Monday, October 14, 2024

1

लोक 

वादळानंतरची भकास शांतता

बघत बसलेले


पानगळीच्या पानांमधले 

पिवळसर तांबूस बुध्द 

निर्विकार बघत बसलेले


जगण्याचा जुनसर अर्थ

आसपासचे विश्व

फुटत विस्फोटत जाताना बघण्याखेरीज

इतर काहीच नसणे 

हे उमजून घेत बसलेले


समज आणि दंतकथेच्या पातळसर सीमेवर

गोंधळून उभे 

असल्यासारखे


_


अनंत ढवळे 

Thursday, October 10, 2024

माझ्या इंग्रजी कविता


 

ह्या आठवड्यात माझ्या इंग्रजी कवितावाचनाचा एक कार्यक्रम "रिव्हर रीड" उपक्रमांतर्गत रेडबॅंक, न्यू जर्सी येथे होतो आहे. मराठी वाचक मित्रांच्या माहितीस्तव इथे ही नोंद.  फिचर्ड रीडर म्हणजे कुठल्याही कविता वाचनातले निमंत्रित कवी. फिचर्ड रीडर कवितावाचनाच्या सुरुवातीला साधारण वीस पंचवीस मिनिटे आपल्या कविता ऐकवतात, आणि त्यानंतर ओपन माईक पार पडतो. 

Friday, October 4, 2024

1

मित्तर चित्तर भुरे कबूतर 

ह्या छपराहुन त्या छपरावर 


वर दाटीवाटी मेघांची

खाली नुसती तगमग दुष्कर


वाटाड्या जर निघला भोंदू

हे खापर फोडा वाटेवर


काय तुझा हा उलटा धंदा

शिकून सवरुन बनला कट्टर


कुठे तुझ्या डोळ्यांत उतरलो

रेघोट्या घोटल्यात वरवर


ये रे ये आषाढी मेघा

घेउन जा हे माझे पत्तर


.


अनंत ढवळे

1

लोक  वादळानंतरची भकास शांतता बघत बसलेले पानगळीच्या पानांमधले  पिवळसर तांबूस बुध्द  निर्विकार बघत बसलेले जगण्याचा जुनसर अर्थ आसपासचे विश्व फु...