सुन ना जुनू रहा ना परी रही
ना तो मैं रहा न तो तु रहा जो रही सो बेखबरी रही

या संपुर्ण गझलेवर प्रेमाची गडद छाया दाटून राहिलेली आहे. पहिल्या कडव्या मध्ये प्रेमातील आश्चर्य, कुतूहल , तर नंतरच्या शेरांमध्ये प्रेमाच्या इतर गोष्टी कवीने सांगितलेल्या आहेत. मग ही गझल नसून एक प्रेमकविताच आहे असे म्हणता येणार नाही का ?

नाही. या प्रश्नाचे उत्तर गझलेच्या संहितेमध्ये, गझलेच्या बारिक सारिक धाग्यादोर्‍यांमध्ये दडलेले आहे. गझलियत किंवा "गझलपणा" ची व्याख्या शेर सांगण्याच्या ( वाचण्याच्या नव्हे ) संहतीमध्ये निहित असते. गझलेचा एक शेर एक स्वतंत्र 'एकक' अथवा "संकुल" म्हणुन सहज श्वास घेऊ शकतो. गझल ही अनेक व्यामिश्र आणि जटिल संवेदनाची शृंखला असते. ही संपॄ़क्तता कवितेच्या कडव्यांमध्ये असेलच असे नाही. कवितेचा पट भौतिकदॄष्ट्या गझलेपेक्षा काहिसा पॄथुल आणि दीर्घ असल्याने ओळींगणिक एखादी संवेदना खुलत जाते. बालकवींचा औदुंबर पुर्ण समजून घ्यायचा असेल तर ही संपुर्ण कविता वाचावीच लागते. गझलेचे असे नाही. ओवी आणि हायकू हे दोन कवितेचे प्रकार या दृष्टीतून गझलेच्या अत्यंत जवळ जाणारे आहेत.
अनेक विचारांचे घनीकरण शक्य होते. अनेकांचे होत नाही. त्यामुळेच एखाद्या संवेदनेची कविता होते, एखादीची गझल.
इथे कविता श्रेष्ठ की गझल हा मुद्दा उपस्थित होत नाही. खरेतर हा एक अत्यंत अविवेकी विचार आहे. ( Contd. )


---


अनेक  वर्षांनं तर ही पोस्ट एडीट करतो आहे. तगझ्झुल म्हणजे काय आणि इतर अनेक गोष्टींचा सविस्तर विचार  माझ्या '  गझल काही नोंदी ह्या लेखातून केला आहे. हा लेख समकालीन गझल ह्या अनियतकालिकात उपलब्ध आहे :

http://home.iitk.ac.in/~chavan/samakalin%20gazal_first%20issue%20-%20main_final_3.pdf

Saturday, March 27, 2010

मागे एक सुंदर शेर ऐकला :

सद साला दौरे चर्ख था सागर का एक दौर
निकले जो मैकदे से तो दुनिया बदल गई..

कवी - गुस्ताख रामपुरी

खरं तर कवीने इथे नेहमीचीच रूपकं वापरलीएत, म्हणजे सागर, मैकदा ई. पण शेराचा अर्थ मोठा सुंदर आहे. आमच्या प्याल्याची एक फेरी म्हणजे काळाच्या हजार प्रदक्षिणा होत्या. मद्यालयातून बाहेर आलो तेंव्हा कुठे जाणवलं की बाहेरच जग अगदीच बदलून गेलयं. एखाद्या धुंदीमध्ये, एखाद्या आयुष्य ढवळून काढणार्‍या वेडात माणूस एवढा गुंग होऊन जातो की बाहेरच्या दुनियेत काय सुरू आहे याचे त्याला भानच उरत नाही. या वेडातनं जेंव्हा तो बाहेर पडतो तेंव्हा त्याला जाणवतं की आपण खूप वेगळ्या जगात वावरत होतो.
मानवी स्वभावाचा अत्यंत बारिक पैलू पकडणारा हा शेर मला माझे ज्येष्ठ कवी मित्र अस्लम मिर्झा यांनी ऐकवला होता. मिर्झा साहेब उर्दू आणि मराठी अशा दोन्ही भाषांचे उत्तम जाणकार आहेत. औरंगाबादची उर्दू कविता आणि उर्दूत सामील झालेले मराठी शब्द हे त्यांच्या विशेष आवडीचे तसेच संशोधनाचे विषय आहेत.
त्यातल्या त्यात मराठी कविता हा मिर्झांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. माझ्या माहितीप्रमाणे आजवर त्यानी पाचशेहून आधिक मराठी कवितांचे उर्दू अनुवाद केले असून त्यांचा संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.

Thursday, March 25, 2010

*****


मी उसनवारी करुन जो आणला
एक दिवशी धीर तो ही संपला


वेगळे अस्तित्व आहे आपले
सांगतो प्रत्येक जण गर्दीतला


वाटते आयुष्य जे ही पाहिले
एक निव्वळ भास होता आपला


रोड हा जातो जुन्या शहराकडे
राहतो जेथे कुणी माझ्यातला


जूनच्या महिन्यातला पाऊस तू
आणि माझा जन्म वैशाखातला........


अनंत ढवळे

anantsdhavale@rediffmail.com

*********


श्वास श्वास उन्मळून यावा अशी विलगता
खूप दूरवर नेते आहे तुझी तुटकता


आसाभवती फिरत राहिलो जन्मोजन्मी
तुला समजलो ,कुठे समजली तुझी सहजता


किती दूरवर आलो आपण असे वाटते
वीतभराचा प्रवास निघतो मोजू बघता..


तुझ्याप्रमाणे जगेन मी ही ,तुझ्या सवे पण
खरेच का येईल मला हे स्वत्व बदलता ..?


विचार करतो कुठे कुठे बदलेन काय मी
पुन्हा एकदा जर आले आयुष्य निवडता.....!



अनंत ढवळे



*********



मनाची आग कोठे शांतवावी
कुठे जाऊन चादर अंथरावी


फरक ना आमच्यामध्ये जरासा
कशी मी जात त्याची ओळखावी


मनाचे मोल ना काहीच येथे
कुणाला आपली भाषा कळावी


शहर परके , न कोणी ओळखीचे
कुठे ही रात्र आता घालवावी


मिळो संवेदनेचे दान तुजला
तुला ही वाट माझी सापडावी.........




अनंत ढवळे


********


निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली


कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली


पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली


कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली


तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...


अनंत ढवळे


********


काठ डोळ्यांचे भिजावे सारखे
वाटते आहे रडावे सारखे


मी विचारावे तुला काहीतरी
आणि तू नाही म्हणावे सारखे


काय या गावात होते आपले ?
पाय का मागे वळावे सारखे


वाटते पाऊस यावा एवढा
रंग भिंतींचे उडावे सारखे


वाहुनी जावे उभे आकाश हे
दु:ख मेघांचे झरावे सारखे.....



अनंत ढवळे


*******


हट्ट माझा तुझा पुरे बंधो
काळ देईल उत्तरे बंधो


काळ बुजवून टाकतो वाटा
कोण कोणास विस्मरे बंधो


देव जाणे व्यथा कुणाची ही
आतल्या आत पाझरे बंधो


कोण फिरवेल हात मायेचा
ठेव बांधून लक्तरे बंधो


एक बेअंत धून दाटू दे
द्वैत जन्मातले सरे बंधो ....


अनंत ढवळे


************



मागणे संपले मागताना तुला
पोचलो मी कुठे शोधताना तुला


दु:ख आकाश भेदून गेले पुढे
आज मी पाहिले भंगताना तुला


धर्म हा कोणता ,कोणता पंथ हा
लोक किंचाळती पूजताना तुला


ही कहाणी तुझी ,कल्पना ही तुझी
लाज का वाटते वाचताना तुला ?


गोपुरे कंपली , पांगली पाखरे
विश्व भांबावले पाहताना तुला.....



अनंत ढवळे


*****

Sunday, April 20, 2008

खिन्न शेते ....

पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते

कितीदातरी सांडले रक्त आम्ही
कितीदातरी वाळली खिन्न शेते

कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे
कशाने अशी जाहली खिन्न शेते

असे मुक्तता आत्महत्याच ज्याची
धन्याची चिता पाहती खिन्न शेते

नवे हात आलेत राबावयाला
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते...

अनंत ढवळे

Saturday, March 29, 2008

निरंतर खिन्नतेची रात्र होती
उभी डोळ्यात काळी रात्र होती


अशा नात्यास कुठले नाव द्यावे
तुझ्या माझ्यात ढळती रात्र होती


कथा माझ्या तुझ्या संपून गेल्या
कधी ना संपणारी रात्र होती....


फरक हा दृष्टीकोणांचा असावा
तुझा जो दिवस माझी रात्र होती....



जिथे बघतो तिथे वाटाच वाटा
अजब संभावनेची* रात्र होती


--

अनंत ढवळे

(संभावना - शक्यता )