Monday, December 15, 2025

बोधाचा उरला-सुरला अर्थ

कसनुसा वाहतो आहे
बोधाचा उरला-सुरला अर्थ
संस्कृतीच्या प्रभावहीन पाण्यासारखा 

लालसा चालवत जाते आहे
बव्हंशी
आपल्या संवेदनेतले जग
संभोग, पैसा, सत्ता

एक बेईमानी वेढून आहे
नेहमीपासूनची
शहरे, गावे, डोंगर न समुद्र

पण हे असे नव्हते
असा
कुठलाही काळ नव्हता
कधीच 

आता हे खोल-खोल संवाद
पाप, पुण्य, आचरण आणि इच्छेच्या

अर्थनिर्णयासारखे
अनावश्यक

..

अनंत ढवळे


Wednesday, December 3, 2025

1

निव्वळ मी मी करतो आहे 
वर म्हणतो मी किटलो आहे 

ऐकुन घेतो बरेच काही 
तदनंतर किरकिटतो आहे 

काय लालसा आहे नक्की 
इथे तिथे घुटमळतो आहे 

मिटलो होतो खूपच आधी 
पण यंदा फिसकटलो आहे 

क्षणोक्षणी हे क्षरण चालले 
घुमट जगाचा तुटतो आहे   

उरले काही काम न धंदा
गझला पाडत बसलो आहे 

+

तुला वाटला होता साधू 
पक्का ऋणको-धनको आहे 




-
अनंत ढवळे