Saturday, December 29, 2018

2

दीर्घ कवितेतला खंड, लयीत वाचा :

---

दिवस गोष्टीतल्या
किमयेप्रमाणे
निघुन गेलेत मित्रा

कदाचित थांबणेही शक्य नव्हते
कदाचित काळही अनुकूल नव्हता

निबीडते आपले निर्भर सहेतुक
जसे निर्वस्त्र उन्मादी बहकणे
भटकणे हे इथे तेथे निर्रथक
जसे बेकार सूर्याचे उगवणे

किती स्वस्तावले आहेत रस्ते
असे नव्हतेच कोसळणे, न उरणे
कडेलोटातली निव्वळ खुमारी
जसे अस्तास बेफिक्रे बिलगणे

अथाहत चालले आहे उणेपण
समर्पक केवढे
पोकळ तरीही
कशाची पूर्णता उरते निरंतर
सततच्या शून्यतेच्या आड येते
कुणाचे रक्त साकळते उन्हावर
निथळते आणि ओथंबून उरते


निथळते आणि ओथंबून उरते..

--

अनंत ढवळे


1

कदाचित थांबणेही शक्य नव्हते
कदाचित काळही अनुकूल नव्हता..

अनंत ढवळे

Monday, December 17, 2018

काही शेर

ह्या न त्या संभ्रमात जाणारी
रेघटी आखण्यात जाणारी


सार समजून घ्यायचे दुष्कर
पाहण्या पाहण्यात जाणारी

--

ह्या न त्या संभ्रमात गेलेली असाही पाठ आहे..

-
अनंत ढवळे