Tuesday, July 8, 2025

1

घड्याळाने उठवले एरवी उठलोच नसतो
अशी तंद्री भुलावन आज मी हललोच नसतो

उतरली धुंद डोके लख्ख उजळीने ठणकले
तसा निघलो तडक्कन एरवी निघलोच नसतो

तडकली काच डोक्यावर उन्हाने खोक पडली
उन्हाळी रंग नसता रापका फुटलोच नसतो

रटाळी वाढते दिवसेंदिवस आहे मनाची
उगा रमलो खरातर एव्हढा रमलोच नसतो

कमी नाहीत तोटे सभ्य असण्याचे कृपाळा
जरासा मी बिघडतो तर असा फसलोच नसतो  


.

अनंत ढवळे 

भाषा

जेंव्हा नासवली जाते एखादी भाषा 
तेंव्हा नासवली जाते 
                       एक उभी संस्कृती 

+

भाषेसाठी पुढे येऊ नयेत मंत्री- संत्री 
ह्यात आश्चर्य नाही — राजकारणी हा 
लोकशाहीमधला सर्वतः 
                      निरूपयोगी वर्ग आहे 

पण भाषेच्या नावे भाकरी थापणारे
लेखक, कवी, अभिनेते, गायक 
                       यांचं काय? 

+

तुमच्या डोळ्यांदेखत खोडून काढली जाते आहे
चक्रधरमहदंबाज्ञानेश्वरनामदेवएकनाथतुकारामाची भाषा
                         तुमच्याच लोकांकडून.

+

नगरसेवकाला व्हायचंय आमदार 
आमदाराला मंत्री 
मंत्र्याला बनायचंय मुख्यमंत्री 
प्रत्येकालाच चढायचंय वर
मग त्यासाठी तोडावी लागली राज्ये 
किंवा 
संपवावी लागली भाषा 
                         तरी हरकत नाही.

+

पण हे काही एकमेव संकट नाही 
भाषेपुढचं : 
ह्या आधी काय केलंय आपण 
                  — ह्यानंतरही काय करणार आहोत ? 

+

विलियम कार्लोस विलियम्सने आयुष्यभर 
खपून 
आपल्या कवितेतून साधली होती 
                       सामान्यांची भाषा 

याउलट आपण काय करतो? 
तर
उडवतो लोकभाषेची खिल्ली.

+

भाषा म्हणजे लोकायत 
लोकांनी मिळून कळत- नकळत संकलित 
केलेलं ज्ञान

भाषेचा हात धरून 
आपण  जाऊ शकतो हजार वर्षे मागे 
                      अथवा पुढे.

                      
+

प्रत्येकाला जपायचा आहे 
आपापला निहित स्वार्थ 
टिकवायचे आहेत हितसंबंध 
पण भाषेचं काय? 

कोण जपणार आहे भाषेचा पुरातन 
                        आत्मबंध.

..

अनंत ढवळे