Friday, February 19, 2016

गझल

एक गझल :

कुणाचे ऐकणे नाही कुणाशी बोलणे नाही
अशा वैराण दिवसांची उदासी संपणे नाही

असे हे काय होते की दुवे तुटतात कायमचे
सहज मग बोलणे नाही उगाचच भेटणे नाही

तुझ्या प्रेमामधे आहेच किमया दोन विश्वांची
तुझ्या किमयेत पण माझे वचन सामावणे नाही

मनाची पानगळ संपेल तर बदलेलही शोभा
करावे काय मन ठरवून बसले पलटणे नाही

तसेही कोणते मुक्काम आपण घेतले होते..
नको रस्ताच तो जेथे निरंतर चालणे नाही

अनंत ढवळे




No comments: