Monday, May 2, 2016

शोभायात्रा

शोभायात्रा

-

सूर्याची प्रशंसा करा
पृथ्वीची प्रशंसा करा
नदीचे सूक्त म्हणा
गुहांमधली रेखाटने
तुमच्या वंशाची साक्ष देतील

अनेक हजार वर्षं निघून जातील
स्थानिकांचे निर्वासित होतील
निर्बळांच्या झुंडी चिरडल्या जातील
विषारी पावसाच्या सरी
तुमुल युद्धध्वनी
दडपून टाकतील
जय पराजयाची अविश्वसनीयं संस्करणं पसरवली जातील
उध्वस्त होतील जनपदं
फिरवले जातील राजमुकुट अनेकदा
बदलत जातील मानववंशाचे इतिहास

हळू हळू बदलत जातील
कातडीचे रंग, बोलीभाषा आणि पेहराव
अनिश्चीततेचे बिगुल वाजत राहतील
अनेक शतकांचं हरवलेलं युग येईल
लोक येतील शेकडो हजारो लाखोंच्या संख्येने
सामावून जातील
माती, पाणी आणि हवेत

असाही एक कळ येईल की जिथे
एकमेव द्वंद्व राहून जाईल;
इतर सर्व संघर्षांचा विनाश होवून
आणि मग
कुठलाही अर्थ उरणार नाही
तुमच्या हजारो वर्ऱ्षांच्या शोभायात्रेस
किंवा या गोष्टीस
की तुम्ही सूर्याची प्रशंसा करत होतात
अथवा चंद्राची

अनंत ढवळे